Monday, January 26, 2026
Homeलेखहवाई दलातील माझ्या आठवणी : ४८

हवाई दलातील माझ्या आठवणी : ४८

“नवी विटी नवे राज्य”

हवाई दलात दरवेळेला बॉस बदलला की सगळे बदलून जाते त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला .पूर्वी तांबरम ला पोस्टिंग नको असे म्हणणारा मी, मधल्या काळात सरदारजी बॉस आल्यामुळे चित्र बदलून गेले आणि आमच्या एअर फोर्स स्टेशनला बेस्ट एअरपोर्ट स्टेशन म्हणून अवॉर्ड देखील मिळाले. मधल्या काळात मला तांबरम स्टेशनच्या क्रिकेटच्या म्हणून कामाला लावले गेले. त्यात भर म्हणून सिव्हिलियन लोकांची सोसायटी मला बळजबरीने चालवायला दिली गेली.

माझ्या पोस्टिंगच्या शेवटच्या काही महिन्यात एयर कमोडर प्रकाश देवी बॉस होते. देवींची माझी ओळख जुनी होती. राजस्थानात सुरतगडला ते स्क्वाड्रन लीडर असताना भेटलो होतो. तिथेच नंतर माझी ओळख स्क्वाड्रन लीडर प्रकाश मालवणकर यांच्याशी झाली. ते थोर अभिनेते दामूअण्णा मालवणकर यांचे चिरंजीव असल्याचे समजले होते. देवी सर सांगलीचे. कॅनबेरा पायलट होते. मिसेस देवी आणि माझी मिसेस यांच्यात बरीच जवळीक झाली आणि तिला हवाई दलातील लेडीजच्या कामात सामावून घेतले गेले.

मी अनेकदा परेड कमांडर असायचो. तांबरम हे एयरमन लोकांसाठी ट्रेनिंग स्टेशन असल्यामुळे पिटी परेड कंपल्सरी होतील. पाच स्क्वाड्रन, प्रत्येकी तीन फ्लाईट असे साधारण सहाशे ते सातशे एअरमन सेरीमोनियल परेड सराव करण्यासाठी करण्यासाठी दर सोमवारी होत असे. कमांड देतानाचा माझा आवाज २ किमी लांब घरापर्यंत येतो असे घरचे म्हणत. सौ अलका रोज सकाळी ५ किमी चालत जात असे.

तिकडे माझे नाडी ग्रंथ भविष्याचे कामही जोरात सुरू होते. देवी सरांचा खाक्या असा होता की ते कुठलेही काम किंवा निर्णय लगेच घेत नसत. मला विचार करायला वेळ द्या असे म्हणत आणि मधल्या काळात आपल्या जुनियर ऑफिसर्सशी चर्चा करून मगच निर्णय देत. त्यामुळे हाताखालचे त्यांच्यावर खुश असत. पण एकदा काही ठरवले की ते काम तडीला नेणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण होता. मध्यंतरीच्या काळात माझी पोस्ट श्रीनगरला आली. तिथे न जाणे सद्ध्याच्या काळात कसे शहाणपणाचे नाही असे बऱ्याच जणांनी सांगितले. तू तिथे आधी दोन वेळेला गेला असल्यामुळे श्रीनगरची पोस्टिंग टाळ असे म्हटले गेले. मी फक्त हो हो असं म्हणत असे. कारण श्रीनगरला पोस्टिंग गेल्यामुळे पुण्याचे चॉईस पोस्टिंग मला मिळवता येईल ते इतर कुठे गेलो तर शक्य नव्हते.

वन विंगला पुन्हा १९९६ च्या मे मध्ये श्रीनगरला पोहोचलो. तिथले वातावरण बदलले होते.आता ओळखीचा सिविलियन अब्दुल, अब्दुल बाबा झाला होता. त्याचे किस्से नंतर पुढे येतील.
तांबरम येथील सिव्हिलियन सोसायटीचे काम करताना मला बरेच काही शिकायला मिळाले. तमिळ लोकांना रेशन कार्डावर धान्य विशेष करून तांदूळ मिळत नसे. तेव्हा सरकारी नोकरांना काही धारेवर धरून तो कोटा डबल करून घेतला. दिवाळीला फटाके स्वस्थ दरात घेऊन विक्रीतून सोसायटीला फायद्यात आणले. सोसायटी सिव्हिलियन लोकांना लोन देत असे परंतु ते परत वेळेवर न फेडल्यामुळे पुन्हा कर्ज मिळत नसे. याचे कारण म्हणजे त्यांनी इतर घेतलेली कर्जे वसूल करायला पेमेंटच्या दिवशी येऊन दादागिरी करून त्यांच्या खिशातून पगाराचे पैसे घेऊन जात असतात. अशा दादा लोकांना गेटच्या बाहेर काढले. ते आम्ही बंद केले. अकाउंट सेक्शन मधूनच लोनचा हप्ता कापून उरलेला पगार दिला जाऊ लागला. पैसे वसुली काही महिन्यात सुरळीत झाली. बँकेकडून थेट कर्ज मिळण्याची सोय केल्यामुळे सोसायटीत काम करणारे लोक पैसे खात असत तेही बंद झाले. तमिळ लोकांना स्टेनलेस स्टीलची भांडी विकत घेण्याची हौस फार. म्हणून वार्षिक संमेलन भरून त्यात बोनसचे वाटप आम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी देऊन केल्यामुळे सोसायटी एकदम चर्चेत आली.

१९५६ सालापासून एक मोठी ढाल क्रिकेट बोर्डाकडून दिली जात असे. १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये तांबरम स्टेशनने ३०० एअरमननी गेट मॅनिंग करण्यासाठी दिलेल्या सेवेसाठी त्या ढालीवर आमचे नाव पुन्हा नोंदवले गेले. त्यावेळच्या मुख्यमंत्री जय ललिता यांच्या हस्ते ती ढाल वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मॅच नंतर सर्वांसमोर स्टेडियम मध्ये मला देण्यात आली. एकंदरीत माझ्या जीवनात तांबरम पोस्टिंग वेगळेच अनुभव देऊन गेले. नाडी ग्रंथ महर्षी अगस्त्य, कौशिक, महाशिव, काकभुजंदर अशांचे कृपाशीर्वाद मिळाले. प्राचीन भाषेची ओळख झाली. अनेक मंदिरांना भेटी दिल्या गेल्या. त्यातून माझे जीवन अधिक समृद्ध झाले यात शंका नाही.
क्रमशः

विंग कमांडर शशिकांत ओक

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments