आज दसरा आहे. “दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा” अशी आपल्यात म्हण आहे. यानिमित्ताने आनंद घेऊ या काही रचनांचा. आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक.
१. अष्टभुजा, नवदुर्गा
तूच आई, तूच भार्या, तूच साम्राज्ञीनी,
तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, संवेदनशील जननी।
तूच धरतीची कन्यका, स्वाभिमानी वरदायीनी,
तूच आदिशक्ती, रक्षणकर्ती, आणि कुलस्वामिनी।
तूच चंडिका, काली, महाकाली,
अवघ्या विश्वाचे सूत्रसंचालन करणारी अम्बा।
तूच मांगल्य, तुच कल्याणी, मुक्तिदायिनी,
तारणहारी, वरदायीनी, सर्वांची जगदंबा।
घे हाती अस्त्रसंग्रह, शस्त्रांनी युक्त,
कर प्रहार त्या असुरी प्रवृत्तीवर, महिषासुरमर्दिनी तू।
त्या जिवंत दैत्य-दानवांना नष्ट कराया,
घे त्रिशूल तलवार हाती, रणरागिणी तू।
अंतर्मनातील स्त्रीशक्तीला नमन करते मी,
अष्टभुजा साक्षी द्या, अष्टपैलू नवजागृती।
स्त्रीशक्तीची तूच खरी परिभाषा, दुर्गा भक्तांची आराध्या,
हे नारी, नारायणी तू, तुच क्रांतीची आणि उत्क्रांतीची मूर्ती।
— रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार. केमॅन आयलँड
२. विजयाचे प्रतीक
हृदयाच्या आकारात
दैव दोन खणी दिसावे
भाव भक्तीच्या कृपेने
विज्ञान महत्व जाणावे /1/
विजयाचे प्रतीक दसरा
दश विकारांचा संहार
षड्रिपूंना संपवून करू
अंबामातेचा जयकार /2/
विजयादशमी दिनी
युद्धासाठी सुरूवात
अधर्मावर विजयाची
सीमा गाठती क्षणार्धात /3/
सीमा ओलांडून करावे
उत्तुंग यशाचे आवाहन
आपट्याची पर्ण सुवर्ण
महिषासुरांचे व्हावे पतन /4/
सीमोल्लंघन करून येता
ओल्या मातीने औक्षण
शमी, आपट्याची पाने
देऊन मातृभुमीचे रक्षण /5/
शमीवर शस्त्रसाठा ठेवून
महाभारतात विजयी पांडव
सीमोल्लंघन करून परतले
कौरवांचे अंती संपले तांडव /6/
रावणाचा केला संहार
विजयश्री मिळे श्रीरामास
सोन्याच्या लंकेस देऊन
राज्याभिषेक बिभिषणास /7/
आपसुक मतभेद विसरून
करू सीमोल्लंघन आनंदात
लुटूया सोने आधुनिक प्रगती
शिखर गाठू यशस्वीतेचे त्यात /8/
— रचना : सौ.शोभा कोठावदे. नवी मुंबई.
३. दसरा
अश्विन मास असतो खास
महत्व त्याचे निराळे
वाईट विचारांचे निर्दालन
अन् रावणाचे केले दहन !१!
दुर्गा देवीने असुरी वृत्तीच्या
महिषासुराचा केला वध
सारे देवता कृतकृत झाले
तेंव्हाच झाले ते सावध !२!
श्रीरामाने सीतेला आणले
रावणाकडून सोडवून
दसरा सणाची ही खासियत
विजयोत्सवाचे प्रतिक बनुन !३!
शांती, समृद्धी, आनंदाचा
नऊ दिवसाचा हा काळ
दहाव्या दिवशी विजयादशमी
श्रीरामाच्या गळ्यात पडते माळ !४!
दसरा सण हा संदेश देतो
चांगल्या विचारांचा प्रभाव
वाईट विचारांचे निर्दालन व्हावे
हाच ठेवा आपला स्वभाव !५!
दसरा सण आहे मोठा
थोरा मोठ्यांचा ठेवा मान
सोने वाटून आनंद करा द्विगुणित
शमी पत्रांचा वाटे अभिमान !६!
— रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई
४. विजयादशमी
आपट्याची पाने वाटू
सुखाचं सोनं लुटुया
प्रेम आलिंगणे भेटीगाठी घेऊ
दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून
रावण दहन करूया
मना मनातले महिषासुर पळवू
चला विजया दशमीला
दसरा सण साजरा करूया
सीमोल्लंघन करून
कुप्रथा कुविचारांना दूर सारू
सुविचार नवनिर्मितीचा ध्यास धरूया
दसरा सण साजरा करूया
करूया प्रण विजयादशमीला
अत्याचारी भ्रष्टाचारी बलात्काऱ्यांना
वाम मार्गापासून दूर सारूया
शिस्त सभ्यता प्रथा परंपरांचा
आदर भाव मनी ठसवूया
दसरा सण साजरा करूया
गुन्हेगार अतिरेकी आतंकवादी
यांच्या अपप्रवृत्तींना आळा घालू
देश आपला समृद्ध करू
जनमाणसा अभयदान देऊन
स्वच्छ भारत निर्मल भारत
प्रगत भारत घडवूया
दसरा सण साजरा करूया
सुखाचं सोनं लुटु
आनंदाने उत्साहाने विश्व जिंकूया
चला विजया दशमीला
दसरा सण साजरा करूया
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
५. दसरा
रावण वधाचा युद्ध क्षण
शमीतळीची शस्त्रे धारण
विजयादशमी पर्वणी सण
देई सदा विजयस्मरण -1-
सोने लुटावे ते शिलांगणी
शुभेच्छित वीर आलिंगनी
दस-याची सोनेरी पर्वणी
रंगउधळण ती गगनी – 2 –
दसरा सण विजयोल्हासाचा
रामायण नि महाभारताचा
अमूल्य ठेवा संस्कृतीचा साचा
उत्साह असे दुर्जन अंताचा – 3 –
विचार रूजावा वीरतेचा
संचलन शस्त्रसज्जतेचे
असो धिःकार कायरतेचा
पहावे स्वप्न जगज्जेतेचे – 4 –
यश देवो देवी दुर्गामाता
देशरक्षणाचा घेई वसा
पाठी आपली सृष्टी निर्माता
अभंग जप रात्रंदिवसा -5-
संतवचन सर्वमान्य
सत्याचरण सर्वकाल
शत्रुनिर्दालना प्राधान्य
अवतरण पर्वकाल -6-
दिवाळी आगमन चाहुल
नवरात्री देई वर्तमान
उत्सवाचा उल्हास अतुल
सुख नि आनंद वर्धमान -7-
गड सर करावा अडचणींचा
झेंडा रोवावा सिद्ध झाल्या शक्तींचा
गड नसावा तो राजकारणींचा
संस्कार ल्यावा नवविधा भक्तींचा -8-
सज्जन रक्षणार्थ अवतार
दुष्ट निर्दलनाय शस्त्रधार
बाणावा अंगी समर्थ निर्धार
आराध्य देव आपले आधार -9-
माणूस म्हणून जगावे
मानव धर्मा निभवावे
जातीपातींची नच नावे
संकुचित गान नसावे -10-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800