पूर्वी सर्वच लोक लग्न, मुलांचं बारसे किंवा इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आमंत्रित लोकांना स्टीलच्या ताटात किंवा पत्रावळीमध्ये भोजन देत. तसेच, वरण व भाजीसाठी वाट्याही स्टीलच्याच असत. पाणी पिण्यासाठी दिले जाणारे ग्लास ही स्टीलचेच असत. आज तुम्हाला हे वाचून कदाचित खूप आश्चर्य वाटेल ! किंवा काय हा वेडेपणा आहे, असेही वाटेल. पण, हा वेडेपणा नाही तर त्या काळातील शहाणपणा, सांस्कृतिक घरंदाजपणाहोता असंही म्हणता येईल.
सध्याच्या काळात याबाबत बोलायचे झाल्यास हा शहाणपणा, सांस्कृतिक घरंदाजपणा याची अत्यंत आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या संस्कृतीमुळे हिंदू संस्कृतीची धार्मिकता, शिस्तबध्दता जपली जात असे. कारण, सर्व लोक शिस्तबद्द पध्दतीने जमिनीवर बसून जेवण करीत असत. त्यामुळे, कार्यक्रमात कुठलीही गडबड किंवा गोंधळ होत नसे. तसेच, कोणीही आजारी पडत नसे. पण आज मात्र या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शिस्तबद्ध पध्दतीमध्ये बदल व्हायला लागला आहे. कारण, चहा,नाष्टा व जेवण यासाठी हलक्या वजनाच्या प्लास्टिकच्या वाट्या, मग, कप, प्लेट, ताट इत्यादी वस्तूंचा वापर सुरु झाला. तसेच, बाजारात, किराणा दूकानांतून, भाजीच्या दूकानांतून वस्तू व भाजीसाठी प्लास्टिकच्या हलक्या दर्जाच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरु झाला.
एकविसाव्या शतकाच्या दूस-या दशकापासून तर भंगार टाकावू व तुटलेल्या वस्तूंपासून हलक्या दर्जाच्या प्लास्टिक बादल्या, टोपले, निरनिराळ्या वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येवू लागल्या. त्यामुळे, विसाव्या शतकात वापरात असलेली तांब्याची, पितळेची व स्टीलची भांडी दूकानदार व लोक सर्वसाधारणपणे वापरेनासे झाले. तसेच, टिफीन बाॅक्स आतून स्टील व त्याला प्लास्टिकचे आच्छादन अशा वस्तू बनविल्या जावू लागल्या. त्यामुळे, भारतात सर्व राज्यांतील सर्व शहरात प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणात वाढला.त्यामुळे, प्लास्टिकचे मार्केट, बाजार खूप प्रमाणात वाढला गेला. तो इतका की, प्लास्टिकच्या खूर्च्या, प्लास्टिकचे पलंग, टेबल, रॅक, खिडक्या, दरवाजे बनविण्यासाठी सुध्दा मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होऊ लागला. त्यामुळे, प्लास्टिकच्या वस्तूंचे प्लास्टिक भंगार खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. ईतर दैनंदिन कच-याबरोबर प्लास्टिकच्या कच-याचे ढीग वाढायला लागले. त्यामुळे, त्या कच-याची वाट कशी लावायची हा प्रश्न नगरपालिका आणि महानगरपालिकांना पडला आहे .त्यामुळे, त्याच्यावर पर्याय शोधायला त्यांनी सुरुवात केली. तेव्हा काही ठिकाणी शहरांमध्ये कच-यापासून खत बनविण्यास सुरुवात झाली.

पण, हे खत बनविण्याचे उद्योग फार कमी प्रमाणात राबविले गेल्यामुळे कच-याचा मूळ प्रश्न मात्र तसाच बाजूला पडला. शहरातील प्रत्येक घरातील कचरा तसेच, औद्योगिकीकरणामुळे अनेक प्रकारच्या कंपन्यांमधून बाहेर टाकला जाणारा कचरा यांचं प्रमाण खूप वाढल्यामुळे शहरांतील रस्त्यांवर कच-यांचे डोंगरच उभे राहू लागले. त्यामुळे, सर्वत्र तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली. त्यामुळे, महानगरपालिकांनी शहराच्या बाहेर माळरानावर कचरा डेपो उभारला. पण, त्या कचराडेपोच्या कच-याच्या उग्र वासाचा त्रास त्या लगतच्या भागातील रहिवाशांना झाल्यामुळे अनेक ग्रामस्थांना अनेक विकार झाले. त्यामुळे, ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे महानगरपालिकेला तेथून कचराडेपो हलवावा लागला. असाच प्रकार अनेक खेडेगावात झालेला आहे. हा सर्व जनतेच्या आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. यासाठी, महानगरपालिकांकडून व शासनाकडून गांभिर्याने विचार करून ठोस उपाययोजना केली गेली पाहिजे.
स्थानिक पातळीवर काही ठिकाणी शहरात ज्या त्या भागात ट्रकवर मशिनद्वारे जमा कच-याचे खत बनविल्याचे दिसून आले. या खतांची मनपा विक्रीही करु शकते. त्यामुळे, यापासून महानगरपालिकेला खूप उत्पन्नही मिळेल. असाच प्रयोग सर्वच शहरात सर्वच भागात करण्यात आल्यास सर्व शहरात कच-याचा प्रश्न निकाली निघू शकेल. यात प्लास्टिक कच-याचे प्रमाण खूप वाढीस लागले आहे.
आता एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात तर प्लास्टिकच्या अतिवापरामुळे प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू यांमुळे होणारे दूष्परिणाम: भारतात सर्वत्र प्लास्टिक वस्तूंचा व प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आलेला आहे. त्याचे दूष्परिणाम पर्यावरणावर व सर्व जनतेच्या आरोग्यावर होत आहेत. शासनाने प्लास्टिक वस्तूंवर बंदी घातली असतानाही सर्रासपणे दूकानदारांकडून व ग्राहकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. या प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरुन बरेच लोक रस्त्यावरच कचराकुंडीच्या ठिकाणी दूचाकीवर येऊन हाताने प्लास्टिकची पिशवी फेकून निघून जातात. त्या पिशवीत काही शिळे अन्नपदार्थही असतात. ते पदार्थ रस्त्यावरील कुत्रे, गाई खातात. पण ते खाताना गाईच्या पोटात प्लास्टिकची पिशवीही जाते. काही लोकांच्या अशा निष्काळजीपणाच्या वागणुकीमुळे नाहक अशा गाईंना त्यांच्या प्राणास मुकावे लागते. याचा सर्वांनी अत्यंत गांभीर्याने विचार करुन आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनानेही अशा दूष्कृत्ये करणा-या लोकांवर अत्यंत कडक कारवाई केली पाहिजे. बेशिस्तपणे वागणा-या अशा लोकांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तसेच नद्यांमध्येही काही महानगरपालिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने अशा महानगरपालिकांस मोठा दंड ठोठावला आहे. काही सोसायट्यांचे दूषित मैलापाणीही पाइपलाइनद्वारे सोडून दिले जाते. तसेच, कांही केमिकल कंपन्यांचे दूषित रासायनिक पाणीही नद्यांमध्ये सर्रास सोडून दिले जाते. या सर्व प्रदूषणामुळे शहरी भागातील व ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. तसेच, त्यामुळे, नदीतील अनेक जलचर प्राणीही प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडतात. हजारों मासे मरतात. मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांची उपासमार होते. त्यामुळे, त्यांचा रोजीरोटीचा व्यवसाय बंद होतो. नद्यांमध्ये होत असलेल्या या प्रदूषणामुळे निसर्गचक्रावर व पर्यावरण संतुलनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यामुळे, पाऊस फक्त पावसाळ्यातच न पडता वर्षभर पडत आहे. तोही विषम प्रमाणात पडत आहे. देशाच्या काही भागांमध्ये जिथे पाऊस पडला आहे तिथे तिथेच पून्हा पून्हा पडत राहतो. दूस-या भागांमध्ये मात्र थोडाही पाऊस पडत नाही. म्हणजे बहुतांश राज्यांच्या काही भागात ओला दूष्काळ व काही भागात कोरडा दूष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते. याला कारण सर्व प्रकारचं प्रदूषणंच आहे. कांही कांही लोक तर रस्त्यावरच दिवसा रात्री प्लास्टिक वस्तू, प्लास्टिक कचरा जाळतात. त्यामुळे, त्याचा भयानक घाण वास सर्वत्र सुटत राहतो. त्यामुळे, त्या भागातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. सन २०२० नंतर तर या प्लास्टिक उत्पादनांवर शासनाकडून बंदी घालूनही प्लास्टिकच्या वस्तूंचे रुपांतरीत स्वरूपात अनेक प्रकारचे वजनाने हलक्या जाडीने अगदी पातळ वस्तूंच्या रुपात जसे, छोटे,कप, मोठे कप, वाटी,ताट, प्लेट आदी स्वरूपात उत्पादन करुन त्यांची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. पाच मिलीग्रॅमच्या आतील अत्यंत पातळ पिशव्यांचीही सर्रास विक्री व वापर दूकानदार व ग्राहकांकडून केला जातो आहे.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या नुकत्याच सर्वेक्षणानुसार सध्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने लोकांना चहा, सरबत, पाणी,रस ज्या प्लास्टिकच्या ग्लास मधून दिले जाते, त्या ग्लासच्या आतील बाजूस रासायनिक द्रव्याचा थर असलेला कागद चिकटविलेला असतो. त्यामुळे चहा गरम राहतो व त्यास वेगळी चमक येते. परंतु, त्यातील मुख्य छूपी गोष्ट अशी की, कपाच्या आतील बाजूस लावलेल्या रासायनिक द्रव्यामुळे माणसाच्या शरीरात अंतर्गत भागात घातक परिणाम हळूहळू होत असतात. एक वेळा अशा प्रकारच्या कपातून दूध, पाणी, रस प्यायल्यास २५ मायक्रोग्रॅम विषारी द्रव्य पोटात जाते.
दिवसातून चार वेळा जर अशा कपातून तुम्ही पातळ पदार्थ सेवन केले तर एक ग्रॅम विषारी द्रव्य पोटात जाते. रोज टपरीवर चहा विक्री करणारे तसेच, मोठे थर्मास व अशा प्रकारचे दोन तीन डझन कप हातात घेवून विक्री करणारे लोक अशाच प्रकारे चहा, सरबत, काॅफी फळांचा रस विकत असतात. त्यांना लोकांच्या आरोग्याशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त स्वतःचा धंदा बघत असतात.
आतातर लोकांचे स्टीलची भांडी वापराचं प्रमाण दैनंदिन जीवनात वीस टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. तसंच, तांबे व पितळेची भांडी तर विसाव्या शतकातंच इतिहासजमा झाली आहेत. ह्या प्लास्टिकच्या वस्तू माणसाच्या जीवनात साईलेंटकिलर सारखं काम करीत आहेत. परंतु, माणसाला मात्र त्याचा पत्ताच नाही. आणि जरी त्याला सांगितलं की, बाबारे!हे प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये जेवणं तुझ्या जिवाला घातक आहे. पण, माणूस यावर विश्वास ठेवत नाही. अशा विश्वास न ठेवणा-या माणसांचं प्रमाण हजारोंनी नव्हे तर आता लाखोंनी वाढलं आहे. यात कागदी प्लास्टिक व जाड प्लास्टिक प्लेट्सचा हा धंदा करणा-यांचा व्यापार खूप जोरात चाललेला आहे. यावर राज्य शासनाकडूनही कोणतीही बंदी किंवा बंधन आणल्याचे दिसून येत नाही. तसे, असेल तर फक्त कागदोपत्री कार्यवाही झाली आहे असेच म्हणावे लागेल.
कारण, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार प्लास्टिकच्या वस्तूंचा शिरकाव माणसाच्या रोजच्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या खाण्यापिण्याच्या वस्तूतून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे वृत्त काही न्यूज चॅनेलनी दाखविले आहे. तसेच, काही वर्तमानपत्रातही याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यात झालेल्या संशोधनानुसार असे निदर्शनास आले आहे की, प्लास्टिकच्या ताटातून दैनंदिन नाष्टा, जेवण केल्यानंतर व तसेच, उपरोल्लेखित रसायनयुक्त कपातून वारंवार पाणी, चहा, सरबत पिल्यामुळे नकळतपणे त्यातील प्लास्टीक एक मायक्रोग्रॅम पासून हळूहळू शरिरात जमा होण्यास सुरुवात होते. त्यांचे प्रमाण नंतर एक मिलीग्रॅमपासून वाढत वाढत दहा ग्रॅम ते पन्नास ग्रॅमपर्यंतसुध्दा वाढत जाते. त्यामुळे आईचं दूध जे लहान एक दोन वर्षाच्या बाळाला पाजलं जातं त्यातही प्लास्टिकचे प्रमाण आढळून आले आहे. म्हणजे याचा अर्थ आईच्या शरीरातून बाळाच्या शरीरात प्लास्टिक कण द्रवरुपात दूधातून स्थलांतरित होतात. हे तज्ज्ञांच्या सत्य पडताळणीत खरे ठरले आहे. इतकी ! अत्यंत गांभीर्याने घेण्याची ही अत्यंत आवश्यक बाब आहे. यावरुन सर्वच माणसांनी काय धडा घ्यायचा, काय शिकायचे हे ठरविणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, याबाबतीतील दूसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की, “मेंदूत प्लास्टिक ! डोक्यात काय बटाटे भरलेत का ! असे विनोदाने एखाद्याला म्हटले जाते ! एका वृत्तपत्रात या बातमीचे वृत्त प्रकाशित झाले आहे. पण, आता सध्याच्या काळात डोक्यात बटाटा ऐवजी डोक्यात काय प्लास्टिक भरले आहे का ? असं गांभीर्याने म्हणण्याची वेळ आली आहे. नेचर मेडिसीन संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालाद्वारे ही गोष्ट उघड झाली आहे. स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये मायक्रो नॅनो प्लास्टिक कणांचे प्रमाण इतरांच्या तुलनेत जास्त आढळले. ही धोक्याची घंटा आहे. प्लास्टिक जळी, स्थळी, काष्ठी व पाषाणी मायक्रोप्लास्टिक, नॅनोप्लास्टिक सूक्ष्म अतिसूक्ष्म कणांच्या स्वरूपात आढळते. श्वास घ्या, प्लास्टिक कण शरिरात! पाण्याचा घोट घ्या प्लास्टिक कण शरिरात ! अन्नाचा घास घ्या प्लास्टिक कण शरिरात अशी परिस्थिती आहे.

शरीरातील प्रत्येक अवयवांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्मकण जमा होत आहेत. रक्तात, रक्ताच्या गुठळ्यांत, यकृतात सर्वत्र प्लास्टिकचे कण अत्यंत सुक्ष्म स्वरुपात तुमच्या शरीरात जमा होत आहेत. त्याचा तुम्हाला थांगपत्ताही नाही आहे. नेहमी होणा-या सणासमारंभात मायक्रोप्लास्टीकयुक्त कागदी कपांचा वापर कोणतेही लोक चहा, काॅफी, दूध, ज्यूस, पाणी देण्यासाठी सर्रासपणे करीत आहेत. ते कप केमिकलयुक्त ड्राय द्रवस्वरुपात असतात. चहापाणी,ज्यूस पिताना ते द्रवात रुपांतरीत होऊन माणसाच्या शरीरात जातात. मुख्य आश्चर्याची गोष्ट अशी की, उपरोक्त दर्शविलेले पदार्थ पिणारी बायका,माणसं, तरुण, तरुणी तसेच,हे पदार्थ विकणारेही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. विकणा-यांचं काही नुकसान होत नाही. पण, पिणा-याच्या शरीराचं मात्र अतोनात नुकसान होतं. हे त्यांना नुकसान झाल्यावर समजतं. पण, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तसेच, त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे, याबाबतीत, सामाजिक स्तरावर, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर तसेच, देशस्तरावरही याबाबतीत सामाजिक प्रबोधन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तसेच, मानवी जीवनास आणि मानवी आ!रोग्यास अत्यंत हानिकारक अशा केमिकलयुक्त प्लास्टिकच्या सर्व घटकांवर, वस्तूंवर अत्यंत कडक बंदी घातली पाहिजे. त्याचे पालन सर्वांनीच करणे अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टींचे पालन पुर्णपणे होते की नाही यासाठी संबंधित खात्याकडे म्हणजे त्या खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ही देखरेखीची जबाबदारी सोपविली पाहिजे. तसेच, अशा घातक प्लास्टिक वस्तूंची आणि केमिकलयुक्त प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांवर तसेच, याबाबतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दूकानदारांवरही अशा घातक वस्तूंची विक्री केल्याबद्दल अत्यंत कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

कारण, अशा घातक वस्तूंमुळे तसेच, सर्व प्रकारच्या वाहनांमधील अत्यंत प्रदूषित असणा-या कार्बन डायऑक्साइडच्या मोठ्या प्रमाणावरील उत्सर्जनामुळे माणसे, पशु, पक्षी व प्राणी यांच्या आरोग्यास खूप मोठ्या प्रमाणात धोका उत्पन्न झालेला आहे. तसेच, पर्यावरणाच्या संतुलनावरही त्याचा खूप परिणाम झाल्यामुळे पर्यावरण संतुलनही त्यामुळे खूप अस्थिर झाले आहे . याचा परिणाम सर्व ऋतूंवरही खूप झाल्यामुळे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांचे ऋतूमानही बदलून गेले आहे. कुणामुळे हे सारं वातावरण, हवामान बदलले गेले आहे. तर, सांगायची मुख्य बाब अशी की, काही स्वार्थी लोकांमुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, अशा लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे. त्यांचे दूष्परिणाम सर्वं जगाला, निसर्गसृष्टी मला, मानवसृष्टीला आणि इतर जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत. हे दूष्कर्मी लोक शासकीय यंत्रणेच्या लोकांना हाताशी धरून वाममार्गाने खूप रक्कम देवून भ्रष्टाचाराने जंगलातील अमुल्य निसर्गसंपत्ती तोडून, फोडून व लूटून त्यांची विक्री करीत आहेत. यामुळेच निसर्गाचा -हास होत आहे. निर्जल, निर्जन जमिनींचे प्रमाण वाढून जमिनींचे तापमान खूपंच प्रमाणात वाढत चालले आहे. हा उद्योग कशासाठी चालला आहे! तर, अमाप,अगणित पैशांसाठी! एवढी धनसंपत्ती मिळवून सुध्दा ही माणसं सुखी नाहीत. मनाने, धनाने आणि आरोग्यानेही वखवखलेलीच आहेत. तरीसुद्धा, त्यांची पैशांची हाव काही सुटता सुटत नाही. बरं! मुख्य गोष्ट अशी की, तहान लागली तर पाणींच प्यावं लागणार आहे ह्या लोकांना! पैसे काही पिता येणार नाहीत त्यांना. त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्याही विचार हे लोक करीत नाहीत. इतकं पैशाच्या, धनाच्या, इस्टेटीच्या मोहाने आंधळे झाले आहेत हे लोक ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे.
देशस्तरावर नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या वीस वर्षांत ८४टक्के जमिनीवर ‘ हीट स्ट्रेस ‘ वाढलेला दिसून आला आहे. त्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की, थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारं पुणे शहर वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे आणि सिमेंटच्या जंगलांमुळे याशिवाय हरित आच्छादन व हरितपट्टा यांचे दरमहा व दरवर्षी खूप कमी कमी होत असल्याने पुणे शहर उष्णतेचे शहर म्हणून गणले गेले आहे. हेच नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. दशकभरातील तापमानवाढ अंश सेल्सिअसमध्ये : पुणे०.५५, रायपूर, जयपूर, अहमदाबाद, पाटणा, नाशिक इत्यादी शहराचे तापमान पुण्यापेक्षा ०.१, ०.२ या फरकाने कमी आहे. एकंदरीत सर्वच शहरांचे तापमान वाढत चालले आहे.
शहरीकरणामुळे उष्णतेत झालेली वाढ
१. जमशेदपूर ९९.९९
२. रायपूर ७७.०२
३. पाटणा ६७.१७
४. पुणे ६१.२३
५. नाशिक ५३.३०
६. नागपूर ४५.७७
७. लखनो ४५.२८
उपरोक्त शहरांमध्ये शहरीकरणात वाढ झाल्यामुळे तसेच, काॅंक्रीटच्या जंगलवाढीमुळे आणि मुख्य म्हणजे, १९९९ ते २०२१ या कालावधीत हरित आच्छादन व जलस्रोत टक्यामध्ये खूप प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे, हरितगृह, हरीत उद्याने, व हरीत वनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून आली आहे. दिसून येत आहे. त्यामुळेच अनेकानेक शहरातील तापमानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच, ही तापमानात झालेली वाढ रोखण्यासाठी, थांबविण्यासाठी फार मोठ्या उपाययोजनांची, शिस्तबद्ध पद्धतीने त्या राबविण्याची आणि अथक प्रयत्नांची तसेच, सर्वांच्या सहकार्याची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. तरंच पृथ्वीच्या वाढत जाणा-या तापमानात फरक पडून घट होऊ शकेल. यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अत्यंत परिणामकारक योजनांची त्यांच्या हाताखालील शासकीय, निमशासकीय व जिल्हापरिषद स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची व त्यांच्या प्रामाणिकपणे काम करण्याच्या सेवेची तसेच, सर्व सार्वजनिक संस्था, महामंडळे तसेच, समाजसेवकांच्या सहकार्याची व सेवेची अत्यंत आवश्यक आहे. या सर्वांच्या अथक परिश्रमातूनच मग सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं योग्य वातावरण पृथ्वीचं योग्य तापमान स्थिर राहण्यास मदत होईल. जेणे निसर्गाचं व पृथ्वीचं पर्यावरण संतुलन स्थिर राहील. त्यामुळे, मानवसृष्टी व जीवसृष्टीचं जीवनही स्थिर व आनंददायी राहील. यासाठी देशस्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी सदैव सतर्क व कार्यक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !

— लेखन : मधुकर ए.निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800