अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम, जसे की वैद्यकीय,अभियांत्रिकी, कायदा, आर्किटेक्ट पूर्ण केले की आयुष्यभर त्याच क्षेत्रात काम करीत रहावे लागते. पण पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला की एकाच नव्हे तर अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी नुकतेच केले. ते प्रख्यात पुढारी वृत्तपत्राने ठाणे येथे आयोजित केलेल्या “करिअरच्या नव्या वाटा” या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना श्री भुजबळ यांनी सांगितले की, पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वृत्तपत्रे, रेडिओ वाहिन्या, दूरचित्रवाणी वाहिन्या, डिजिटल माध्यम, चित्रपट, जाहिरात, प्रकाशन, जनसंपर्क, भाषांतर, सरकारी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय अशा अनेकविध प्रसार माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. तसेच आपल्या आवडीनुसार, परिस्थिती पाहून एका प्रसार माध्यमातून दुसऱ्या प्रसार माध्यमात काम करता येऊ शकते. त्यात पुन्हा पत्रकारितेचे जे अनेक प्रकार आहेत, ते सुद्धा आपल्या आवडीनुसार बदलता येतात. इतकी लवचिकता अन्य कुठल्याही क्षेत्रात दिसून येत नाही.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, पत्रकारितेत येण्यापूर्वी आपल्याला वाचनाची, लेखनाची, इतरांशी बोलण्याची, इतरांचे बोलणे ऐकण्याची आवड आहे का ? आपल्यात चौकस बुद्धी आहे का ? वेळप्रसंगी दिवसरात्र काम करण्याची तयारी आहे का ? या बाबी मुलामुलींनी या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापूर्वी स्वतःच तपासून घ्याव्यात कारण हे क्षेत्र ग्लॅमरस दिसत असले तरी वेळ प्रसंगी भूक तहान हरपून काम करण्याची तयारी ठेवावी लागते. अशी तयारी नसल्यास अनेक जणांचा या क्षेत्रात आल्यावर भ्रम निरास होऊ शकतो.
श्री भुजबळ यांनी अतिशय हसतखेळत संवाद साधल्याने उपस्थितांची त्यांना वेळोवेळी दिलखुलास दाद मिळत होती.

प्रारंभी पुढारी वृत्तपत्राचे विपणन प्रमुख श्री तळेकर यांनी श्री भुजबळ यांना पुढारी वृत्तपत्राच्या ८३ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या अंकाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
श्री भुजबळ यांचे संपूर्ण भाषण आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून “ऐकू” शकता.
आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800