“बाल दिगंबर गणेश”
(कडाव, कर्जत)
बघता बघता बाप्पांचा निरोपाचा दिवस जवळ येऊ लागला आहे. सद्गदित हृदयाने अन् हळव्या मनाने निरोप घेताना दोघांनाही वाईट वाटणार आहे.. पण खूप काही पदरात पडल्याचे समाधान, आनंदही त्यात आहे. त्याची सेवा करण्याचे भाग्य लाभले. ते क्षण बरेच काही शिकवून सांगून गेले. आयुष्य समृद्ध करून गेले. माणूसपण देऊन गेले. त्याचा महिमा अपरंपार आहे.साऱ्या जगताचे लाडके दैवत. बाप्पा आईकडे जाणार नक्कीच खूप आनंद आहे. आईला प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य घेणारा तो पुण्यात्माच नाही का ?
लहानपणापासूनच अनेक पराक्रम लिलया करणाऱ्या बाल गणेशाच्या अनेक कथा आहेत. अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका त्याच्यावर केल्या गेल्या आहेत. मोठ्यांबरोबर बालगोपाळांना गणपती बाप्पा अतिशय प्रिय आहेत. मोठ्या बाप्पांबरोबर बाल स्वरूपातील बाप्पाही सर्वांचे लाडके आहेत. आज अशाच एका दिगंबर बाल गणेश मंदिराची कथा बघु या.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कडाव नावाचे गाव आहे.या गावामध्ये बाल दिगंबर गणेशाचे अति प्राचीन मंदिर आहे. शेंदूर चर्चित आसन मांडी घातलेली बाल गणेशाची अती सुबक मूर्ती आहे. मूर्ती पाहताक्षणीच आपल्याला आवडते भावते. इतके ते विलक्षण, लोभसवाणे बाल रूप आहे. भक्त त्याच्या प्रेमातच पडतात.

हे मंदिर बांधण्यासाठी पार्वतीबाई पेशव्यांनी मदत केली असल्याचे संदर्भ आढळतात. नाना फडणवीस यांनी त्याचा जिर्णोद्धार केला. अतिशय साधे पण सुंदर पवित्र असे ते मंदिर आहे. एक वेगळाच भक्ती भाव साऱ्या वातावरणात भरून राहिला आहे असे जाणवते. या मंदिराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. जागृत देवस्थान असल्याने त्याचा लौकिक ही मोठा आहे. असे म्हणतात की कणव मुनी भारताची यात्रा करत असताना या गावी आले. गणेशाचे उपासक असल्याने उपासनेत खंड पडू नये यासाठी त्यांनी बाल दिगंबर गणेशाची स्थापना केली. गावचे पाटील धुळे याना शेतात ही मूर्ती सापडल्याचेही उल्लेख आहेत. जुनी बांधणी असलेल्या मंदिराचा गाभारा फार मोठा नाही पण त्या मनाने गणेशाची मूर्ती मात्र बऱ्यापैकी मोठी असल्याने भक्तांचे लक्ष वेधून घेते. अति प्राचीन मंदिर असल्यामुळे पूर्ण वर्षभर इथे भाविकांची गर्दी असते. याचे दर्शन घेऊनच मग पुढे भीमाशंकराच्या दर्शनाला जातात अशी आख्यायिका आहे.

तर असे आहे कडाव येथील बाल गणेश मंदिर. कधी कर्जत ला जायचा योग आला तर विसरु नका या हटके मंदिराला भेट द्यायला.
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
क्रमशः

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800