Saturday, November 22, 2025
Homeलेख"सुखी जीवनाचा मंत्र !"

“सुखी जीवनाचा मंत्र !”

पुण्यातील या सोसायटीत रहायला आल्यापासुन नजर जाईल अगदी तोपर्यंत आसपास भरपूर झाडी आणि त्यातही वृक्ष वेली दिसायच्या. हिरवाई, ताजा गंध या सहीत खुप आनंद अनुभवत होतो. थोडा गारवा, डोळ्यांना शांतता आणि मनाला प्रसन्नता सारेच आगळे वेगळे होते.

एक दोन दिवसातच समजलो की, प्रत्येक झाडावर छोट्यामोठ्या पक्षांची घरटी आहेत.वेगवेगळी शाकारलेली, विणलेली अगदी मनोहारी दृष्यच होते.

रोज रोज बघताना निरिक्षणाची संवय लागली. आवड वाढत गेली. किलबिलाटातही वेगवेगळे आवाज ओळखायची कानांना संवय लागली.कधी भूकेने सक्काळीच पक्षांचा किलबिलाट, कधी ऊगाचच एखादा कावळा एकटाच काव काव करायचा. कधी साळूंक्यांचा नाचाचा क्लास तर चिमण्यांचा खेळण्याचा चिवचिवाट. पोपट जेव्हा यायचे तेव्हा खूप जल्लोष करायचे. क्वचित कोकिळेची तान, रात्रीची टिटवी किंवा एकदोनदा घुबडाचा आवाज. मजा यायची.

मुंबईत कर्ण कर्कश्श गाड्या, आगगाडी बस विमाने इ. भोंगे व ब्रेक्स चे आवाज नको व्हायचे.पण इथले हे आवाज हवेहवेसे वाटायचे.आता कोणत्या घरट्यात पिल्ले आहेत, अंडी आहेत, ती घरटी रिकामी आहेत. हे पण समजायला लागले.अंडी असली तर मादी घराबाहेर येतच नाही कारण अंडी ऊबवत असते. मग नर तिला काहीतरी चोचीत घेऊन येतो व भरवतो. पिल्लं असतील तर मादी व नर दोघेही घरट्याच्या आसपासच ऊडतात व एक डोळा घरट्यावर ठेऊन सज्ज असतात. नर बाहेरून खाणं आणुन दोघे खातात. नर पक्षी एकटा खात नाही. पिल्ल ऊडून गेली की, आईबाप ही दूर देशी जातात.

जवळ जराशी एक पाणथळाची जागा होती. त्यावरच्या वृक्षांवर शुभ्र बगळे रात्री ओळीत येऊन आपल्या जागांवर बसत. आवाज नाही. घरं बहुदा नसावित. फक्त शुभ्र ठिपके दिसत. सकाळी विचित्र आवाज करत परत ऊडून जात. म्हणजे हे वेगळ्या सोसायटीचे रहिवासी होते. एकच गंमत वाटायची ती म्हणजे रात्री झोपेत हे फांदीवरून पडत कसे नाहीत.? इवलेसे सारे जीव…. इवलाले हात व पाय आणि ऊलूशीच चोंच पण किती छान जीवन जगतात!आपल्या ऋतूमानावर काम करतात. पावसाळा आल्यावर घरटी सज्ज करू लागतात. हवं तसं सामान हुडकून आणतात. विणायला नरमादी दोघेही हुषार असतात. सातभाई, दयाळ, सुतार, सुगरण,शिंपी, सगळे कुशल कारागीरच. पोपट ढोलीत असायचे. सुतार सारखा खोडावर ठक् ठक् करायचा. किती एकमेकांना समजुन घेतात! ऊमजून कामे करतात.
आपल्या खडतर संकट घात कधी होईल माहिती नाही अशा अनिश्चितीच्या आयुष्यात मैत्री, मदत,घर संसार, जोडीदार, माता पिता बनणे, जबाबदारीने बालसंगोपन, कधी अघटीत घडलं तर एकत्र विलाप, वृद्धत्व,असे जिवनाचे सारे टप्पे कंगोरे आनंदात पूरे करताना दिसत होते.कधी कूठे पाणी असले कि हे आलेच एकत्र. झुंडीने येत किलबिलाटात मस्त अंघोळींचा हैदोस चालायचा. पुन्हा बुडायचं पंख फडफडवत परत बाहेर येऊन अंग सुकवत रहायचे.मधेच मस्तीत पोहायचं.हल्ली असा स्नानाचा हैदोस मला फार आवडायचा.

हळू हळू थंडी जाणवायला लागली. वृक्षाची पत्री खाली तळाशी ढिग करू लागली. त्यात ओलाव्याला असणारे किटक अळ्या अंडी वेचण्यात हे जीव महा हुषार. हेच मग चोचीत भरवतात. नकळत एकमेकांना खेटुन बसत ऊब मिळवतात. पानांचे आडोसे घेतात.आणि बिचार्यांचे कंठही गोठतात.कसेबसे या थंडीत जीव जगवतात. ऊन्हाळा आला. कोकिळेने वसंतातली पहिली तान मारली अन् झाला किलबिलाट सुरू.
पाणी मिळाल्यावर अंघोळीचे सोहाळे. इकडेतिकडे फिरणे. सारे मजेत चालू झाले.कधी कधी पांच सहा साळूंक्या तर कधी चिमण्या एकत्र गोळा झालेले दिसत. तावा तावाने आवाज करत एकमेकींना काहीबाही सांगत असाव्यात. सुखादु:खाच्या गोष्टी का सासू, जावेचे नणंदेच्या तक्रारी करत असाव्यात ? बिचारा नर दूर एकटाच बसलेला शांत वाटे.या साळकायांच्या चुगल्या मात्र जोरात असत.

एकदा गंमत पाहिली. एकदम खुप सारे कावळे एकत्र जमले. आसपासच्या वीजेच्या तारांवर ओळीत बसले. एका रांगेत. एक दोन कावळे दूरवर होते. सगळ्यांनी एकच काव काव सुरू केली. ऐकवेना.बहुदा पालक सभा होती. नाहीतर कधीतरीच भरणारी शाळा होती. नाहीतर गावपंचायत असावी.बरी आहे पांखरांची विना डबा बाटली, दप्तराची शाळा. ते दोघे बहुदा शिक्षा सुनवत असावेत. कधीतरी तो कलकलाट थांबे.ऊन वाढले तशी पांखरे भिरभिरत ऊडायला लागली.

मग कट्ट्यावर पसरट डब्यातून पाणी ठेऊ लागलो. दाणे, मिरच्या, ब्रेड, पोळीचे तुकडे जे वाटेल ते कागदावर ठेऊ लागलो पाण्यासाठी धावत यायची.खायची. सावलीत बसायची. मग माझाच जीव शांत व्हायचा. फारच विलोभनीय अशी ही मैत्री व सोबत होती.

पाखरे घरटी बांधायला लागली तेव्हा पाऊस जवळ आला हे कळलं. रोज रोज ढग जमायला लागले. वारा सुसाट झाला.एका संध्याकाळी अंधारून आले. वीजा चमकल्या. वारा बेभान झाला. ढग गडगडले. एकदम चकाकून गेलेली वीज मोठ्याने कडाडली. जोरात वारा पाऊस कोसळू लागला. कडकडाट करत समोरचे दोन वृक्ष खाली कोसळत आमच्या खिडक्यांवर पडले. त्या बंद कराव्याच लागल्या. पण झोप येईना. घरटी, पक्षी पाखरं काय झालं असेल त्यांचं ? डोळ्यापूढे अंधार आला.
दिसत नव्हतं. मदत तरी काय करणार ?

आठ दिवस लागले परत खिडक्या ऊघड्या करायला.
बघतो तर नव्याने निवडलेल्या वृक्षांवर परत नव्याने घरटी बांधायची लगबग सुरू होती. सारे नविनच वाटले. नविन सोसायटी, नविन सभासद, नवी घरे ….. ती बिचारी पांखरे.. आनंदात दिसली.
स्थिरता नाही…. अन्न जीव जगणं सारेच अनिश्चित…, सावली दाणापाणी मिळेल कि नाही ही चिंताही नाही. तरिही किती छान आयुष्य जगतात. संसार थाटतात. घराचे रक्षण करतात. संसार, अंडी पिल्ले, संगोपन पंखात बळ भरणे, शिकवण, सारे न शिकताच करतात. जबाबदारीने आणि शिस्तीने. थोड्या काळाचे आईबाप होतात. बळ देतात. पंखात बळ आलं की पिल्ले ऊडून जातात. तरीही विलाप न करता रिकामी घरटी सोडत ते पक्षीही दिशांतरी ऊडून जातात, अगदी विना तक्रार.
कोणतीही अपेक्षा न ठेवता.

एक अनुभव नक्कीच आला, तो म्हणजे या पाखरांपासुन आनंदी, विनातक्रार आणि निरपेक्ष जिवन जगायचे व आनंदी रहायचे.हे तत्व शिकण्यासारखे आहे.
सुखी आयुष्याचा तो एक मंत्रच ठरावा.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️‌ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dipti Bhadane on मायबाप
Sujata Yeole on मायबाप
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on “शिवाजी विद्यापीठ”
अरुणा मुल्हेरकर on वाचक लिहितात…
गोविंद पाटील सर on बालदिन : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”