१. गझल
दिशाहीनला दिशा द्यायला येतो शिक्षक
पडले कोडे सोडवायला येतो शिक्षक
उदास झाले होते जगणे कुणास सांगू
पण पाठीशी थोपटायला येतो शिक्षक
पुढे आपल्या निघून गेले बहुधा सारे
कुठे राहिले मी पहायला येतो शिक्षक
जबाबदारी घेत असे तो माझ्या वरची
मी चुकले हे भासवायला येतो शिक्षक
अनुभवातील लोणी वाटत शिकवत असतो
कमतरतेला पण भरायला येतो शिक्षक
— रचना : सौ. दिपाली वझे. बेंगळूरू

२. शिक्षक दिन
शिक्षक दिनाला, तयांचा आदर
मानु या आभार, शिक्षकांचे…
शिक्षक ज्ञानाचे, धडे गुरु देती
आशीर्वाद घेती, सर्वजण…
गणेश असतो, ज्ञान अन बुद्धि
कलागुण सिद्धी, अधीपति….
धरून हातास, बालका गिरवी.
अपत्या शिकवी, माता पिता…
करतो सजग, शिकवी विज्ञान
घडवी सज्ञान, विद्यार्थ्यांना…
विद्येचे हे दान, देई समाजाला
शिष्य घडविला, जीवनात…
आई हिच गुरु, खरी शिल्पकार
जीवना आकार, देत असे…
ज्ञान असे सूर्य, खडू तलवार
काळ्या पाटीवर, प्रकाशित…
— रचना : सौ. मीना घोडविंदे, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800