“माता ब्रह्मचारिणी”
आज २३ सप्टेंबर. नवरात्री उत्सव धामधूमीत सुरु झाला आहे. आजचे मातेचे सुंदर रूप, कथा त्याविषयी माहिती जाणून घेऊया.
माता ब्रह्मचारिणी या देवीलाही श्वेतवस्त्र म्हणजेच पांढरी वस्त्रे आवडतात. पण नक्षत्राच्या आणि ग्रहांच्या स्थितीनुसार लाल रंग दर्शवला जातो. त्यामुळे लाल किंवा पांढरी वस्त्रे परिधान करावीत. मातेला मात्र पांढरा रंग पसंत असल्याने पांढरा गुलाब, मोगरा, चमेली, तगर, किंवा कोणत्याही पांढऱ्या सुवासिक फुलांची माळ बनवली जाते किंवा आजचा शुभ रंग लाल असल्याने लाल गुलाब किंवा लाल रंगाच्या फुलांची माळ किंवा त्याच्या शक्यच नसते, तिथे झेंडूच्या फुलांची माळ बनवून घातली जाते. मंदिरात, देवघरात लाल, पांढऱ्या फुलांची आरास करावी.
या ब्रह्मचारिणी मातेला कमळाचे फुल सुद्धा प्रिय आहे. देवीला त्याच्या साखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ यांचा नैवेद्य दाखव साखरेने बुद्धिमत्तेत वाढ होते तसेंच दीर्घायुष्य मिळते असे म्हटले जाते.
दुर्गा देवीचे ‘ब्रह्मचारिणी’ हे दुसरे रूप आहे. हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यावर उमेचे म्हणजेच पार्वतीचे शंकरावर प्रेम जडले. शंकर हाच पती मिळावा अशी इच्छा होती. त्यासाठी नारदमुनींनी तिला कठोर तपश्चर्या करण्यास सांगितली. त्याप्रमाणे तिने ते अतिशय कठीण व्रत केले म्हणून तिला ‘ब्रह्मचारिणी’ किंवा ‘तपश्चारीणी’ असे संबोधले जाते. या देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न, शांत असून भव्य, सुरेख आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आहेत तर डाव्या हातात कमंडलु आहे. तिच्या उपासनेने साधकाला ज्ञान, एकाग्रता आणि यश मिळते, असे मानले जाते.

ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख, शांतता, समृद्धता आणि धर्म प्राप्त होते. विवाहात येणाऱ्या समस्या, अडचणी दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा नैवेद्य दाखवला, तरी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. ही तपस्विनी असल्यामुळे तिला सात्विक आहार म्हणजेच दूध, साखर, फळे प्रिय आहेत. एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव, चिंता दूर होऊन प्रसन्नता, निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात, असे सांगितले जाते.
ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेमुळे साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थित होते.
तिच्या उपासनेने सर्व मनोकामना पूर्ण होतात, बुद्धीची वाढ होते आणि एकाग्रता वाढते, असे मानले जाते. तिच्या उपासनेमुळे कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. या देवीलाही शांत, सात्विक, स्वच्छ असा शुभ्र धवल रंगच शांत असल्यामुळे अधिक प्रिय आहे.
कुमारिकांना सुयोग्य, पद्धत मनाप्रमाणे पती मिळावा, लवकर लग्नाचा योग यावा यासाठी कुमारीकांनी ब्राह्मचारीणी मातेची मनोभावे पूजा, उपासना करावी.
तिला प्रसन्न करण्यासाठी पुढील मंत्राचा जप करावा.
“या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू ।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा”
ब्रह्मचारिणी मातेसाठी खास नैवेद्य :
नवरात्रीत उपवासामुळे शरीरातील उष्णता वाढलेली असते. थंड आणि गोड पदार्थ खाल्ल्यामुळे उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास होत नाही. शिवाय दूध व साखरेपासून बनवलेले पदार्थ माता ब्रह्मचारिणीला अतिशय प्रिय आहेत. साखर, दूध साखर यांचा नैवेद्य तर एरव्हीसुद्धा आपण दाखवतोच, मग नवरात्रातील खास नैवेद्य हटके असावा ना देवीलाही ! म्हणून चला, देवीचे नामस्मरण करत, तिच्या आवडीचा खास नैवेद्य आज आपण बनवू आणि तो प्रसाद आपल्या सर्वांनाही खाऊन मन प्रसन्न, आनंदी होईल. चला मग लगेंच लागूया तयारीला…

साहित्य :
3 कप दूध, दीड कप डेसिकेटेड कोकोनट, 1 कप कॉर्नफ्लोअर किन्वा उपवासासाठी बनवायचे असेल तर अर्धा कप साबुदाण्याचे पीठ, 1 कप थीक क्रीम किंवा अर्धा कप व्हीप्ड क्रीम पावडर, 1 मोठा चमचा पिठीसाखर, 4 मोठेचमचे साखर, ट्रे ला लावण्यासाठी अर्धा चमचा तूप, व्हॅनिला इसेन्स 10.12 थेंब, फूड कलर्, सजावटीसाठी पिस्ते किंवा टूटी फ्रुटि, गोल्डन स्पार्कल्स .
कृती :
प्रथम गॅसवर 2 कप दूध गरम करण्यासाठी ठेवावे. ट्रे ला तूप लावावे. त्यावर 2 कप डेसिकेटेड खोबर्याचा कीस पसरवावा. बाऊल मध्ये कॉर्नफ्लोअर घेऊन अर्धा कप दुध घालून नीट एकत्र करावे.दूध उकळले की त्यात साखर घालून ढवळावे. साखर पूर्णपणे विरघळली की सावकाश गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत घेत कॉर्नफ्लोअर किन्वा व्हनिला कस्टर्ड पावडर मिसळलेले दूध त्यात घालून सतत हालवत रहावे. 5..6 थेम्ब व्हॅनिला इसेन्स घालून छान एकजीव करावे. लवकरच मिश्रण घट्ट होईल.झाऱ्याला चिकटून राहील इतके घट्ट झाले की ते ट्रे मधील खोबऱ्यावर पसरावे.
खोबऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र थरावर हा क्रिम रंगाचा थर घातल्यावर खूप छान दिसतो. नंतर एका मोठ्या बाऊल मध्ये थीक क्रिम किंवा ऑनलाईन व्हीप्ड क्रीम पावडर मिळते ती घेऊन त्यामध्ये बाकिचे थोडे थोडे दुध घालत घालत इलेट्रिक बिटरने फेटत राहावे.मग त्यात पिठीसाखर, थोडा लाल फूड कलर आणि इसेन्स घालून मस्त फेटून हलके फेसाळ होईपर्यंत फेटावे. शेवटी या क्रीमचा थर द्यावा आणि फ्रिज मध्ये सेट करण्यासाठी तासभर ठेवावे. नंतर बाहेर काढून त्याच्या वड्या कट करून पिस्ते टुटिफ्रुटी व गोल्डन स्पार्कल्सने मस्त सजावून सुंदर डिश मध्ये हे डिझार्ट थन्डगार सर्व्ह करावे.
वैशिष्ट्य :
हे डिझार्ट फक्त नवरात्रातच करावे असे नाही, तर कोणत्याही उपवासाना तरी आवर्जून करावे. त्यामुळे उपवासामुळे होणारा त्रास कमी होतो. तसेच हे कोणत्याही कार्यक्रमांच्या आधी करून ठेवता येते. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होत नाही. फ्रिज मध्ये आठवडाभर सुद्धा छान राहते. दिसायला आकर्षक आहे त्यामुळे पार्टीची लज्जत वाढते. चवीलाही यम्मी असल्यामुळे सर्वजण नक्कीच आवडीने खाणार.कलरफुल असल्यामुळे खास आकर्षण ठरेल यात काहीच शंका नाही.
चला मग, देवीच्या या रूपाचे मनोभावे पूजन करून, आराधना करूया.
क्रमशः

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800