नवी मुंबईतील सानपाडा परिसरात दिवसेंदिवस गगनचुंबी इमारती उभ्या रहात आहेत. त्यामुळे साहजिकच रहिवासी मोठ्या प्रमाणात राहायला येत असून त्यांचा नियमित फेर फटका सीताराम मास्तर उद्यानात होत असतो.
पण या उद्यानात प्रवेश घेण्यापूर्वीच उद्यानाची दुरावस्था आणि त्याकडे नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष पाहून, रहिवाश्यांना असा प्रश्न पडतो की, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून टिमकी वाजवणारे हेच ते नवी मुंबई शहर आहे का म्हणून ?
भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कधी होऊन गेला, याचे भान बहुधा नवी मुंबई महानगर पालिकेला नसावे. म्हणूनच उद्यानाच्या दर्शनी भागात लावलेला मोठा फलक, आपल्याला बुचकळ्यात टाकतो.

उद्यानाच्या वेळा आणि अन्य माहिती वाचताना लक्षात येते की, या महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मराठीच्या शुद्ध लेखनाचे धडे देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे मराठी भाषेचे आणि महानगर पालिकेचे धिंडवडे तरी निघणार नाही.
उद्यानात प्रवेश घेताच डाव्या बाजूला लागलेला कचऱ्याचा प्रचंड ढीग आणि त्यातून येणारा वास आपल्याला नाक धरायला भाग पाडतो. पुढे पुढे तर जागोजागी दिसणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि अन्य कचरा, लोखंडी साहित्य पाहून तर आपण कधी एकदा या उद्यानातून बाहेर पडतो, असे वाटायला लागते.
बालकांसाठी असलेल्या घसरगुंडींच्या खाली खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष या घसरगुंडींमध्ये न बसता, दुरूनच त्यांच्याकडे पाहून ही बालके घसरगुंडींचा आनंद घेत असतात !

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या आमदार निधीतून दिलेल्या व्यायाम साहित्याची तर पार वाट लागली आहे. कित्येक उपकरणे गायब झाली आहेत. तर इतर काही नादुरुस्त अवस्थेत आहेत. बहुधा मंदाताईंनी भेट दिल्याशिवाय या उपकरणांचा जीर्णोध्दार होईल,असे वाटत नाही.
याच उद्यानाच्या एका कोपऱ्यात महानगर पालिकेचे जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे. या केंद्राचे १३०० हून अधिक सभासद आहेत. उद्यानात सकाळच्या विविध वेळांमध्ये तीन तीन हास्य क्लब चालतात. यामुळे तसेच सकाळ, संध्याकाळ फिरायला येणाऱ्या नागरिकांमुळे, बच्चे कंपनीसह येणाऱ्या पालकांमुळे, आजी आजोबा यांच्यामुळे सतत वर्दळ असलेल्या या उद्यानाकडे महानगर पालिकेने तातडीने लक्ष घालून गायब झालेली उपकरणे परत बसविल्या जातील, शुद्ध लेखन करून सर्व फलक लावण्यात येतील आणि उद्यानाची नियमित सफाई होत जाईल, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

— लेखन : मारुती विश्वासराव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800