१. रंगात तुझ्या
रंगात तुझ्या रंगूनी
रंग माझा वेगळा शोधते
मीच मला गवसता
मुक्त आकाशी झेप घेते
पलाश फुले केशरात न्हाली
भूवरी सांडता गंधित प्याले
मी पण माझे हरवून बसले
आसमंत चिंब चिंब भिजले
मोहर फुले गाली हसली
आंबटगोड वासात दरवळली
कुहूकुहू कोकीळ गाई गाणी
मंजूळ स्वर ह्रदयी विसावले
अंतरी रुजले वेड सृष्टीचे
स्नेह मळे मनी फुलले
मुक्त हस्ते देणारा निसर्ग
उधळून द्यावे जीवन आपले
— रचना : डॉ. प्रभा वाडकर. लातूर.
२. हुताषनी होळी
फाल्गुनाचा मास |
स्नेहातली होळी |
पुरणाची पोळी |
नैवेद्याला ||१||
विष्णू भक्ता तारी |
बाळ प्रल्हादास |
धडा देई खास |
होलिकेसी ||२||
काष्ठ समर्पण |
कुवृत्तीस जाळी |
गुलाल तो भाळी |
दिव्यत्वाचा ||३||
धुळवड खेळी |
उष्मेस निवारी |
बालका उभारी |
एकात्मता ||४||
नसे भेद भाव |
नाना रंगी दंग |
खेळतो श्रीरंग |
भक्ता द्वारी ||५||
जलाचे शिंपण |
शितलता देई |
धुरेतून येई |
शिकवण ||६||
पादप संहार |
नको करू जना |
नित्य जप वना |
शोभा वाटे ||७||
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
३. रंग
एकची असा तो
पेन मिळावा
अवघा संतमेळा
त्यात वसावा
कुठे ही कुणाचा
मत्सर नसावा
विश्व पसारा
आनंदे डुलावा
व्दैत सारा निघूनी जावा
अवघा रंग एकचि व्हावा
रंगपंचमी इंद्रधनुष्यी व्हावी
सकला हर्षीत करुन जावी
— रचना : आशा दळवी, दूधेबावी.
४. रंगपंचमी
गुलाबी पिवळा केशरी हिरवा
लाल निळा काळा जांभळा बरवा
सवंगड्यांनो रंग उधळू चला – १ –
फुलांच्या पाकळ्या हळद नि मेंदी
टोमॅटो, बीट देती गर्द अगदी
हानी नसे नैसर्गिक रंग नवा – २ –
खेळला कान्हा
गोकुळी राधासवे
गोप गोपिकांचे रंगलेले थवे
वसंत पंचमीत दंग अवघा – ३ –
पिचकारीने भिजविले रंगांनी
शृंगारले पुष्पांनी चहु अंगांनी
यौवनाचा मत्तसा गंध अनोखा – ४ –
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान होळी/ रंगपंचमी विशेष कविता🌷