Wednesday, October 15, 2025
Homeसेवानवरात्र : नववे रुप

नवरात्र : नववे रुप

“सिद्धिदात्री देवी”

आज ३०सप्टेंबर २०२५. नवरात्रीतील नववा दिवस! पाहता पाहता आठ दिवस कसे गेले हे समजलेही नाही. आजचे हे रूप देवी सिद्धिदात्रीचे म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्री सर्व भक्तांना सर्व प्रकारची सिद्धी देते असे म्हणतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिला सिद्धींची स्वामिनी असेही म्हणतात. नवमी तिथीचे व्रत करून मातेला तीळ अर्पण करणे आणि या दिवशी मातेची पूजा करणे लाभदायक राहते. हे व्रत व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करते आणि अनुचित घटनांना, संकटांना प्रतिबंध करते आणि आपले रक्षण करते.

अणिमा, महिमा, गरीमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे.ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो.

नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नववे रूप देवी सिद्धिदात्रीच्या पूजेने शारदीय नवरात्रीची सांगता होते. देवी सिद्धिदात्री ही नऊ दुर्गांपैकी शेवटची देवी आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवी सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना कीर्ती, सामर्थ्य आणि संपत्ती प्रदान करते. शास्त्रात सिद्धिदात्री आईला सिद्धी आणि मोक्षाची देवी मानण्यात आली आहे. माता सिद्धिदात्री हे देखील माता सरस्वतीचे रूप मानले जाते.

देवी सिद्धिदात्रीची पूजा पद्धत :
सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीच्या मूर्तीला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. देवीला चंदन कुंकू लावावे.
देवीला धार्मिक मान्यतेनुसार पांढरा रंग आवडतो म्हणून देवीला पांढरे फूल अर्पण करावे. तिला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. मिठाई, सुका मेवा, फळे अर्पण करावे.
देवी सिद्धिदात्रीला नवरसयुक्त अन्न, नऊ प्रकारची फुले, नऊ प्रकारची फळे अर्पण करावीत. देवी सिद्धिदात्रीला फळे, हरभरा, पुरी, खीर, नारळ आणि हलवा खूप आवडतो. म्हणून या वस्तू देवीला अर्पण केल्याने ती प्रसन्न होते.

देवी सिद्धिदात्रीचे जास्तीत जास्त ध्यान करावे. तसेच देवीची आरती करावी. नवमीच्या दिवशी कन्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी कन्येची पूजा करावी. त्यामुळे सदैव आपल्यावर माता सिद्धिदात्रीची कृपा राहील. सारे मनोरथ पूर्ण होतील, सारी संकटे दूर जातील, सर्वांना उत्तम आरोग्य, संपत्ती दीर्घायुष्य लाभते.

देवी सिद्धिदात्री पूजा मंत्र :
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि,
सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायिनी।
ओम देवी सिद्धिदात्र्यै नमः।
अमल कमल संस्था तद्रज:पुंजवर्णा,
कर कमल धृतेषट् भीत युग्मामबुजा च।
मणिमुकुट विचित्र अलंकृत कल्प जाले;
भवतु भुवन माता संत्ततम सिद्धिदात्री नमो नम:।

देवी सिद्धिदात्री बीज मंत्र :
ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम :
देवी सिद्धिदात्री स्तुति मंत्र :
या देवी सर्वभूतेषु माँ सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।

अशाप्रकारे मनोभावे पूजन करून मंत्रांचे जप केल्यास सारे मनोरथ पूर्ण होतात, सारी संकटे दूर जातात. सर्वांना उत्तम आरोग्य, संपत्ती, दीर्घायुष्य लाभते अशी मानता आहे. या दिवसाचा शुभ रंग गुलाबी आहे. म्हणून सर्वांनी या दिवशी गुलाबी वस्त्रे परिधान केल्यास अधिक लाभदायक असते असे मानले जाते.
क्रमशः

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. देवीच्या रूपांचे खूप सुंदर वर्णन आपण आपल्या प्रत्येक लेखातून केले आहे आणि खूप छान माहिती हे आपण वाचकांपर्यंत पोहोचविलेली आहे.🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप