१. श्रावण पुत्रदा एकादशी
संतान दायिनी अपत्यांचे कल्याणकारी
बाळकृष्ण पुजनाने नोवांच्छित कार्यधारी
तांदळाच्या अक्षतांचे विष्णूस प्रियतेचे महत्व
पितवर्णी पुष्प तुळशी अर्चनी जाणीजे तत्व
ॐनमोभगवते नारायणाय जप करी
बाळकृष्णासवे महादेवाचे नाम मुखी स्मरी
भगवान विष्णू योगनिद्रेसी जाती
चातुर्मासाचे गायन, कीर्तन कथा गाती
महिष्मती नगरी राजा महीजित वावरी
परि तयासी नसे संतान दुःख मनी आवरी
राजा नित्य विष्णू सहस्त्रनाम पठण करी
व्रताच्या संकल्पनेतून पुत्र भाग्य लाभले त्वरी

— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई
२. जलधारा
बरसली जलधारा
सुखी झाली अख्खी धरा
मन थुई – थुई नाचे
माझ्या कानी सांगे वारा !१!
बरसली जलधारा
मोर फुलवी पिसारा
धुंद बेभान होऊन
साद घालतो लांडोरा !२!
बरसली जलधारा
निघे पक्षांचाच थवा
गाई गुरांच्या कळपात
वाजे स्वरमय पावा !३!
बरसली जलधारा
झुळुझुळू वाहे पाणी
छोट्या छोट्या बेटातून
खळखळ गातो गाणी !४!
बरसली जलधारा
होते नव्हत्याचे झाले
शेतकरी राजासह सारे
आता कामाला लागले !५!

— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800