१. श्रावणपण
आषाढाच्या हरित जादुला चढवित हिरवा चुडा
गर्भगुपित मातीचे शिंपित श्रावण घाली सडा
अंगणात प्राजक्ती टपटप, ऊब-ओलसर हवा
गंधाकर्षित धावत येतो मातीतुन गारवा
प्रवाहातली तरंगगाणी खळखळती जाहली
समाधिस्थशी तंद्री लावुन वने वने मंत्रली
कधीच सुटले क्षितिज मिठीतुन अवघडलेले क्षण
शांत कोश जाहला मनाचा आणि थांबले रण
आकाशाला तेव्हा कळले श्रावणपण इथले
जेव्हा त्याचे अंग व्यापुनी इंद्रधनू हासले
घुसमटला मनपक्षि तरंगत गेला वाऱ्यावर
तरतरित जाहला पिउन तो व्योमातिल अत्तर
२. श्रावणी सोहळा
स्वपाळू झालेले
घन हे गाभूळ
जड झाला भार
कधी मोकळेल ?
ओलेती चाहूल
क्षितिजा लागली
हल्लकशी सर
खाली उतरली
उन्हात झळाळे
धारांचा कोसळ
कोडे सप्तरंगी
व्यापते आभाळ
….
आभाळते मन
थेंबचिंब गात्रे
भरो भरो आली
देहातील पात्रे
माथियाचा गाभा
पुरा फुलारला
सृजनाचा कोंभ
सुखे अंकुरला
दूर होत गेल्या
जडतेच्या कळा
देहाच्या मनात
श्रावणी सोहळा
३. श्रावणमय
आषाढ जरासा सरता
श्रावणमय झालो पुरता..
गात्रांत झिरपती धारा
झिणझिणती जाणिवतारा
ओलेता उन्ह-उबारा
हळुवार सुखे अनुभवता
श्रावणमय झालो पुरता
सळसळती झळझळ पाने
रानात मख्मली गाणे
रंगात पिसारत जाणे
हे मंतरले क्षण अनुभवता
श्रावणमय झालो पुरता
भारल्यात राउळवाटा
हृदयात घणघणे घंटा
ओंकारलहरत्या लाटा
दुथडीने तट हे भरता
श्रावणमय झालो पुरता
— रचना :सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तिन्ही कविता उत्कृष्ट