कबुतरांचा मोर्चा !
जंगल मंगल विद्यापीठाचे कुलगुरू वाघ निवांत बसले असताना त्यांना बाहेर गोंधळ ऐकू आला. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
खरे तर गेले काही दिवस जंगल मंगल कॅम्पस शांत होते. सगळे प्राणी पक्षी पावसाने चिंब झालेल्या हिरव्या सृष्टीचा आनंद घेत होते. अचानक हा गोंधळ कशासाठी म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हढ्यात अधिष्ठाता म्हैस अन् कुलसचिव गाय एकत्र येताना दिसले.
“कशाची गडबड आहे एव्हढी ?” त्यांनी उत्सुकतेने विचारले.
“सर, कबूतर आले आहेत मोठ्या संख्येने शेजारच्या शहरातून”
“कशाला ? अचानक काय झाले त्यांना मोर्चाने यायला ?”
“आम्हालाही नीट कल्पना नाही. टेंट हटाव. दाना देव असे ओरडताहेत.”
“तुम्ही असे करा. त्यांच्या आठ दहा प्रतिनिधी कबुतरांना चर्चेसाठी बोलवा. गुहेत जास्त गोंधळ नको.”
“यस सर“
कुलगुरूंच्या सूचनेप्रमाणे कबुतरांच्या दहा प्रतिनिधी नेत्यांना गुहेच्या दालनात बोलवण्यात आले.
“हमारी मांगे पुरी करो.. हमारे दाने वापस दो. टेंट हटाव“
नारेबाजी करत कबुतरांचा जमाव आत आला.
“बोला काय भानगड आहे ?” कुलगुरू वाघ सौम्य डरकाळी च्या स्वरात विचारते झाले.
“भानगड नाही.. आमचा हक्क आहे. आमचा जगण्याचा हक्क आहे. पोटा पाण्याचा प्रश्न आहे”
कबुतर नेता तावातावाने सांगायला लागला.
“पण नेमके झाले तरी काय ?” वाघाने विचारले.
गाय सांगायला समोर आली तसे कुलगुरू वाघांनी तिला मध्येच थांबवले.
मग दुसरे कबूतर सांगायला लागले.
“आम्हाला शहरात, काही चौकात आमचे दाणे मिळत असत. काही दयाळू मंडळी रोज आम्हाला दाणे टाकतात खायला. वर्षानुवर्षे हे चालू आहे. हे काही आताच सुरू झाले असे नाही. काही माणसात दयामाया टिकून आहे. काही धार्मिक मंडळी प्राण्याची काळजी घेतात. याला प्राणी मात्रा विषयी भूतदया म्हणतात. आता सगळे कबूतर एकत्र खाण्यासाठी जमले तर गोंगाट होणार. गैरसोय होणार. रस्त्यात जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांची गैरसोय होणार. त्यात चूक ती काय आमची ?”

हे सगळे लाईव्ह चित्रित करायला मिडिया होतीच बरोबर. त्या पैकी एक रिपोर्टर म्हणाला, ”प्रश्न यांच्या पोटा पाण्याचा नाहीय. झुंडीने येणाऱ्या कबुतरांचा जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. आवाज होतो. ट्रॅफिक अडतो. म्हणून नगर पालिकेने हे कबूतरखाने बंद करायचा, हटवायचा निर्णय घेतला. कबुतरं येऊ नयेत म्हणून मोठा टेंट लावलाय“.
“म्हणजे आमच्या पोटा पाण्यावर लाथ मारली आहे ! फूटपाथ वर दुकाने मांडणाऱ्या फेरी वाल्याचा यांना त्रास होत नाही. तंबाखू खाऊन पीचकारी मारून रस्त्यावर घाण करणाऱ्या माणसाचा त्रास होत नाही. प्लास्टिकचा कचरा कुठेही फेकणाऱ्या सुशिक्षित नागरिकांना ते स्वातंत्र्य, तो हक्क यांनी दिलाय. आधी त्यांना दंड करा. मग आमचा दाना पानी रोखा.. या परिस्थिती ला कारणीभूत कोण आहे ? या माणसांनी हिरवी गार जंगलं तोडली अन् काँक्रिट ची जंगलं उभारलीत. समृद्धी महामार्ग हवे यांना. वनराई नको. पशु पक्षी नकोत. फुलं पानं वेली नकोत. आज यांच्या शहरात आईने चिऊ काऊ चा घास भरवायचा तर बाळाला दाखवायला आहेत कुठे कावळे चिमण्या.. पोपट ? सगळ्यांना हाकलून लावले या माणसांनी गावातून, शहरातून ! आज गावात, शहरात शेणाने सारवलेले अंगण, त्या अंगणात तुळस, त्यासमोर रांगोळी या संकल्पना उरल्या कुठे लहान मुलांना दाखवायला, सांगायला ? आपल्या सुख समृद्धी साठी शहरीकरणाच्या नावाखाली यांनी जंगलं तोडली, पहाड उध्वस्त केले बोगदे बांधायला, गाय, म्हैस, घोडे, कावळे चिमण्या पोपट सगळ्यांना हाकलून लावले या राक्षसी माणसांनी शहराबाहेर. यांना गुळगुळीत हायवे हवेत सहा पदरी, ओव्हर ब्रिजेस हवे मेट्रो साठी. बाग बगीचे नकोत. खेळाची मैदाने नकोत. गर्द झाडी, हिरव्या वेली, पानेफुले नकोत. आता ते आमच्या जीवावर उठलेत. यांची हौस म्हणून ते कुत्रे पाळतील. घरात मासे आणतील रंगीत काचेच्या पेटीत बंदिस्त ठेवायला. एकूण काय यांना निसर्गाविरुद्ध जायचे आहे. यांना स्वतःचे जग निर्माण करायचे आहे. मुख्य म्हणजे ज्याने आपल्या सर्वांना निर्माण केले त्या विधात्याच्याच विरोधात हे मानव नव्हे दानव उभे ठाकले आहेत. कुणीतरी यांना धडा शिकवायला हवा. आपण जंगल मंगल विद्यापीठाने नवे धोरण स्वीकारून या माणसांना चांगला धडा शिकवायला हवा. म्हणजे ही ते ए आय, व्हाय फाय अन् काय काय सगळं विसरतील अन् रस्त्यावर येतील.”
या मोर्चाचे, निवेदना चे चित्रीकरण करणारे मिडियावाले, तसेच शेजारच्या कॅम्पस मधले शिकाऊ पत्रकार सावध झाले ब्रेकिंग न्युज साठी ! त्यातील एक उमदा पत्रकार आपले ज्ञान पाजळण्यासाठी पुढे आला. तो पी एच डी साठी शेजारच्या विद्यापीठात संशोधन करत होता.
“या कबुतरामुळे आमच्या फ्लॅट च्या बाल्कनीज घाण होतात. आमच्या घरात त्या घाणीमुळे, यांच्या विष्ठेमुळे रोग पसरतात. त्या आवाजाने आमच्या मुलाची झोप डिस्टर्ब होते. सर्वांना त्रास होतो त्याचं काय ?”
“मी उत्तर देतो या बिनडोक पेपरवाल्याला.. मला एक सांग भाऊ.. तुमच्या फ्लॅट कॉम्प्लेक्स ची उच्चभ्रू मंडळी आपले घरगुती कुत्रे रस्तावर आणतात शी करायला. तुम्ही मर्सिडिज मधून हायवे वर जाताना प्लास्टिक च्या पिशव्या, बाटल्या सहज रस्त्यावर फेकता. तुम्ही रस्त्यावर थुंकता.. कडेला चक्क लघवी सुद्धा करता वेळ पडल्यास. तेव्हा तुमच्या आरोग्याला धोका नाही पोहचत ? त्याचा त्रास होत नाही तुमच्या कुटुंबाला ? त्याने तुमचे सामाजिक आरोग्य बिघडत नाही ? हा चांगला न्याय आहे उफराटा !!”. कबुतरांच्या नेत्याने आपली फडफड तावातावाने व्यक्त केली. सगळ्याची बोबडी वळली.

वाघांनी अधिष्ठाता म्हैस च्या कानात काहीतरी सांगितले. त्यांनी गायीशी कुजबुज केली.
“कबुतरांची मागणी आम्हा सगळ्यांना न्याय्य वाटते. त्यांच्या तक्रारीत तथ्य आहे. अनेक बाबतीत आपला जनावराचा माणसांना त्रास होतो हेही खरे आहे. पण त्याला तेच जबाबदार आहेत हेही तितकेच खरे. ही परिस्थिती त्यांनीच निर्माण केली. आपण नाही. विधात्याने प्रत्येक प्राण्याला त्याचे क्षेत्र आखून दिले निर्माण करताना. पण माणसाने हव्यासापोटी सीमोल्लंघन केले. मर्यादा ओलांडल्या. झाडे तोडली. नद्या वळवल्या. हिरवे डोंगर जमीनदोस्त केले. समुद्र आत घेतले. आम्हा प्राण्यांना, पशु पक्षांना बेघर केले. असा माणूस सुखी होणार नाही. ते संगणक, ते ए आय, वाय फाय.. काहीही त्याच्या कामी येणार नाही. आपण जंगल मंगल विद्यापीठात नेहमी नैतिकता जोपासली आहे. निसर्ग जोपासला आहे. आपले शिक्षण आपल्या सर्वांच्या भल्या साठी आहे. कुणा एका वर्गासाठी, एका पंथासाठी नाही. कबूतर मंडळींनी निर्धास्त असावे. आमची वानरसेना ते तंबू उखडून टाकतील आज रात्रीच. तुम्हाला दाणे मिळतील. तुमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही.” कुलगुरू वाघ यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा परतला. डीन म्हैस हिने वानरसेने साठी द्यायचे निर्देश कुलसचिव गायीला दिले.
दुसऱ्या दिवशी वानरसेने सगळे तंबू उखडून कबूतरखाने स्वतंत्र केले. हे सगळे घडले तेव्हा तिचाकी सरकारचे मुख्य, उपमुख्यमंत्री राजधानीत होते. तिथून इथली ब्रेकिंग बघत, सुंठेवाचून खोकला गेला म्हणत, हसत होते गालातल्या गालात !!

लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपाडे. माजी कुलगुरू, हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800