जीवन गाणे…
जून, जुलै महिन्यात पावसाला जोरदार सुरुवात झालेली असते. मेघ राजा आस्मानी टपोरे थेंबांचा खेळ खेळत असतो. चारही मासातील पावसाविषयी बातम्या भ्रमणध्वनीवर ‘पंजाब डखचा’ अंदाज शेतकरी ऐकतो व सरकारी हवामानतज्ञ तीन पट्टयात म्हणजे कमी, जास्त, अती येऊ घातलेला पावसाचा अंदाज सांगतात.हे नेहमीचच असते.मग काय कुटूंब घेऊन धबधब्याच्या सहवासात जाणे लोक थांबवतात असे नाही तर जातातच.
“जेथे झाडं दाट,
तेथे पावसाला सुसाट वाट”
हिरवळीच्या भोवतालात कोसळधार पाऊस होतो. नदी वाहते, धरणं शतक काढतात. समुद्राला भरती-ओहटी असते. तेव्हा मोठं- मोठाले डोंगराच्या- उंच भागावरून दऱ्या खोऱ्यातून पाणी वक्राकार होत- होत सखल भागावर फेसाळत कोसळत सळ सळत … पाणी खाली कोसळते असा हा धबधबा.
जगातील सर्वात उंच धबधबा दक्षिण अमेरिकेतील एंजेल आहे.पर्यटक कोसो अंतरावर न जाता प्रसिद्ध व जवळच्या धबधब्या पर्यंत पोहचतात.
धबधब्यांना वाॅटर फॉल, झरना,झरा इत्यादी नावे लोक बोलतात. शासकीय, स्थानिक दोन/तीन सुट्ट्या एकत्र आल्या, त्या अगोदरच नौकरीचाकरी करणारे लोक आपापल्या कुटुंबासह धबधब्याचा, खुलया निसर्गाचा कौटुंबिक आनंद घेण्यासाठी खास नियोजन – आयोजन करून खाजगी बस,कार किंवा बाईकने पोहचतात.अशा गप्पा, गाणी,कविता ऐकत,करत आम्ही तेथे पोहोचलो.
या अविस्मरणीय अनुभवाचा सुट्ट्यांचा आनंद आपण सहान- थोर घेऊ या…
निसर्गरम्य परिसरात हिंडणे साऱ्यांना हवेहवेस वाटते. अंतःकरणा पासून उत्स्फूर्त होणारा आनंद शरीरावर रंध्रे रंध्रेत मला जाणवला.
क्षणिक सुखा नंतर, संसारात दहा तास कामाचा येणारा ताण-तणाव, सांसारिक त्रासाने क्षीणलेले मस्तकावर थप थप पाणी पडले की मस्तक थंड थंड होते.गार गार मन समाधान मानते.
धबधब्यांचे नैसर्गिक दृश्य पाहायला आम्ही गेलो. तेथे तेव्हा त्याच्या सानिध्यात सारे दुःख विसरायला झाले. मनातून बाहेरून ओले चिंब झालो.लय मौज आली!.’जे फक्त बाहेरून ओले चिंब होतात’.ते पूर्ण आनंद घेत नाहीत.घेऊ शकत नाही.
धबधब्याच्या सहवासात रंगी बेरंगी- वेली, बहूरूपी पाखरं, रंगीत फुलपाखरू, हळदी चिमण्या, हिरव्याकंच वेली, गुलाबी फुलं, हलत- झुलत- डुलत गवतफुले, रानफुले असा सुंदर देखावा बघताच आम्हाला व सर्वांना भला आनंद झाला.
फुलाफुलांशी हसत खेळत
फिरती भोवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे ||
फुलांनवर उडती फुलपाखरे !
अ.ज्ञा.पुराणिक
सर्व कुटूंब संग
सारे चिंब चिंब…
एकमेकांनवर फवारे,पाणी उडवून झाले नंतर उदरात भुकेने कावळे ओरडत होते .समोरच्या छोट्या हाॅटेलची कांदा, बटाटे,रानभाजी, अळूपानं पासून अनेक व्हरायटीची गरमा गरम, कुरकुरीत भजीचा स्वाद आम्ही घेत घेत.. गवतीचहा,आले कुस्करून झकास चहा,काय मज्जा आली ! ताज महाल रेस्टॉरंटची थोडी बराबरी.
आम्ही पुर्ण तयार झालो. मक्कीची कणंस चुलीवर भाजून मिळतात हे ऐकून… तोंडाला पाणीच सुटले कणीस खाण्यात ‘वंदे भारत रेल’ सारखाच उदरभरणचा आनंद मिळाला.पलिकडे वाफविलेले कणंस मिळाली.ते ही तोंडातून वाफ निघे पर्यंत खाणे सुरु ठेवण्यात वेगळीच मज्जा आली !
मज्जा येते……
राव…
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”… तसेच धबधबे म्हणत असतील, “पर्यटक राजा होऱ्या पुढच्या वर्षी लवकर या” ….
धबधबे माणसांना शारीरिक स्वास्थ करतात व माणसांच्या मनाची मोकळीकताही करतात.
धबधबा जास्त उंचीचा नको ! कारण काय ? आपल्याला त्याचा आनंद दुरुनच घ्यावा लागतो.वरून पडणारे डोंगर शेंड्यावरचे पाणी घणासारखा मार बसून आपण घायाळ होऊ शकतो.तेथील खालच्या पाषाणाला तडे पडतात. ते उगीच नाही तडे पाण्याचा धारेने नाहीत तर सतत पडणाऱ्या धारेने पक्या दगडाला तडे पडतात.म्हणून अतिउंचीचा धबधब्या पेक्षा, मध्यम उंचीचा धबधब्या खाली मनसोक्त उभे राहून कारंजा सारखे फवारे,फेसाळणारे पाणी मस्तकावर घेऊन मनसोक्त आनंद घेता येतो.
धबधब्याच्या खाली उभे राहिले की एक आयुर्वेदातील मस्तक धारोष्ण क्रिया होऊन जाते. असे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले.
डोके, पाठ, मान दुखी यांना आराम मिळू शकतो. दिलखुलास पणाने वरून पडणाऱ्या धारा मस्तकावर घेतल्या पाहिजे.
सकाळी भास्कर च्या सरळ येणाऱ्या पिवळे धमंक किराणांचा धबधब्यावर मनमोहक दृश्य दिसते. तेव्हाची वेळ टिपणाऱ्या पर्यटकांना पाण्यामध्ये मिसळताच खरोखर निसर्गरम्यतेचा आनंद, मन समाधान , अतिरम्य प्रसंग, अविस्मरणीय क्षण आपण अनुभवू शकतो.
मराठी,हिंदी गीत आपण नेहमी ऐकतो पण कोणत्याही गीता पेक्षा श्रेष्ठ पक्ष्यांचे किलबिलाट, चिमण्यांचा चिवचिवाट, फुंलाचा त्रासिक भुंगा, गुणगुणण्याचा ध्वनी, वाऱ्याचे सुश्रव्य शास्त्रीय संगीत, ढगांचा ढोलक आवाज, विजांची नागिण चालीची रोषणाई… व्वा ! व्वा ! असे उदगार सहजपणे आमच्या पर्यटकांच्या मुखातून बाहेर पडले.
धबधबाच्या कोसळणाऱ्या पाण्याखाली उभे राहून सेल्फी- छायाचित्र घेणारे, निसर्गाचा आनंद चेहऱ्यावर उमटताना दिसतोच.तो आनंद आम्ही परतीचा प्रवास सुरू असताना भ्रमणध्वनीतील सेल्फी, छायाचित्र पाहत पाहतच घरी आलो.
धबधब्या खाली जे लहान कुटूंबे बालकांनासह आनंद घेतात त्यांना प्रोत्साहन आम्ही दिले. त्यांच्या आनंद वाढीत भर घातली.धबधब्या खालच्या महा आनंदामध्ये आपण खारीचा सहभाग घेऊ शकतो व दुसऱ्याला आनंद देऊ शकतो.तो परत दुप्पटीने आपल्याला आनंद मिळतो.
— लेखन : गोविंद पाटील. जळगाव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
