Wednesday, September 10, 2025
Homeलेखगुरुवंदना : रूद्र हांजी सर

गुरुवंदना : रूद्र हांजी सर

आज ५ सप्टेम्बर.. शिक्षक दिन. गेली कित्येक वर्षे हा दिन मी मूकपणे माझ्या परम पूज्य शिक्षकांची आठवण काढून त्यांना विनम्र अभिवादन करीत साजरा करते.

खरोखर मी अतिशय भाग्यवान. मला असे आदर्श शिक्षक लाभले. गुरु पौर्णिमेच्या दिवशी ‘गुरूर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..’ कोणाला म्हणावे हा कधी प्रश्नच मनात डोकावला नाही. शाळेच्या त्या गुरूंची आठवण आली की अजूनही नतमस्तक होते.

पद्माराजे कन्या विद्यालय, ग्वाल्हेर ही माझी शाळा. तेथे आम्हाला चित्रकला शिकवण्यासाठी एक शिक्षक होते. ते मूळचे कानडी. त्यांचा जन्म ७ मे १९११ रोजी कर्नाटकाच्या लहानशा गावी, तारिकेरे येथे झाला. पण अनेक वर्ष शांतीनिकेतनमध्ये राहिलेले. म्हणून संस्कार सर्व रवींद्रनाथ टागोरांचे. बोलण्याची ढब बंगाली. राहणे, पेहराव बंगाली. धवल शुभ्र धोतर आणि शुभ्र पांढरा सदरा. बांग्ला शैलीप्रमाणे धोतराचा एक सोगा सद-याच्या खिशात. सतत चित्रकला वर्गात चिंतन, मनन करणारे किंवा वाचत असणारे किंवा चित्र काढत बसणारे वा शिल्प कोरत राहणारे. साधी राहणी उच्च विचार याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे हे आदरणीय गुरु श्री. रूद्र हांजी.शिक्षण क्षेत्रासाठी स्वतःला वाहून घेणारे आज बोटावर मोजण्याएवढे तरी सापडतील का ? पण ते होते.सतत एकच ध्यास या शाळेचे नाव मोठे कसे होईल, मुलींना चित्रकलेची गोडी कशी लागेल ? त्यांना मी कोणत्या गोष्टी सांगू ? त्यांच्यावर कसे संस्कार करू? पण इंग्रजीत म्हणतात ना..values are caught not taught .. बस तेवढेच पुरेसे होते.

त्यांच्या वागण्याबोलण्यातूनच आम्ही शिकत गेलो, शिकण्याचा प्रयत्न करत राहिलो. सच्चेपणा, प्रेम, माया, ममता, उत्कृष्ट पुस्तकांचे वाचन, चित्रकला समजून घेण्याची दृष्टि, शिल्पात सौंदर्य शोधण्यासाठी गरजेची नजर आणि त्यांची जरब.रवीन्द्रनाथ टागोरांच्या आश्रमात वाढलेले शिष्य. नन्दलाल बोस, रामकिंकर अशा थोर कलावंतांची साथसंगत लाभलेले ते. रामकिंकर बैज हे तर त्यांचे गुरुच.दिल्लीच्या नॅशनल आर्ट गॅलरी आणि भारत भवन येथे बैज यांची शिल्पे प्रसिद्ध आहेत. त्यांना हेरले ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी आणि आग्रह करून आणले ग्वाल्हेरला. हे आमच्यावर केवढे उपकारच. त्यांची प्रथम आठवण येते ती,ते आमच्या घरी आले होते. का ? तर फक्त एक दुर्मिळ फूल बघण्यासाठी. कधीही कोठेही उगाचच न जाणारे, अव्याहतपणे आपल्या कामात मग्न असणारे एक थोर शिल्पकार आज आमच्या घरी येणार होते या विचारानेच सारे घर आनंदले होते.

ग्वाल्हेरच्या एका प्रतिष्ठित अभिभाषकाकडे एक महान चित्रकार येणार होते. ब्लड लीली नावाचे, असंख्य पाकळ्या असणारे, गुलाबी रंगाची उधळण करणारे त्या काळी दुर्मिळ असणारे ते फूल. आमच्या घरात उमलले होते. त्या फुलाने माझ्यावर कृपाच केली होती म्हणा ना. ते आलेत, वडील जुजबी बोलून आपल्या कामावर निघून गेलेत. आधी त्यांनी बघितली आमची लायब्ररी. प्रचंड आनंदाने उदगारले, आपल्या बंगाली शैलीत… ”बिभॉय, यू हॅव गॉट द क्रीम ऑफ लिटरेचर. सो नाईस” (हो, ते मला बिभॉय असेच काहीसे म्हणत माझ्या विभावरी नावाचा… असाही बंगाली नाद असू शकतो हे मला नव्यानेच कळले होते) माझा वडिलांबद्दलचा अभिमान दाटून आला. सरांना आवडली आपल्या वडिलांची लायब्ररी.

त्यानंतर तो महान कलाकार विसरला स्वतःला, घराला, परिसराला, आम्हाला….धरणी झाली होती त्यांचे आसन, हातात रंग,पेन्सिल आणि कागद. १ तास झाला २ झाले ३ झाले.. आई सुग्रास अन्न तयार करुन त्यांना वाढावयास तयार बसली होती. पण त्या कलाकाराचे ध्यान लागले होते. ब्रह्मानंद मिळाला होता. अप्रतीम चित्रे, आभाळातून पहाटे रंगांची पखरण ओघळत यावी, तशी त्या रंगांच्या जादूगारांची किमया कागदावर अवतरत होती. मी व आई निमग्न होऊन ती निरखत होतो. असे कलाकार, असे ध्यानस्थ, असे गुरू.. धन्य धन्य झाले होते मी.

म्हणतात ना, चांगल्या व्यक्तिमत्वाचे पैलू, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता हे संस्कार शिक्षक आपल्या नेणीवेतून सहजपणे देत राहतात.
मी शिकत होते, घडत होते. पण वय इतके लहान होते की आपण एका दिग्गज कलाकाराचे शिष्य आहोत, हेसुद्धा कळत नव्हते. जेव्हा कळले तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांचा विनम्रपणा एवढा की कधी कोणी त्यांचे थोडे जरी कौतुक केले तर लगेच म्हणत..” मैं तो अपने गुरू की धूल भी नहीं..” त्यांच्या मायेच्या आठवणी तर पुस्तकात मावणार नाहीत, इतक्या असंख्य.आम्हा सर्व मुलींना घेऊन ते महाराष्ट्रात आले होते. अजिंठा, वेरुळ दाखविण्यासाठी. सर जाणार म्हटले की आमचे पालक बिनधास्त असत. वडिलांची माया, छत्रछाया सगळे मुलींना मिळणार या विश्वासाने आम्हाला धाडत. औरंगाबादला एक वर्गमैत्रीण.आजारी पडली. आम्ही लहान, आमचा विरस नको म्हणून आम्हाला दुसऱ्या शिक्षिकेबरोबर पुढे पाठवले. त्या मुलीची सेवाशुश्रूषा डॉ. पथ्य पाणी सर्व केले. ती बरी झाल्यावर तिचा विरस नको म्हणून पुनः आम्हा सर्वांना वेरूळला नेले.आणि तेही त्या मुलीच्या पालकांकडून एकही पैसा अधिक न घेता. त्या मुलीचे वडील अक्षरश: डोळ्यात पाणी आणून विनवीत राहिले. पण त्यांचे म्हणणे एकच .. या मुली माझ्या मुलींप्रमाणेच नाही का ?

शाळेचा ध्यास एवढा की त्याग हा शब्द तोकडा वाटावा. त्यासाठी अविवाहित राहणे पसंत केले. दिवस रात्र शाळा न शाळा.. शाळेत. मूर्त्या बनवीत. सुशोभित करत.
शाळेचे फोटो काढायला अजूनही लोक येतात. खरा हत्ती असतो एवढा मोठा हत्ती इतका सुंदर की बघत रहावे. त्या हत्तीच्या आत बसून आम्ही अभ्यासही करत असू. ध्यान मुद्रेत असलेली भव्य मूर्ती, गौतम बुद्धाची.. किती रेखीव. आम्ही तेथे प्रार्थना म्हणत असू.

नाट्यगृह किंवा शाळेचा वार्षिकोत्सव करण्यासाठी असलेला हॉल, असा की तोंडात बोटे घालावी. मायकेलंजिलोचे सिस्टाईन चैपल आठवावे. त्या हॉलची उंची किमान २५, ३० फुट . पण तेथे बाम्बूच्या परातीवर उलटे झोपून छतावर कोरीव काम करणे सोपे असते का ? आम्ही आ s वासून त्यांना बघत असू. घाबरुन जात असू. ते मात्र हसत हसत खाली उतरत आणि आम्हाला नवीन पुस्तके, नवीन फुले याबद्दल आवर्जून सांगत राहत.
आम्हाला त्यांच्या वर्गात बसायला आवडे कारण तेथली रचना खूप अनोखी केली होती त्यांनी. बैठी चौरस टेबले, त्यावर रंगी बेरंगी ४-४ पात्र पाण्यासाठी … जवळ नव्या को-या टोकदार पेंसिली, कागद. भिंतींवर त्यांची शिल्पे, पण बरेचदा ते आम्हाला बागेत नेत. तेथे बसून फुलापानांची चित्रे काढायला शिकवीत.

दिवसभर काम करूनही हे थकत कसे नाहीत असे आम्हाला कोडे पडे. हे शाळा सुटल्यावर काय करतात हे तरी बघू या म्हणून अगदी घरची परवानगी घेऊन आम्ही थांबलो तर काय.. मन मोहून टाकणारे दृश्य ! सर हिरवळीवर बसले होते. हात लांब करून ”आओ, तुम नहीं आओगे ? नाराज़ हो ? खा लो.” म्हणत हातावरचे दाणे दाखवत होते. आणि.. त्यांच्या हातावरचे ते दाणे कोण टिपत होते ?
मोर.. मोर…..१ नाही २ नाही किती किती मोर…..वा.. किती लोभस दृश्य होते ते. सरांचा प्रेमळपणा त्या पक्ष्यांनाही जाणवला होता तर.. अपूर्व !

एकदा मध्यप्रदेश सरकारच्या परवानगीने त्यांनी सर्व शिल्पकारांची कार्यशाळा भरवली होती. अबब… काय अभूतपूर्व ….केवढाले ते दगड… ठाक ठाक.. दिवसभर एकच आवाज. ती कलाविथिका अनेक लहान, थोर, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, नवे, जुने कलाकारांनी गजबजली होती. प्रत्येक शिल्पकार अथक परिश्रम करत होता. जणू त्या अमूर्त पाषाणातून मूर्त सौंदर्य अवतरत होते.ते दगड टाकीचे घाव सोसून जणू देवत्व बहाल करत होते. सरांची धावपळ चालू होती. आम्हाला मुद्दाम दाखवायला नेले होते. कल्पनाशील सर्जन घडत असताना आम्ही लहान लहान मुली काय शिकणार होतो ? पण सरांचे आम्हाला शिकविण्याचे प्रयत्न अविरत चालत. तेथे तर ‘गीत गाया पत्थरोंने‘ जणू अवतीर्ण झाले होते. सर्व आनंदात होते. अन हाय, घात झाला ! सरांकडे असलेले रुपयांचे पाकीट चोरीस गेले. म.प्र. सरकारचे रुपये ..? आता काय ?
त्यांना अतोनात दुःख झाले. पण ते शांत होते. पोलिस त्यांच्या सच्चेपणाला जाणत, त्यांच्या प्रामाणिकपणाची ख्याती सर्वश्रुत होती. पोलिस म्हणे “तुम्ही तक्रार करा, आम्ही नक्की शोधून काढू.“
पण ते अविचल. म्हणे.. ”माझ्या बरोबर असणारे गरीब मजूर, वाळू, माती आणणारे ..तुम्ही त्यांना त्रास द्याल. ते गरीब आहेत पण चोर नाहीत हे मी खात्रीपूर्वक सांगतो. कृपा करा, पण त्यांना छळू नका. माझी चूक मी भरेन. येथल्या कलाकारांचा अपमानही मला सहन होणार नाही.” त्यांचे मजूर अक्षरशः पायावर लोळण घेत म्हणाले, ”सर, आप देवता हो, ये पुलिस तो कल से तफशिश के नाम पर हमें सवाल कर रही है” प्रेमाने त्यांना उचलून घेत सर उद्गारले, ”मी देव नाही, साधा माणूस. असलेच तर देवत्व तुमच्यात आहे.“ सरांचे अनोखे रूप बघून आम्ही भारावून गेलो.

सरांना असंख्य पुरस्कार मिळालेत. असंख्य त्यांनी नाकारले. गरजच वाटत नव्हती त्याची. तो थोर सतत जमिनीवर होता. शाळेत अशी किती चित्रकला शिकणार ? पण त्यांच्या मार्गदर्शनासाठी, मायेसाठी आम्ही महाविद्यालयातून पुनः पुनः त्यांच्याजवळ जात राहीलो. आमच्या लहान सहान प्रश्नांची पण ते प्रेमाने उत्तरे देत.
चेखव, दांतोवस्की, ग्रे ची अनाटॉमी, वॅन गोग़, बोत्तिसेली सर्व वाचायला सांगत. आम्ही किती वाचले, किती समजले, हे आमच्या कुवतीवर. पण ते मात्र शिकवीत राहिले. भरभरुन माया, प्रेम देत राहिले. त्या वटवृक्षाच्या छायेत आम्ही सुखावत राहिलो.

आठवणी तर इतक्या दाटून येतात की भान हरपते. पाने पुरत नाहीत. शेवटी एकच वाटते अशी निस्वार्थ, निस्सीम त्यागाची त्यांची मूर्ती कोणता शिल्पकार बनवू शकेल ?

आज म. प्र. मधील शिक्षण क्षेत्रातील व्यापमं घोटाळे ऐकले की अंगावर कांटा येतो. मान शरमेने खाली जाते. शिक्षणासाठी जीवाचे रान करणारे सर आपण हे बघायला हयात नाहीत म्हणून आनंद मानू की, तुम्ही परत येवून काहीतरी करा, म्हणून देवाची आळवणी करु ?
पण, देवाला देखील तर तुम्ही आपलेसे केले असेल ना ? तो ऐकेल माझे ?

स्वाती वर्तक

— लेखन : सौ. स्वाती वर्तक. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा
मितल सुहास वावेकर on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
जयश्री चौधरी मुंबई on व्यंग कथा
सचिन जगन्नाथ कांबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
नामदेव लक्ष्मण वनगुले तळा - सोनसडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
श्री. समीर मारुती शिर्के on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
अजित महादेव गावडे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !