Monday, January 26, 2026
Homeलेखमाझी जडणघडण : ७४

माझी जडणघडण : ७४

“माणूस”

एक गोष्ट निश्चित, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की प्रपंचात रमणारी माझ्यासारखी आणि माझ्यासारखीच अनेक, कितीही म्हणोत की, ”आयुष्यात जे जे करायचं ते ते सर्व अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्य बुद्धीने पार पाडलंय. आता निवांत निवृत्ती अनुभवावी.” पण खरंच असं होतं का ?

दोन्ही मुलींचे विवाह पार पाडल्यानंतर काहीसे असेच आम्हालाही वाटले होतेच पण थोड्याच दिवसांनी हेही लक्षात आले की तसे नसते. फक्त वाट बदलते, वळण बदलते. पुढच्या बदललेल्या वळणावरही निरनिराळ्या प्रकारची जीवनातली गुंतवणूक ही नाही सुटत पण तरीही “आता आपापले छंद, आवडीनिवडी जोपासायच्या, जमेल तितका प्रवास करायचा, देश विदेशातल्या आयकॉन ठिकाणांना भेटी द्यायच्या” हे मात्र आम्ही ठरवले.

आम्हाला दोघांनाही तशी प्रवासाची खूप आवड पण आयुष्याचा एक मोठा काळ मुलांचे संगोपन, शिक्षण, आर्थिक सुबत्तेसाठीची धावपळ, नातीगोती, रीती परंपरा, घरातल्या वृद्धांची काळजी यात अडकून पडला होता. तरीही दरवर्षी आम्ही चौघं कधी मित्र-मैत्रिणींबरोबर कधी बहिणींच्या परीवाराबरोबर छोट्या-मोठ्या सहली, प्रवास करतच होतो आणि प्रत्येक वेळी प्रवासात आलेल्या अनुभवांच्या आठवणींनी नकळत समृद्ध होत असू. त्याचत्याच चक्रातून बाहेर पडून काही दिवसांसाठी तरी जगलेलं वेगळं जीवन मनाला दर वेळेस एक वेगळे चैतन्य, उभारी देते हे नक्कीच.
“केल्याने देशाटन मनुजा येई शहाणपण.” अशा घोकून पाठ केलेल्या सुभाषितांच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की रिक्रीएशन किंवा बदल नेहमीच मनाला ताजेतवाने करतात म्हणून जशी जमेल तशी यथाशक्ती भ्रमंती प्रत्येकाने जरूर करावी.

खरं म्हणजे प्रवास ही एक संस्कृती आहे. लहानपणी जर आम्हाला कोणी या वाटेवर चालायला शिकवलं असेल ते वडिलांनी आणि आजोबांनी. जवळजवळ प्रत्येक सुट्टीत आजोबा आम्हाला आणि माझ्या मावशीच्या परिवाराला घेऊन दूरच्या प्रवासाचे बेत आखत आणि अत्यंत उत्तमरीत्या ते पारही पडत. जवळजवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आजोबांमुळे घडला आणि त्या अनुषंगाने पर्यटनाची आवड आणि गरजही आयुष्यात निर्माण झाली. नकळतच या बालपणी केलेल्या प्रवासाने वेगळेच भौगोलिक, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक संस्कार आमच्या बालमनावर झाले. काही काही प्रसंग अजूनही स्मरणातून गेलेले नाहीत. एक छोटासा पण तरीही माणूसपणाचं दर्शन घडवणारा एक प्रसंग सांगते. आम्ही गोव्याहून परतत होतो. त्यावेळी आंबोलीच्या घाटात आमची बस नादुरुस्त झाली. (त्यावेळी आता सारखे वेगवेगळे महामार्ग, दुपदरी चौपदरी रस्ते नव्हते) किर्र काळोख, गर्द झाडी, भयाण सामसूम, एकाकी रस्ता ! मुख्य म्हणजे सहलीतील सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. जवळ खायलाही काहीच उरले नव्हते. पुढच्या टप्प्यावर एका ठिकाणी रात्रीचे जेवण घेण्याचा बेत ठरलेला होता पण तोही बस फेल झाल्यामुळे लांबला होता. आम्ही सारे हताशपणे, भुकेले बसच्या बाहेर येऊन त्या जंगलाने वेढलेल्या रस्त्यावर उभे होतो. तेवढ्यात कुठूनतरी दोन माणसं आमच्याजवळ आली. त्यांच्या हातात काठ्या आणि अंगावर फक्त देह झाकण्यापुरतीच वस्त्रं होती. गरीब, आदिवासी, जंगलात राहणारी ही लोकं आम्हाला म्हणाली, ”इथं जवळच आमची वस्ती हाय. चला तुमी पावनं. तुमच्या खाण्यापिण्याची बेस सोय करतालो”. ते भराभर चालत गेले त्यांच्यापाठी काट्याकुट्यातून आम्हीही. त्यांनी घरात आवरावर करून निवांत बसलेल्या त्यांच्या बायकांना आमच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले आणि काय आश्चर्य त्या बायकांनी बघता बघता आम्हा पंधरा-सोळा जणांसाठी इतकं आनंदाने रांधलं आणि वाढलं ! “हुलग्याची आमटी आणि तांदळाची भाकरी.” आमटी चांगलीच झणझणीत होती. खाताना सारेच घामाघूम झाले होते. पांढऱ्या शुभ्र मऊसूत भाकऱ्यांची चवही खरपूस न्यारीच होती. आजही त्या जेवणाची चव माझ्या जिभेवर आहे आणि त्याहीपेक्षा त्यांचा प्रेमळ पाहूणचार आणि आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो. यांना का गरीब म्हणायचं? हाच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात उमटला होता. ना नात्याचे ना गोत्याचे. पोटातल्या भुकेने जोडले गेलो होतो इतकेच. आम्ही देऊ केलेले पैसे त्यांनी घेतले की नाही ते मला आठवत नाही पण खरं म्हणजे आम्हीच कर्म दरिद्री म्हणून त्यांच्या आर्जवीपणाचा, प्रेमाचा आणि कष्टाचा हिशोब मात्र मांडला. असो !

प्रवास बालपणीचे, लग्नाआधी मित्र मैत्रिणींबरोबरचे, शाळा कॉलेजातल्या सहली आणि नंतरच्या आयुष्यात नवरा, मुलींबरोबर आणि आम्ही दोघांनीच नामांकित ट्रॅव्हल कंपनीं बरोबर केलेले अनेक प्रवास म्हणजे अनुभवांची, आनंदाची मनोरंजक भलीमोठी शिदोरीच म्हणावी लागेल.

पद्मपाणी अजंठा

अजंठा वेरूळच्या लेणी आणि तिथल्या पेंटिंग पासून ते पॅरिसच्या लुओरे (louvre) म्युझियम मधल्या कलाकृती पर्यंतचे सर्वच प्रवास अनोखे आणि आनंददायी होतेच पण तुमच्या कानात हळूच एक सांगते, ”प्रचंड तंगडतोड करत पॅरिसच्या जगद्विख्यात म्युझियम मधले जगभरात गाजलेले, खूप बंदोबस्तात ठेवलेले “मोनालिसाचे” पेंटिंग आम्ही पाहिले आणि मला अजंठाच्या दगडात कोरलेल्या पद्मपाणीच्या अलौकिक सुंदर लयबद्ध, भावपूर्ण आणि चिंतनयुक्त पेंटिंगची आठवण झाली आणि मी खरोखरच सहजपणे उद्गारले “कुठे ते आणि कुठे हे ?”
“मोनालीसा” पेंटिंग वरचे अनेक कलाकारांचे. ”ते का आणि कसे छान आहे” हे सांगणारे अनेक लेख मी वाचले आहेत त्यांचा सन्मान ठेवून मी माझे हे मत व्यक्त केले. बाकी म्युझियम मधल्या अनेक इतर कलाकृती बघतानाना मात्र खरोखरच आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.

मोनालिसा

अशाच प्रकारचे आणखीही अनेक अनुभव मला माझ्या परदेश सफारीत आले. अमेरिकेत कुठेही  कॅस्केड (छोटा धबधबा) पाह्यला आलेले अनेक टुरिस्ट्स मी अशा पर्यटन स्थळी पाहिलेत. आम्हीही  त्यात असायचो. भव्य, सुंदर, आखीव रेखीव आणि अत्यंत स्वच्छ, देखणा पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेला परिसर. खूप पायपीट करून कॅस्केड पर्यंत पोहोचल्यानंतर कुठल्यातरी डोंगरातून एखादी बारीकशी पाण्याची धार वाहत असताना पाहिली की मनात “फूस्स” व्हायचं. वाटायचं त्यापेक्षा पावसाळ्यात आमच्या लोणावळा खंडाळ्याला सह्याद्रीतून वाहणारे झरे-धबधबे पाहायला या की ! पण परदेशात फिरताना सतत जाणवतं ते पर्यटनाचे राष्ट्रीय महत्त्व आणि त्यासाठी प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा (यात प्रामुख्याने स्वच्छतागृहे) आणि शिस्तबद्ध प्रवासीही. एकेका स्थळाचं जपलेलं सौंदर्य आणि महत्त्व मग तो *नायगारा* असो किंवा असाच एखादा छोटासा झरा- कॅसकेड ! नैसर्गिक सौंदर्याची अपार जपणूक हा गुण तिथे विशेषत्त्वाने  जाणवतो. आपल्याकडे स्थळांपेक्षा भेळपुरीचे कागद, खाल्लेले बुट्टे, रिकाम्या बाटल्या, असंख्य कागदांचा देखावा सभोवताली माजलेला पाहायला मिळतो. असो !

असाच आणखी एक मनाला छेदून जाणारा प्रसंग. मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातली ती सुरेख कोरीव कामशिल्पं पाहताना आम्ही सारेच अंतर्मुख झालो होतो. शिवपार्वतीच्या अनेक नृत्यांतून, पदन्यासातून, स्थिती आणि लयबद्ध आसनांतून साकार झालेली ती शृंगारिक लेणी आणि त्यातून झिरपणारं पावित्र्य, मांगल्याचं कामसूत्र न्याहाळताना मन अगदी हरखून गेलं होतं. डोळ्यात मावत नव्हतं असं ते सौंदर्य आणि ती कला किमया तृप्त मनाने नजरेत साठवून आम्ही पचमढीला जाण्यासाठी इटारसी स्टेशनवर आलो. गाडी यायला थोडा अवकाश होता. खजुराहो मंदिराला भेट दिल्यानंतर आता अनुभवत असलेला हा स्टेशनवरचा परिसर अत्यंत बकाल आणि दरिद्री होता आणि त्यातच कुठून तरी अचानक एक वेडगळ ! बडबड करणारी, मातकट, केस पिंजरलेली पण संपूर्ण नग्न स्त्री भीक मागत स्टेशनवरच्या त्या गर्दीत केविलवाणी पण तरीही काहीशी बेफिकीर आणि बेशरमपणे फिरताना आम्ही पाहिली आणि मन इतकं कळवळलं ! खरं म्हणजे एकच नग्नता ! दगडात कोरलेली ती सुंदर, पवित्र भासणारी निर्जीव नग्नता आणि ही साक्षात समोर येऊन ठाकलेली बकाल, ओंगळ पण सजीव करूण, हतबल नग्नता. नाही विसरू शकत भ्रमंतीतले हे दृष्य कधीही.

आमची पहिली परदेश सफर म्हणजे १९९६ सालची लंडन टूर. त्यावेळी ज्योतिका लंडनला होती. एमबीटी कंपनीतर्फे तिची तिथे नेमणूक झाली होती आणि तिथे ती शेअरिंग मध्ये एका सुंदर बंगल्यात राहत होती. मी, विलास आणि मयुरा आम्ही ज्योतिकाला भेटण्याच्या निमित्ताने लंडनला गेलो होतो. दीड दोन महिने आम्ही लंडनला राहिलो आणि अर्थातच त्या संपूर्ण वास्तव्यात आम्ही लंडन ब्रिज फॉलींग, पासून ते आपल्या कोहिनूर हिऱ्यापर्यंत, तिथले हिरवेगार पार्क्स, तलावात पोहणारी मुक्त बदकं, तिथले कॅसल्स, मादाम तुसाड (जिथे अनेक जगप्रसिद्ध लोकांचे मेणाचे पुतळेआहेत) तिथल्या बिन गर्दीच्या आरामशीर लोकल ट्रेन्स, गुलाबी थंडी, भुरभुरणारा पाऊस, धुकं आणि मुख्य म्हणजे शिस्त आणि स्वच्छता अगदी भरपूर अनुभवली. अगदी भारावून जाऊन अनुभवली पण याही सहलीतला एक क्षण मात्र माझ्या मनात अजूनही ताजा आहे. वेगळ्या कारणाकरिता.

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवलं आणि मनात आलं आज आपण राणीच्या देशात आलोय. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्या ब्रिटिशांच्या भूमीत आज आपण आहोत. अतिशय विलक्षण क्षण होता तो! संमिश्र भावनांचा. आम्ही आमचं इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगेजसह बाहेर आलो आणि ज्योतिकाने दूरूनच धावत येऊन विमानतळावर आम्हाला इतकी घट्ट मिठी मारली की आम्हा सर्वांचे डोळे त्यावेळी ‘वियोगानंतरची भेट” म्हणून पाणावलेले पाहून एक ब्रिटिश सहप्रवासी आमच्या शेजारीच हातातल्या बॅगा खाली ठेवून क्षणभर स्तब्ध उभा राहिला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाला “व्हॉट अ ब्यूटीफुल फॅमिली यु आर !”
सर्वसाधारणपणे ही ब्रिटिश माणसं खूप शिष्ट असतात. उगीच कुणाशी बोलतही नाहीत या पार्श्वभूमीवर मात्र जाणवलं की, “जगात तुम्ही कुठेही जा माणूस हा मूलभूत कुटुंबवत्सल असतो” आणि हे मी माझ्या अनेक देश विदेशी केलेल्या सफरीत नेहमीच अनुभवत आले आहे.

मी किती फिरले, किती देश पाहिले आणि त्या त्या ठिकाणच्या सुंदर पर्यटन स्थळांबद्दलची वर्णने येथे करत बसण्यात मला अजिबात रस नाही (आजकाल विविध टूर कंपन्यांमुळे अथवा इतर कारणांमुळे बहुसंख्य लोक प्रवास करत असतात) पण विविध देश, विविध ठिकाणं पाहताना तिथली सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, वैचारिक, कला गुणसंपन्न जीवनपद्धती अनुभवताना मला अगदी सातत्याने एकच जाणवत राहतं की विविध पेहरावांच्या, विविध चेहऱ्यांच्या आतला माणूस मात्र अगदी एकच आहे. काळ्या गोऱ्या मागे अदृश्यपणे वाहत असलेल्या भावनिक झऱ्यांमध्ये मात्र कमालीचे साम्य आहे, एकच ”ग्लोबल सेन्सिटीव्हीटी” जागतिक संवेदनशीलता.
म्हणूनच आपल्या बहिणाबाईने माणसाला मारलेली ती आर्त हाक पृथ्वीच्या कणाकणात सामावलेली आहे असेच वाटते.
क्रमशः

राधिका भांडारकर

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Mona Lisa is a Wonderful Painting ,no doubt ,but is it the Greatest of all time ?Or is it a Triumph of Clever Marketing ?
    What about the magical Water colours of Paul Cezanne?
    The lush Oil paintings ofJames Tissot?
    The Venetian masters ,like †*,Bellini,Vechachis ,Titian,Tinoret ,Georgiani,?
    Or the Impressionist Painters like*Renoir,Money ,Cicily ,Dega and Manette?
    Not to forget the Genius ,Ravi Varma !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments