अंध मुलींना आत्मनिर्भर बनवावं आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावं यासाठी पुण्यातील नऱ्हे परिसरात स्वतः अंध असणाऱ्या कविता व्यवहारे यांनी “सुकन्या अंध मुलींचा महिलाश्रम” सुरू केला आहे.
या संस्थेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या अंध मुलींच्या निवासाची व भोजनाची उत्तम सोय केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कौशल्य विकासासाठी ही विविध उपक्रम राबवले जातात.

रोटरी क्लब ऑफ औंध यांनी या संस्थेत नुकत्याच आयोजित केलेल्या दोन दिवसीय स्वयंसिद्धता व सहसंवेदना सजगता कार्यशाळेत २१ अंध युवती सहभागी झाल्या होत्या.
या कार्यशाळेत पुढील गोष्टी शिकवल्या गेल्या :
● पांढरी काठी कशी वापरायची ?
° पायऱ्यांची रचना समजून घेऊन पायऱ्या कशा चढायच्या-उतरायच्या ?
» प्रत्यक्ष रस्त्यावर पांढरी काठी घेऊन सुरक्षीतपणे कसे चालायचे ?
★ वेगवेगळ्या भाज्या व फळे स्पर्शाने व गंधाने कशा ओळखाव्यात ?
» रोजच्या वापरातील वेगवेगळी धान्ये, कडधान्ये व खाद्यपदार्थ स्पर्शाने व गंधाने कसे ओळखायचे ?
■ आवाज ऐकून वेगवेगळे पक्षी-प्राणी व त्यांचे स्थान कसे ओळखायचे?
● दिशा कशा ओळखायच्या ?

- स्नायूंची लवचिकता वाढवण्यासाठी व्यायाम पध्दती ?
- इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर कसा करायचा व दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करायची ?
- कार्यकर्ते व शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रकार, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग कसा काढायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले
श्री स्वागत थोरात यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. तर स्वरूपा देशपांडे यांनी कार्यशाळा समन्वयक व सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यशाळेत संस्थेतील मुलींबरोबरच कविताताईंनीही पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे चालायचे याचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कविताताई म्हणाल्या, “स्वागत सर, अंधत्व आल्यानंतर आजपर्यंत कोणाच्या मदतीशिवाय मी एकटी स्वतंत्र कधीच चालले नव्हते. संस्थेपासून केवळ ५० मीटरवर असलेल्या माझ्या घरातून संस्थेत येण्यासाठीही मला कोणावर तरी अवलंबून राहावे लागत होते. तुम्ही दिलेल्या या प्रशिक्षणामुळे आता पांढरी काठी घेऊन मी एकटी संस्थेत येऊ-जाऊ शकेन हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.”
या संस्थेबद्दल अधिक माहितीसाठी आणि संस्थेला मदत करायची असल्यास 9730080861 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
कविता व्यवहारे यांना मनःपूर्वक शुभेच्छा स्वतःच्या मार्गात अडचणी असताना सुद्धा दुसऱ्याला मदतीचा चा हात देणं म्हणजे खरंच ग्रेट🥰 तुम्हाला माझा सलाम👏