१. कृष्ण कन्हैया
मंगल अशी पहाटवेळ
गोपाळांचा जमला मेळ ।
यमुनेच्या तीरी हा कान्हा
गोपगड्यांसह खेळे खेळ ।
गवळण येई पाण्याला
कान्हा वाजवी पावा सुरेल ।
गवळण भुलते बासरीला
घरा जाण्यास होई वेळ ।
कान्हा असता गोकुळांत
नुसती आनंदाची रेलचेल ।
कान्हाने दिला हा विश्वास
जो श्रध्देने मला भजेल ।
सुखदुःखाच्या कठीणसमयी
मी फक्त त्याचाच असेल ।
— रचना : सौ. सुनीता फडणीस. गोवा

२. समृद्धी
दही, दूध, लोणी
हंडीत एकत्र
काजमंडळात
शिदोरी सर्वत्र |१|
भक्तीचे प्रतीक
पोहे, वात्सल्याचे
दही मातृभक्ती
दूध माधुर्याचे |२|
विरोध भक्तीचे
ताक, लोणी असे
अविट गोडीचे
निर्गुणात्म वसे |३|
काल्यात लहरी
अग्रेसर भाव
दहीहंडी काला
सवंगड्या ठाव |४|
मध्य रात्री जन्म
यमुनेला पूर
चरणांचा स्पर्श
निद्रीस्त असूर |५|
गोविंद पथक
तालावर ताल
नाच गाणी गाती
करती धमाल |६|
माठाचा तुकडा
ठेवी सांभाळून
घरात समृध्दी
येते बहरून |७|
— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
