कामगार चळवळ दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. वृत्तपत्रांमधून कामगार सदरे देखील बंद झालेली आहे. मुंबईचा कणा असलेला कामगार आता मुंबईतून हद्दपार झाला आहे, अशी खंत जेष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी नुकतीच व्यक्ती केली. त्यांच्या हस्ते मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २९ व्या पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये हे होते.
श्री अशोक नायगावकर पुढे म्हणाले की, आजकाल मोबाईलच्या दुनियेमध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. वाचन केल्याने आपली वैचारिक पातळी वाढते. चांगले लोक आहेत म्हणून हे जग चालले आहे. यांत्रिकीकरणामुळे रोजगार कमी होत चालला आहे. डॉ. शांती पटेल, कॉ. एस. आर. कुलकर्णी, जॉर्ज फर्नांडिस या कामगार नेत्यांनी आयुष्यभर आपलं योगदान देऊन कामगारांचे हित साध्य केलं आहे त्यासाठी कामगारांनी संघर्ष देखील केला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाला शुभेच्छा देऊन कामगारांचे आणि मान्यवरांचे साहित्य घेऊन हा अंक चांगला वाचनीय झाला आहे. तो आपण सर्वांनी वाचावा, असे आवाहन केले.

ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण सांगितले की, मुंबई पोर्टट्रस्ट मध्ये पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आता साडेतीन हजार कामगार राहिले आहेत. कामगार चळवळ कमकुवत झाली आहे, हे खरे आहे. गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व थकबाकी मिळाल्यामुळे सेवेतील आणि सेवानिवृत्त कामगारांनी युनियनला सढळ हस्ते देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांचे मी आभार मानतो.
ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आपली १०४ वर्षाची जुनी कामगार संघटना असून, कामगार अंकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करता, याचा मला अभिमान वाटतो. मारुती विश्वासराव हे अंकाचे कार्यकारी संपादक असून पत्रकार म्हणून गोदीत घडत असलेल्या बातम्या ते सविस्तरपणे देतात. त्या बातम्या आम्ही छापतो. मारुती विश्वासराव व त्यांचे सर्व सहकारी गेली २९ वर्ष पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे संपादन करीत असल्याबद्दल त्यांचे मी कौतुक करतो.
युनियनचे आणि फेडरेशनचे जनरल व सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी कामगारांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे कामगारांना व पेन्शर्सना चांगली पगारवाढ मिळाली.वेतन कराराची थकबाकी मिळाल्यामुळे कामगारांना गणपती व दिवाळी चांगली गेली.
प्रास्ताविक कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन सतिश घाडी यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले.
याप्रसंगी मान्यवर व लेखकांचा “पोर्ट ट्रस्ट कामगार अंक व पुष्पगुच्छ” देऊन सन्मान करण्यात आला.

विश्वासराव यांचा सत्कार –
गेली एकोणतीस वर्षे या विशेषांकाचे संपादन करीत असल्याबद्दल तसेच सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल, न्यूज स्टोरी टुडे साठी नियमित लेखन करणार्या मारुती विश्वासराव यांचा न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे, पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी “न्यूज स्टोरी टुडे मग” भेट देऊन हृद सत्कार केला.

कवी अशोक नायगावकर यांना देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे “माध्यमभूषण” पुस्तक भेट दिले.

प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, युनियनचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे आजी माजी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
