कुठरोग्यांना बरे करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी, कुष्ठरोगाबाबतचे अमानवी कायदे, नियम बदलण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री डॉ विजयकुमार डोंगरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व डॉक्टरांनी कार्य केल्यास लोकांचा त्यांना दुवा मिळेल, असे आवाहन निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी, डॉ डोंगरे यांच्या जीवन कहाणी वर आधारित “सेवाव्रती” या माहितीपटाच्या प्रदर्शन प्रसंगी बोलताना केले.
श्री देवेंद्र भुजबळ पुढे म्हणाले की, इंग्रजी भाषेत असलेला हा माहितीपट मराठी, हिंदी या भाषांबरोबरच इतर प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित होणे आवश्यक आहे. जेणेकरून कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल. पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्या कामाचे महत्व ओळखून फिल्म्स प्रभाग चे निवृत्त अधिकारी श्री जगदीश पुळेकर यांनी स्वखर्चाने “सेवाव्रती” हा माहितीपट निर्माण केल्याबद्दल. त्यांचे कौतुक करून अशा प्रकारच्या माहितीपटांसाठी विविध व्यक्ती, संस्थांनी यथाशक्ती योगदान दिले पाहिजे, असेही श्री भुजबळ यांनी नमूद केले. ते सेवाव्रती या माहितीपटाच्या विशेष प्रदर्शन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

“रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा” असे मानणाऱ्या आणि अनेक दशकं ग्रामीण व शहरी कुष्टरोग निवारण आणि रुग्णसेवेसाठी झटणारे, देशा-परदेशात कॉन्फरन्समध्ये सहभागी होणारे व या विषयावरील ६० पुस्तकांचे लेखक पद्मश्री डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा जीवनप्रवास आणि असामान्य कार्यावर आधारित असा हा ३५ मिनिटांचा “सेवाव्रती” माहितीपट आहे. त्याचा विशेष प्रीमियर शो दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या संयुक्त वतीने नुकताच निमंत्रितांसाठी आयोजित केला होता.
यावेळी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शैलेश मोहिते, मुंबई कुष्ठरोग प्रकल्प संस्थेचे संचालक डॉ. विवेक पै, डॉ गायकवाड, डॉ. प्रीतम पाठारे आदींनी यथोचित मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमात ज्येष्ठ वृत्तपत्र लेखिका श्रीमती मंदाकिनी भट, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पास्कोल लोबो, वसंत हरयाण, रमेश सांगळे यांना वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी अनेक वर्षे अमूल्य योगदान दिल्याबद्दल जीवन गौरव सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर दासावाचे कार्यकारिणी सदस्य यतीन कामथे, सुरेश शिंदे, कार्यक्रम प्रमुख सुनील कुवरे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्यवाह नितीन कदम, या माहितीपटाचे कॅमेरामन अजित नाईक, प्रफुल्ल कळके, प्रोफेसर गोपीनाथ वाघमारे, अनिल समेळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा माहितीपट देशपरदेशात स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असल्यामुळे या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दासावाचे वाचक सभासद, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे सभासद, चित्रपट-नाट्य कलाप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व आणि डॉ. डोंगरे आणि जगदीश पुळेकर यांच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आपल्या प्रस्ताविकात दिगंबर चव्हाण यांनी सांगितले. तर कार्यक्रम प्रमुख राजन देसाई यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली माजी अध्यक्ष विजय कदम, चंद्रकांत पाटणकर, अरुण खटावकर, अनंत आंगचेकर, दिलीप ल सावंत, राजेंद्र लकेश्री, रामचंद्र जयस्वाल, सूर्यकांत भोसले, चंद्रकांत तावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800