मुक्तेश्वर गणेश मंदिर (जुहू, मुंबई)
श्री गणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. गणपती उत्सव हा सर्वात मोठा सण समजला जातो. त्यामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणात साजराही केला जातो. लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत. त्यांनी या निमित्ताने अतिशय मोठे कार्य केले आहे.
श्री गणेशाची अगणित रूपे. सगळीच लोभसवाणी मनस्वी डोळ्यांना सुखावणारी ,मनाला असीम आनंद देणारी. तरी सुद्धा गणपती म्हटले की चार हातांची गोंडस मूर्तीच डोळ्यासमोर येते नाही का ? भक्तानां आशीर्वाद देणारा, हातावर मोदक असलेला तर उर्वरित दोन हातांमध्ये पाश परशू अंकुश आदी आयुधे असणारा म्हणजे आपला वाटणारा गणपती.

पण मंडळी, पुरातन मंदिरे बघितली आणि पुराण कथा ऐकल्या की माणसापेक्षा देव कसा श्रेष्ठ आहे हे पटवण्यासाठी चारपेक्षा जास्त हात असलेल्या मूर्तीची संकल्पना साकारण्याची कल्पना शिल्पकाराला सुचली असावी असे वाटते. गणपतीचा वरदहस्त सर्वदूर पोचावा हा विचारही असावा.
मुंबई जवळील जुहू येथील मुक्तेश्वर देवालयात अशीच एक भव्य अद्भुत गणेश मूर्ती आहे. त्या मूर्तीला २२ हात, ११ मुखे आहेत. पायाजवळ असणारा उंदीरही बघण्यासारखा आहे. संपूर्ण जगात २२ हात, ११ मुख असलेली भव्य दिव्य गणेशमूर्ती अन्यत्र कुठेही अस्तित्वात नसावी. हे पुरातन म्हणजे ४०० वर्षे जुने मंदिर आहे. देशातील हे एक अनोखे मंदिर आहे. बांधणी हेमाडपंथी आहे. स्थापत्य शास्त्रातील हा एक अप्रतिम नमुना आहे.

या मंदिरामागे सात मजले आहे. प्रत्येक मजल्यावर विविध देवी देवतांच्या अनेक रूपांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. तिसऱ्या मजल्यावर अष्टविनायक गणपतींचा समावेश केला आहे. एकूण १०५ मूर्ती आहेत. मुक्तेश्वराची पिंडी पार्वती विष्णू यांच्या दगडी मूर्ती ही आहेत. हनुमान आणि सप्त पुरुषांची समाधी सुद्धा आहे. पेशवाई नंतर काही ब्राह्मणांनी हे मंदिर बांधल्याचे पुरावे आहेत.
मंडळी आहे की नाही गंमत ? आश्चर्य म्हणजे आपण मुंबईकर, मुंबई बद्दल प्रचंड अभिमान असणारे. पण अशा अनेक अदभुत गोष्टी आपल्याला माहीतच नसतात. नाही का ? आता प्रत्येकाने ह्या हटके मुक्तेश्वर गणेश मंदिराला नक्कीच भेट द्यायला पाहिजे.
पुरातन गणेश मंदिरांची जमेल तशी जमेल तेवढी माहिती देण्याचा संकल्प होता, तो आज पूर्ण झाला. सर्व वाचकांचे, श्री व सौ भुजबळ यांचेही खूप. आभार 🙏🙏 त्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोचू शकले.
आज अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस. साश्रू नयनांनी गहिवरला मनाने पुढच्या वर्षी लवकर या चे आकडे घातल्याशिवाय निरोप पूर्ण होतच नाही.
गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया.
समाप्त.

— लेखन : मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800