“सामोसा व कच्छी दाबेली” फ्युजन
हल्ली मुलानाच काय, मोठ्यानासुद्धा सतत बाहेरचे काहीतरी चटपटीत खायला हवे असते. म्हणूनच साऱ्यांचा ओढा जंकफूड, स्ट्रीट फूड कडे जास्त आहे. जिभेचे लाड पुरवताना आपण कधी याच्या अधीन होतो हे समजतही नाही. हे आरोग्यासाठी घातक आहे. बाहेरील स्ट्रीट फूडची क्वालिटी बहुतेक वेळा थोडे स्वस्त असल्यामुळे उत्तम, दर्जेदार नसते. हे समजूनही आपण ते खातो आणि आजारी पडतो. पित्त, पोटाचे विकार, किंवा इतर आजार उद्भवतात. हे टाळण्यासाठी आपण आज घरीच एक वेगळी, सुरेख डिश बनवूया. सामोसा आणि कच्छी दाबेली हे दोन्ही प्रकार सर्वांचे खूप लाडके आहेत. म्हणूनच यांचे फ्युजन करून ही खास डिश बनवू .
साहित्य :
2 मोठ्ठे उकडलेले बटाटे, अर्धा इंच आले 7-8 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, कढिपत्ता,1 मध्यम आकाराचा कांदा,1 चमचा दाबेली मसाला, बटर, 2 चमचे तेल, मीठ, फोडणीचे साहित्य, पाव वाटी भाजलेले शेंगदाणे,पाव वाटी डाळिंबदाणे, चिंच गुळाची चटणी, 1 वाटी मोझरेला चीझ, बारीक शेव, 2 मोठ्या वाट्या मैदा, अर्धा चमचा बेकिंग सोडा.
कृती : –
पारी बनवण्यासाठी :
2 चमचे मैदा बाजूला काढून बाकीचा मैदा एका बाउलमध्ये घेऊन त्यात 2 चमचे तेल मीठ, बेकिंग सोडा घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावा.
सारण बनवण्यासाठी :
कांदा बारीक चिरून घ्यावा. बटाटे बारीक कुस्करून घ्यावेत. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आले, लसूण ,हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. मग एका कढईमध्ये तेल गरम करून फोडणीचे सर्व साहित्य घालून खमंग फोडणी करावी. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. मग मिक्सर मध्ये वाटलेली पेस्ट घालावी. दाबेली मसाला व बटाटा घालून छान परतावे.नंतर त्यात मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त परतून स्टफिंग तयार करून घ्यावे. हे थंड करण्यास ठेवावे.
मैदा आतापर्यंत छान भिजलेला असेल. या मैद्याचे मस्त मळून फुलके बनतील असे तेल लावून गोळे बनवावेत. हे सर्व फुलके लाटून तव्यावर एका बाजूने पूर्ण भाजून घ्यावेत. बाजूला ठेवलेल्या मैद्यात थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. फुलक्यांची पूर्ण भाजलेली बाजू वर करून त्यावर चिंचगुळाची चटणी पसरवून त्यावर स्टाफिंगचा गोळा ठेवावा. थोडे शेंगदाणे, डाळिंब दाणे घालावेत. 1 चमचा मोझरेला चीज़ घालून एक बाजू दुमडून त्यावर मैद्याची पेस्ट लावून दुसरी बाजू त्यावर दुमडून चिकटवावी. राहिलेल्या दोन्ही बाजू पण अशाच व्यवस्थित घट्ट बंद करून घ्याव्यात म्हणजे गरम केले तरी आतील चिज़् वितळून बाहेर येणार नाही. अशा प्रकारे सर्व साबेली तयार करून ठेवाव्यात.
खायला देण्याच्या वेळेस एका तव्यावर बटर घालून सर्व बाजूनी खरपूस भाजून सर्व्हिंग डिश मध्ये काढून बारीक शेव घालून गरम गरम सर्व्ह करावी.
वैशिष्ट्य :
यामुळे घरीच इतका सुरेख फ्युजन प्रकार खायला असल्यावर सारे खुशच होतील. शिवाय सामोसा तळतात त्यात खूप तेल पोटात जाते. बाहेरचे खाल्ले तर पुन्हा पुन्हा तळलेल्या तेलात तळलेले सामोसे खावे लागतात. दाबेलीतील पावामध्ये खूप मैदा असतो. तो सुद्धा ताजा असेलच याची काय ग्यारेन्टी? मग रिस्क घेण्यापेक्षा हे फ्युजन कधीही दोन्ही पेक्षा आरोग्यासाठी उत्तम आहे.
मैद्याच्या खुसखुशीत कव्हर मुळे चवीला थोडा सामोसा व बाकी स्टफींगमुळे चीज़ी दाबेलीचा फील येतो. कुरकुरीत शेवेमुळे आणि चीज़ मुळे लज्जत आणखिनच वाढते. आवडत असेल तर वरून थोडा चाटमसाला भुरभुरावा. ही डिश खूपच टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी आहे. पोट भरण्यासारखी, खमंग मधल्यावेळेस खाण्यासाठी खूप छान पर्याय आहे. सर्वजण तुटून पडतील आणि वाहवा करतील अशी ही चटपटीत डिश आहे. नक्की बनवून पहाच.

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
