कुठेच घरात, दारात,
रस्त्यावर, शाळेत, मंदिरात,
दवाखान्यात, कार्यालयात,
गर्दीत… निर्जन ठिकाणी
गावात, शहरात
तु नाहीस कुठेच सुरक्षित..
तू असशील कोणीही,
अल्पवयीन, विद्यार्थीनी,
गृहिणी, शिक्षिका,
इंजिनीयर, डॉक्टर,
तु नाहीस सुरक्षित
असतेस तू सुरक्षित …
तुझ्या भोवतालच्या पुरुषांत
जोपर्यंत उन्नत सदविवेक
असतो जिवंत तोपर्यंतच …
बहुतांशी असतोही तो
त्याच्यांत ‘जीवंत’
जगरहाटी असते
म्हणूनच संतुलित
उभा ठाकतो तोही
न्यायासाठी तुझ्यासोबत
तुझ्या वरच्या अन्यायाविरोधात
प्राणपणाने लढत.
म्हणून राहतेस तु सुरक्षित….
बाई,
मोठं आहे तुझं दायित्व
तु मातृशक्ती ..तु सृजनत्व
तुलाच घडवायचा ‘माणूस’
पुरुषार्थ उमजलेला…
घडवायचा आहे समाज
निकोप, भयमुक्त
तरच राहील तू सुरक्षित.
अमानूष प्रवृत्तीना या वासनांध
सिद्ध हो दे कठोर दंड
कणखर हाती घे आसूड
अवघड हा संघर्ष प्रचंड
निर्भया, अभया,
हो सजग, सबळ तु,
हो एकजुट
चल उचलु निर्धाराने वज्रमूठ
जगण्या या जगात सुरक्षित..
— रचना : शुभांगी गावडे पाटील. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
