Wednesday, November 26, 2025
Homeकलाचित्र सफर : 57

चित्र सफर : 57

धर्मेंद्र”
काल निधन पावलेल्या अभिनेता धर्मेंद्रच्या आयुष्यातील एक करूण कहाणी. धर्मेंद्र यांना विनम्र अभिवादन.
— संपादन

कथा, कादंबऱ्यांत घडावा असा आश्चर्यकारक प्रसंग धर्मेंद्र या नवोदित अभिनेत्याच्या पहिल्याच चित्रपटाच्या एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस घडला ! तो प्रसंग इतका भयानक होता, की धर्मेंद्र नंतर कित्येक वर्षे तो प्रसंग विसरला नव्हता.

काय होता तो प्रसंग ?
आणि ते गाणं कोणाचं होतं ?
मग ऐका तर त्या गाण्याची ही जन्मकथा !

गीत : ‘ मुझको इस रात की तन्हाईमे… ‘, गायक : मुकेश, गीतकार : शमीम जयपुरी, सं. दि. : कल्याणजी – आनंदजी आणि चित्रपट : ‘ दिल भी तेरा हम भी तेरे ‘, 1960.

1950 च्या दशकाच्या अखेरीस हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या नायकाचा शोध घेण्यासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या एका संस्थेतर्फे एक अखिल भारतीय स्पर्धा घेण्यात आली. कारण अशोककुमार त्या वेळेस चाळिशीत होता; आणि राज, दिलीप, देव हे तिशी ओलांडलेले अभिनेते होते. ते जरी उत्कृष्ट अभिनेते होते, तरी त्यांना दिवसेंदिवस विशीतील तरुण म्हणून स्वीकारणे कठीणच जाणार होते.

त्या स्पर्धेत, पंजाबातील धरमसिंह देवल या ऐन पंचविशीत असणार्‍या तगड्या, देखण्या जाट तरुणाची निवड झाली॰ निवडून येणार्‍या तरुणाला आपल्या आगामी चित्रपटात नायकाची भूमिका देण्याचे आश्वासन काही निर्मात्यांनी दिले असल्यामुळे धरमसिंह आपल्या पत्नी आणि नवजात बाळासह मुंबईत आला॰ त्याने त्याचा डेरा त्याच्या रेल्वेतील मित्राच्या माटुंग्याच्या रेल्वे चाळीत असणार्‍या रिकाम्या घरी टाकला॰

आपल्याला आता धडधड चित्रपट मिळत जातील आणि काही दिवसांतच पाच / सहा आकडी पारिश्रमिक मिळू लागेल, अशी भाबडी आशा त्या तरुणाच्या मनात होती !

ही गोष्ट 1959 च्या सुमारासची.
पुरेसे जोडे झिजवल्यावर त्याला निर्माता अर्जुन हिंगोरानीने त्याच्या आगामी ‘ दिल भी तेरा हम भी तेरे ‘ या चित्रपटात नायकाची भूमिका दिली॰ पारिश्रमिक ठरले रु॰ 1,000 ! आणि त्याचे पडद्यावरचे नाव झाले ‘धर्मेंद्र‘. अफाट मुंबईत जागेशिवाय कसलाही आधार नसणारा धर्मेंद्र त्याच्या नवजात बाळासाह मोठ्या मेटाकुटीने दिवस ढकलू लागला॰

एक दिवस चित्रीकरण चालू असताना धर्मेन्द्रच्या असे लक्षात आले की आता त्याच्याकडे केवळ चार आणे (25 पैसे) उरले आहेत॰ हबकलेल्या धर्मेंद्रने निर्मात्याला ही परिस्थिती सांगितली आणि ताबडतोब किमान 25 – 50 रुपये तरी खर्ची द्यावे म्हणून काकुळतीने विनंती केली॰

निर्माता त्याला म्हणाला की उद्या आपल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण येथेच (‘मेहबूब स्टुडिओ‘, बांद्रा) आहे; त्या वेळेस सर्व वादकांना रोख पैसे देतील॰ त्यांच्या बरोबर तुलाही पैसे देण्याची व्यवस्था करतो; असे आश्वासन देऊन काळजी न करण्याचे बजावले॰ त्याने धर्मेन्द्रच्या देखतच हिशेबनीसाला बोलावून याच्याही नावापुढे काही रक्कम टाकण्याची आज्ञा केली॰
इतके खात्रीलायक आश्वासन मिळाल्यावर धर्मेंद्रने घरी जाताना त्या 25 पैशांपैकी 12 पैसे बसच्या तिकीटासाठी खर्च केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी साधारण अकरा – बाराच्या सुमाराला धर्मेंद्रने माटुंग्याहून बांदर्‍याला जाणारी ‘A – Sub‘ (आताची 201 क्रमांकाची) ही बस पकडली आणि शेवटचे 12 पैसे खर्च करून तो ‘ मेहबूब स्टुडिओ ‘ मध्ये मोठ्या आशेने आला॰
स्टुडिओत आल्यावर त्याला सर्व बंद दिसले !
गाण्याचे ध्वनिमुद्रण लवकर संपवून सर्व मंडळी गेली की काय, या आशंकेने त्याच्या पोटात धस्स झाले !

त्याने दारवानाकडे स्टुडिओ बंद का म्हणून चवकशी केली॰ दारवानाने, आज ज्या गायकाच्या आवाजात गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते त्या गायकाचा आवाज बसल्यामुळे आजचे ध्वनिमुद्रण रहित झाल्याचे सांगितले !
ते ऐकताच धर्मेंद्रला घेरी आली; आणि तो तेथेच कोसळला !
दारवानाने त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणले॰ निराशेच्या गर्तेत कोसळलेल्या धर्मेंद्रने तेथल्याच बाकावर बसून काही काळ विचार केला; आणि समोरच्या हौदाच्या तोटीने पोटभर पाणी पिऊन घराकडे चालत कूच केले॰
रखडत रखडत दीड दोन तासांनी तो घरी पोचला !

दिवस फिरले !
धर्मेंद्रचे चित्रपट लागोपाठ यशस्वी होऊ लागले॰ यथावकाश धर्मेंद्र हा दिलीपकुमार, देव आनंद प्रमाणेच आघाडीचा नायक झाला॰ त्याला पाच आकडी पारिश्रमिक मिळू लागले॰

त्या काळात, दर शनिवारी सायंकाळी ‘ विविध भारती ‘ या नभोवाणी केंद्रावरून सीमेवरच्या जवानांसाठी एखादी प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडीच्या चित्रपट गीतांचा कार्याक्रम ‘ जयमाला ‘ सादर करून जवानांचे मनोरंजन करत असे॰ आघाडीचा नायक म्हणून बस्तान बसवलेल्या धर्मेंद्रने एका शनिवारी त्याच्या आवडीची गाणी या कार्यक्रमात सादर केली; त्यावेळेस आठवणी सांगताना ही आठवण त्याने सांगितली॰

त्यावेळेस या प्रसंगाला एक तप होऊन गेले होते॰
कार्यक्रम संपताच धर्मेंद्रच्या घरचा फोन खणखणला ! (त्या वेळेस भ्रमण ध्वनि अस्तित्वात नव्हते.)

ज्या गायकाचा आवाज बसल्यामुळे ते ध्वनिमुद्रण रद्द झाले होते, तो गायकच धर्मेंद्रशी बोलू लागला॰ माझ्यामुळे तुमच्यावर अशी दारुण परिस्थिती ओढवल्याबद्दल तो धर्मेंद्रची वारंवार क्षमा मागू लागला !
धर्मेंद्र संकोचला !

कोण होता तो गायक ?
त्याचे नाव मुकेश !

… आणि ते ‘भैरवी‘ रागातले गाणे होते : ‘ मुझको इस रात की तन्हाईमे आवाज न दो ‘ !
‘दिल भी तेरा हम भी तेरे‘ हा चित्रपट पडला !
पण त्यातील 2 – 3 गाणी लोकप्रिय झाली, त्यांत हे एक गाणे होते !

जाता जाता :
हे गीत नंतर इतके लोकप्रिय झाले की, 1960च्या ‘बिनाका गीतमाला‘ च्या वार्षिक कार्यक्रमात 3 ऱ्या क्रमांकावर वाजवले गेले.

हेच गाणं लता मंगेशकरच्या आवाजातही ध्वनिमुद्रित झालं आहे. पण जर एखादं गाणं पुरुष आणि स्त्रीच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं असेल, तर नेहेमीच (अपवाद वगळता) पुरुष गायकानं गायलेलं गाणंच लोकप्रिय होतं. स्त्री गायिकेनं गायलेलं गाणं कित्येक वेळा ऐकलंही जात नाही.

या गाण्याच्या बाबतीतही असंच झालं. लतानं गायलेला भाग जवळ जवळ ऐकला गेलाच नाही !

नंतर काही वर्षांनी धर्मेंद्रनेही मुकेशसारखाच मोठे पणा दाखवला.

‘दिल भी तेरा…‘ हा त्याचा पहिलाच चित्रपट. त्यावेळेस त्याची नायिका कुमकुम ही ‘बी‘ ग्रेड चित्रपटांची गाजलेली नायिका होती. ती त्यावेळेस दिलीपकुमारबरोबर ‘कोहिनूर‘ मध्ये महत्त्वाची भूमिका करत होती. त्यामुळे, ती नेहेमी तक्रार करायची की, हा कुठचा नवीन नायक मला दिला आहे ?

धर्मेंद्र मुकाट्याने ऐकायचा; आणि याचा राग न मानता जमेल तेव्हा कुमकुमला एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून मानही द्यायचा.

मात्र, सौंदर्य, अभिनय याची वानवा असलेल्या कुमकुमची सद्दी 1965 — 66 नंतर संपली. तिला नायिकेच्या भूमिकाच मिळेनात. अखेरीस 1971 मध्ये तिने निर्माते — दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘ललकार‘ मध्ये मोठ्या खटपटीने नायिकेची भूमिका मिळवली.

नायक होता धर्मेंद्र !
तो त्या वेळेस त्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावर होता. तो हा चित्रपट नाकारू शकला असता; किंवा तो कुमकुमची नायिका म्हणून हकालपट्टी करू शकला असता. पण त्याने तसे तर केले नाहीच; पण चित्रिकरण चालू असताना त्याने कधीही रामानंद सागरना ‘कुठली सद्दी संपलेली नायिका घेतली आहे‘ असे म्हणून कमकुमला हिणवलेही नाही !

तिच्याशी तो एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून कायम आदरानेच वागला !
धर्मेंद्रच्या अशा वागण्याने कुमकुमला दर वेळेस किती ओशाळे वाटत असेल !

गम्मत :
अभिनेत्री कुमकुम ही गायिका – नायिका निर्मला अरुण हिची सख्खी धाकटी बहिण; म्हणजेच ‘विरारचा छोकरा‘ अभिनेता गोविंदा याची सख्खी मावशी !
पण निर्मला अरुण ही हिंदू धर्मीय, तर कुमकुम ही मुस्लीम धर्मीय !
धर्मेंद्र आपल्या लहान बालकाला घेऊन मुंबईत आला होता, असा वर उल्लेख आला आहे.
तो लहान बालक म्हणजेच सनी देवल !
गायक : मुकेश
गीतकार : शमीम जयपुरी
सं. दि. : कल्याणजी – आनंदजी
राग : ‘भैरवी‘
चित्रपट : ‘दिल भी तेरा हम भी तेरे‘, 1960.

प्रकाश चांदे.

— लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments