भारत सरकार च्या आरोग्य मंत्रालयातर्फे 2018 सालापासून 18 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय निसर्गोपचार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात आणि ह्र्दय रोगासारख्या जीवनशैलीशी निगडित आजार टाळण्यासाठी कशा प्रकारे शाश्वत आणि नैसर्गिक उपाययोजना कराव्यात या बाबत इंडियन नॅचुरोपॅथी अँड योगा ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यावतीने “निसर्गोपचाराद्वारे स्थूलत्व व्यवस्थापन” या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
या दिनाच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “नागरिकांनी शास्त्रोक्त निसर्गोपचार आणि योग जीवनशैलीचा अंगीकार करून आपले जीवन आरोग्यमय करावे. जीवनशैलीजन्य वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रतिबंधात्मक उपचारपद्धतींचे महत्त्वही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संदेशात अधोरेखित केले आहे. आरोग्य जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आज नितांत गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा विकसित भारतातील सुदृढ व निरोगी पिढी याबाबत स्वत: मार्गदर्शन करीत असतात. स्थूलता व्यवस्थापन हा महत्वाचा विषय असून स्थूलतेमुळे उद्भवणाऱ्या विकारांबाबत जनजागृती झाल्यास स्वास्थ्य हीच संपत्ती ही भावना लोकांमध्ये रुजेल,” अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी “इंडियन नॅचुरोपॅथी अँड योगा ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र” यांच्या ‘स्वस्थ महाराष्ट्र अभियान’चे कौतुक केले.
या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
या अभियानांतर्गत राज्यभरात ग्रामीण व शहरी भागात जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली असून शालेय स्तरावरील पोस्टर व क्विझ स्पर्धा, स्थूलता प्रतिबंधावरील तज्ज्ञांची व्याख्याने, जीवनशैली निगडित आजारांवरील शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.


यासंदर्भात इंडियन नॅचुरोपॅथी अँड योगा ग्रॅज्युएट्स मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अभिषेक देविकार यांनी सांगितले की, राज्यातील रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि शैक्षणिक केंद्रांसोबत सहकार्य वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अभियानातून नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक आणि मोजण्याजोगा परिणाम साधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. यादृष्टीने ‘स्वस्थ महाराष्ट्र अभियान’ हे राज्यात निसर्गोपचार, योग आणि पुराव्याधिष्ठित प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
