सालमुरद तीमक्का आणि वांगारी मथाई
हिरव्या लेकरांची माय म्हणून पद्मश्री गौरव प्राप्त ‘सालमुरद तीमक्का’ यांनी हजारो झाडं लावली. त्यांचे संगोपन केलं. नुकतेच त्या 114 व्या वर्षी निसर्गात विलीन झाल्या.
‘सालमुरद’ म्हणजे कन्नड भाषेत गर्द डोंगराची रांग. शाळेत कधीही न गेलेल्या तीम्मक्का यांना त्यांच्या पर्यावरण कार्यामुळे पद्मश्री आणि मानद डॉक्टरेट पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. शेवटच्या श्वासापर्यंत हिरवाईचे स्वप्न त्यांनी पाहिले.

नोबेल पुरस्कार प्राप्त वांगारी मथाई या अशाच एक वृक्ष माता. शांतता आणि पर्यावरण संरक्षक, महिलांच्या अधिकारासाठी आणि राजकीय नेते असलेल्या मथाई यांनी ग्रीन बेल्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून सर्व सामान्य महिलांच्या सहकार्य घेत केनियात सुमारे 10 दशलक्ष झाडं लावली.तर संयुक्त राष्ट्राने त्यांच्या प्रेरणेतून वृक्ष मोहीम सुरू करून जगभरात सुमारे अकरा अब्ज झाडं लावल्याची नोंद आहे.
मथाई यांच्या कार्याचे विशेष म्हणजे त्यांनी वृक्ष लागवडीतून त्यांनी महिला सक्षमीकरण केलं. लागवडीसाठी रोपे तयार करून उत्पन्नाचे साधन निर्माण केलं. आफ्रिकेतील कांगो बेसिन जंगल वाचविण्यासाठी त्यांनी जंगल आणि जमीन हडपणाऱ्या माफिया विरोधात लढा दिला. तुरुंगवास भोगला. केनियाच्या पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी मोठे कार्य केलं. अनबोड (un bowed -A memoir) या आत्मचरित्रात त्यांनी आपला जीवन प्रवास चितारला आहे. वृक्ष मातेची कहानी या नावाने अनिल मोहिते यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे.

त्यात वांगारी माथाई आपली जीवन कहाणी आपल्या नातवंडांना सांगते. केनियातील त्याचे कुटुंब, जन्म, शिक्षण, नोकरी आणि जीवन संघर्ष आणि केनिया ग्रीन बेल्ट मुव्हमेंट या वृक्षरोपण चळवळीची कथा त्यात आठवणी रूपाने सांगितली आहे. केनियातील सर्वसाधारण महिलांना एकत्र करून कोट्यवधी झाडं कशी लावली, त्याचा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. केनियातल्या सर्व साधारण महिलाना एकत्र करून कोट्यवधी झाडे लावली. त्याची प्रेरणा जर्मनी आणि जपान असल्याचे त्या नमूद करतात. 2004 मध्ये त्यांना मिळालेला शांततेचा नोबल पुरस्कार तसेच भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्कार आणि इंदिरा गांधी पुरस्कार देऊन गौरविले आहे. जगभर त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्याची यादी मोठी आहे. पण त्याच्या कार्यात जपानमध्ये त्यांनी सुरू केलेली चळवळ पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरली. एखादी वस्तू वापर झाल्यावर फेकून न देता त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे. आज जो प्लास्टिक आणि कचरा यांचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो सोडविण्याच्या प्रयत्न या चळवळीतून झाला आहे.
माथाई याचे बालपण अतिशय निसर्ग संपन्न केनिया गेले. येथील डोंगर रांगा, शेती आणि निसर्ग यांनी त्यांना मोहित केलं. पुढे केनियाच नव्हे तर आफ्रिकेत वसाहतवादी युरोपियन देशांनी तेथे आपले साम्राज्य निर्माण केले. त्यात बदलती सामाजिक राजकीय आर्थिक स्थितंतरे त्यांनी टिपली आहेत. त्याचबरोबर जंगल विनाश आणि त्याचे भीषण परिणाम व उपाय याची अभ्यास आणि कृतीतून त्यांनी सांगड घातली. महिलांना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यातून आर्थिक उत्पन्न मिळते हे दाखवून दिले. माफिया विरोधात लढा दिला. राजकीय नेतृत्व केलं. आपली गरिबी आणि दारिद्र्याचे मूळ निसर्ग आणि पर्यावरण विनाशात आहे, हे सिद्ध केलं.त्यासाठी पर्यावरण वाचविले पाहिजे, हे सर्व जगाला पटवून दिले.
आपल्या या सर्व कारकिर्दीचे मूळ लेखिका आपल्या बालपणात शोधते. ‘टायनी सीड’ या पुस्तकात माथाईच्या हिरवाईच्या स्वप्ना विषयी लिहिले आहे.
“माऊंट केनियाच्या पायथ्याशी असलेल्या एका शेतात एक लहानशी मुलगी आई सोबत काम करते. ती चिंतीत आहे. कारण येथील जंगल हळूहळू नष्ट होत आहे. पण तीला ती पेरत असलेल्या बिजाची ताकद माहिती आहे.”
— लेखन : डॉ त्र्यंबक दुनबळे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
