Saturday, July 19, 2025
Homeयशकथाअसे होते, डॉ दीपक टिळक

असे होते, डॉ दीपक टिळक

‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ.दीपक टिळक यांचे काल ; १६ जुलै २०२५ रोजी निधन झाल्याची बातमी वाचली आणि क्षणार्धात त्यांचा जीवनपट डोळ्यापुढे उभा राहिला.

१९८४ साली मी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट मधील वृत्तपत्र विद्या विभागातून पदवी घेतली. त्याचवेळी माझा वर्गमित्र बाबासाहेब काझी (त्यावेळी तो डॉक्टर झालेला नव्हता !) याच्या सांगण्यावरून ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ च्या एम ए (समाज कार्य) या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा, समूह चर्चा आणि मुलाखत होऊन माझी त्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. मी जून १९८४ मध्ये संस्थेत आणि संस्थेच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. दोन आठवड्यातच माझ्या लक्षात आले की, नोकरी करीत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा नाहीय आणि शिष्यवृत्ती डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार होती. त्यामुळे मला प्रश्न पडला की, जून ते डिसेंबर या सहा महिन्यांचा खर्च कसा भागवायचा ?

त्याच दरम्यान केसरी ची उपसंपादक आणि इतर काही पदांसाठी आलेली जाहिरात पाहून मी उपसंपादक पदासाठी अर्ज केला. त्यावेळी मला काही जणांनी सांगितले की, तुला केसरीत नोकरी हवी आहे, तर तू जयंतरावांना भेट तर तुझे काम होईल. (त्यावेळी लोकमान्य टिळक यांचे नातू जयंतराव हे केसरीचे विश्वस्त होते. तर चंद्रकांत घोरपडे हे संपादक होते.) पण मी ठरविले होते की, केवळ गुणवत्तेवर निवड होणार असेल तरच केसरीत रुजू व्हायचे, वशिलेबाजी करून नव्हे.पण खरोखरच कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी न करता माझी निवड झाली. टाटा इन्स्टिट्यूट सोडून मी १ जुलै १९८४ रोजी केसरी वृत्तपत्रात रुजू झालो.

जयंतराव टिळक

जयंतराव होते, तो पर्यंत तेच केसरीचे सर्व कामकाज बघायचे. तर त्यांचे चिरंजीव  दीपक टिळक हे व्यवस्थापक म्हणून काम बघायचे. ते अतिशय ऋजु व्यक्तिमत्वाचे, मितभाषी असे होते. आपण लोकमान्य टिळकांचे पणतू आहोत, केसरी चे प्रमुख आहोत, असा कुठल्याही प्रकारचा अहंकार त्यांच्यात नव्हता. काही कारणामुळे मी केसरीत काही महिने काम करून केसरी प्रकाशनाने सुरू केलेल्या साप्ताहिक सह्याद्री चा विशेष प्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो. अरुण ताम्हणकर हे त्यावेळी साप्ताहिक सह्याद्री चे संपादक होते. वर्षभर मी सह्याद्री साठी काम केले. मुक्त पत्रकारिता कितीही आदर्श वाटत असली तरी, ती तशी करण्यासाठी तुमच्या घरची ऐपत तरी असली पाहिजे किंवा भणंगासारखे जीवन जगण्याची तुमची तयारी असली पाहिजे हे मला त्या वर्ष भराच्या अनुभवातून कळून चुकले आणि मी रीतसर आर्थिक स्थैर्य देऊ शकेल,अशी नोकरी करण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहचलो. अर्थात त्यासाठी मला केसरी आणि सह्याद्रीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक ठरणार होते. त्यासाठी मी दीपक टिळक यांची भेट घेऊन, त्यांना खरे काय ते सांगून टाकले. त्यांनी जराही विचार न करता, लगेच त्यांच्या लेखनिकास बोलावून घेऊन केसरी आणि सह्याद्री च्या अनुभवांची दोन स्वतंत्र प्रमाणपत्रे मला लगेच करून दिली आणि ती प्रमाणपत्रे घेऊनच मी तिथून बाहेर पडलो. पुढे ती प्रमाणपत्रे मी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन च्या जनसंपर्क अधिकारी आणि मुंबई दूरदर्शन केंद्राच्या निर्मिती सहायक पदासाठी केलेल्या अर्जासोबत जोडली.
यापैकी माझी निवड निर्मिती सहायक पदासाठी होऊन मी दूरदर्शन केंद्रात रुजू झालो. तिथे काही वर्षे राहून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयात जिल्हा माहिती अधिकारी पदासाठी अर्ज केला, तेव्हाही मला केसरी आणि सह्याद्रीची अनुभवांची प्रमाणपत्रे कामी आली.

आज मागे वळून पाहताना लक्षात येते की, किती सहजासहजी दीपक टिळक यांनी मला अनुभवांची प्रमाणपत्रे दिली ! मी केसरी मध्येच सोडून गेलो होतो आणि सह्याद्री मध्येच सोडून जात होतो तरी एका शब्दाने त्यांनी मला जाब विचारला नाही की, उलटसुलट काही सुनावले नाही. या त्यांच्या दिलदार स्वभावामुळे मी त्यांचा कायमचा आदर करू लागलो. पुढे कधी पुण्यात गेलो की, सहज म्हणून केसरी कार्यालयात गेलो की त्यांची सौजन्यपर भेट मी अवश्य घेत असे.

डॉ दीपक टिळक

अल्प परिचय :
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू व गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व करणारे, बारा वर्षे खासदार   (राज्यसभा सदस्य) आणि सोळा वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राहिलेले जयंतराव टिळक यांचे  सुपुत्र असलेल्या दीपक टिळक यांचा  जन्म ६ नोव्हेंबर १९५२ रोजी झाला होता.

उच्च विद्याविभूषित असलेल्या  दीपक टिळक यांनी वृत्तपत्र व्यवस्थापन या विषयात पी.एच.डी संपादन केली होती.
१९८० च्या सुमारास ते केसरी मध्ये कार्मिक व्यवस्थापक  म्हणून रुजू होऊन पुढे सरव्यवस्थापक झाले. ते २००२ पासून केसरीचे मुख्य संपादक झाले. देशातील अग्रगण्य असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या १५ वर्षांच्या  कुलुगुरूपदाच्या कारकिर्दीत त्यांनी विविध विभाग सुरु करून या विद्यापीठाला नवी दिशा दिली.
२०००-२००१ मध्ये वृत्तपत्रविद्या विभाग तर २००३-०४ या वर्षात संगणक शास्त्र विभाग त्यांनी सुरु केला. वृत्तपत्रविद्या विभागात त्यांनी २००७ मध्ये फोटोग्राफी-डिजिटल आर्ट, ऍनिमेशन, व्हीएफएक्स, एव्हिड असे कालानुरूप अभ्यासक्रम सुरु केले. त्यामुळे एरव्ही अत्यंत महागडे असलेले हे अभ्यासक्रम विद्यार्थांना परवडतील अशा शुल्कामध्ये  उपलब्ध झाले. या बरोबरच जपानी भाषेचे महत्व ओळखून त्यांनी  अभ्यासक्रम सुरू केले. त्यांच्या या योगदानाबद्दल जपान सरकारने त्यांना २०२१ मध्ये सन्मानित केले होते. त्यांच्या कारकिर्दीतच या विद्यापीठाला  बी ++ असे नॅक मूल्यांकन मिळाले. पुढे ते या विद्यापीठाचे कुलपती ही होते.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही डॉ दीपक टिळक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि केसरी वृत्तपात्रासाठी भरीव योगदान देतानाच वसंत व्याख्यानमाला आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, रोझ सोसायटी, अनाथ हिंदू महिलाश्रम, अशा अनेक संस्थांच्या कामातही त्यांचे अतुलनीय योगदान होते. ते उत्तम ज्युदो पटू होते.

डॉ दीपक टिळक यांचे सुपुत्र रोहित हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि पुन्हा २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले होते. असो..

लोकमान्य टिळक हे पणजोबा आणि जयंतराव टिळक हे वडील अशा दिग्गज व्यक्तिमत्वाच्या छायेत राहूनही डॉ दीपक टिळक यांनी स्वतःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व घडविले होते. डॉ दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?
Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on माध्यमभूषण याकूब सईद