सुप्रसिद्ध हास्यकवी, ‘मिर्झा एक्सप्रेस ‘फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज, शुक्रवार, दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर आज दुपारी दोन अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ मिर्झा बेग आणि माझे अतिशय मित्रत्वाचे संबध होते. त्यांच्याशी फोनवर मनसोक्त बोलणे हा एक निखळ आनंद असे. काही काळापूर्वी मी लिहिलेली त्यांची जीवन कथा त्यांना फार आवडली होती. न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे ते केवळ लेखक, वाचकच नव्हते तर चाहते, मार्गदर्शक ही होते .
जीवन कथा : – शुद्ध वऱ्हाडी बोलीत लोकप्रिय विनोदी कविता सांगता सांगता अंतर्मुख करणारे कवी डॉ मिर्झा रफी अहमद बेग आपली परखड मते मांडायला अजिबात कचरत नसत. मनोरंजनातून केवळ लोकानुनय नाही तर लोक प्रबोधन व्हावे, असा त्यांचा सतत प्रयत्न असे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल बोलताना डॉ मिर्झा रफी अहमद बेग अतिशय परखडपणे म्हणाले होते, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा कितीही आनंद वाटत असला तरी मराठीचे वास्तवातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थान काय आहे ? याचा शोध घ्यायला हवा.एकीकडे मराठी भाषेची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संमेलने भरत असताना, प्रत्यक्षात मराठी भूमीत मराठी लुप्त होण्याच्या मार्गावर असून तिची गांभीर्याने प्रतिष्ठापना करतांना कुणी दिसत नाही. गावांची, दुकानांची, उत्पादनांची, पदव्या यांची नावे इंग्रजीत लिहावी, वाचावी लागतात. मराठी शाळा बंद पडत असून इंग्रजी शाळा वेगाने वाढत आहेत. कार्यक्रम, लग्नादी पत्रिकांचे इंग्रजीकरण होत असून आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. “इंग्रजी बोलणारा स्मार्ट, मराठी बोलणारा गावंढळ” असा आपण समज करुन घेतला असावा. साहित्य संमेलने या सारखे प्रकार एखाद्या परंपरेसारखे घेतल्या जातात व विसरल्या जातात. त्यांच्या होण्याने भाषिक बदल घडत नाहीत. मराठी चित्रपट बघणाऱ्यांची किंवा मराठी वृत्तपत्रे, पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. दर्जेदार मराठी मासिके, साप्ताहिके तर बंदच पडली आहेत. एकूण काय तर मराठी भाषा दुष्टचक्रात सापडली असून कुठला तरी जालीम उपाय शोधावा लागेल. मराठी माणसाने मराठी भाषाच वापरायला हवी. शासकीय कार्यात, कार्यालयात, दैनंदिन जीवनात मराठीचाच वापर व्हावा, मराठी बोलणाऱ्यांचा गौरव करण्यात यावा, शाळा, महाविद्यालयात, माध्यम मराठी असावे परंतु हा वरवरचा उपाय वाटतो. कुठलाही बदल आतून मनापासून घडावा लागतो. जोपर्यंत मानसिकता मराठी होणार नाही तोपर्यंत मराठीची हिरवळ उगवणार नाही इतर भाषेचे गाजर गवत तिला जगू देणार नाही, यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.” त्यांनी व्यक्त केलेली मते केवळ पुस्तकी नव्हती तर त्याला ते गावोगावी जाऊन सादर करीत असलेल्या त्यांच्या “मिर्झा एक्सप्रेस” या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलेल्या अनुभवांची जोड होती.
“काल माह्या सपनात
माय मराठी आली
दाखवली तिनं मले
झोई तिची खाली
मी हाव म्हणे मिर्झा
करोडोची आई
भीक मांगाची आली
आज मायावर पाई
पोळ्याच्या बैलावानी
मी पहिले सजत होती
साहित्याच्या तोरणात
वाजत गाजत धजत होती
आज मातर मले
फेकून दिलं तयात
इंग्रजी जाऊन बसली
ज्याच्या त्याच्या गयात !!”
तुफान लोकप्रिय असलेल्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ या एकपात्री कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमात जेव्हा ते मायबोली मराठीवर निरतिशय प्रेमाने पण तितक्याच शैलीदार उपरोधाने कविता सादर करत, तेव्हा सर्व श्रोते, प्रेक्षक अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त होत.
एकीकडे आपण मराठीचे गुणगान करतो, राज्य पातळीवरच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी साहित्य संमेलने भरवतो आणि प्रत्यक्षात, व्यवहारात मात्र मराठी भाषेचा अभिमान न बाळगता इंग्रजीत बोलतो, लिहितो, इंग्रजीचाच अभिमान बाळगतो या विरोधाभासाला काय म्हणावे ? असा त्यांना प्रश्न पडे.
खुद्द मुंबईतच दोन व्यक्ती तासभर बोलल्यावर शेवटी एकमेकांची नावे विचारायची वेळ आली की, कळते, अरे हा ही मराठी माणूस आहे ! कित्येकदा तर समोर चा माणूस मराठी नसला तरी तो मराठी उत्कृष्ट लिहिणारा, बोलणारा असतो तरी पण आपणच हिंदी, इंग्रजीत बोलतो म्हणून ती व्यक्तीही त्याच भाषेत बोलू लागते, याला काय म्हणावे ? म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मी लेख लिहिला होता, “मराठी अभिजात झाली. पुढे काय ?” त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात जो पर्यंत आपण मराठी भाषेचा सातत्याने आग्रह धरीत नाही, तो पर्यंत केवळ कागदोपत्री दर्जा मिळाल्याने, दोन तीन दिवसांची मोठमोठी संमेलने भरविल्याने ती तात्कालिक प्रभावी वाटत असली तरी, जल्लोषाचे ते दोंन चार दिवस सरले की परत “ये रे माझ्या मागल्या सुरू” होते आणि म्हणूनच माय बोली मराठीची अहोरात्र पूजा करणारे, मायबोली मराठीवर मनापासून प्रेम करणारे, कधी हसवत तर कधी अंतर्मुख करत आपला “मिर्झा एक्स्प्रेस” कार्यक्रम करणारे डॉ मिर्झा रफी बेग मला थोर आणि वंदनीय व्यक्ती वाटत.
तसे तर डॉ मिर्झा रफी बेग यांचे काही कार्यक्रम मी टिव्ही वर बघितले होते. मग कधी खूपच कंटाळा वाटू लागला की त्यांचे कार्यक्रम यू ट्यूब वर बघायचो. पण सात एक वर्षांपूर्वी छ्त्रपती संभाजीनगर येथे कासार साथी प्रतिष्ठान ने आयोजित केलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला समक्ष उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून त्यांनी माझ्या मनात कायमचे घर केले. त्यांना दुसऱ्यांदा समक्ष ऐकण्याची संधी नवी मुंबई पत्रकार संघाने गेल्या वर्षी आयोजित केलेल्या काव्य विषयक कार्यक्रमामुळे मिळाली. दरम्यान ते इतके लोकप्रिय झालेले होते की, नवी मुंबईतील कार्यक्रम संपण्याची वाट न बघता त्यांच्या कविता सादर करून त्यांनी हसे, टाळ्या मिळवल्या आणि प्रेक्षकांची, आयोजकांची माफी मागून ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी लगेच निघून गेले. अशा या मराठी प्रेमी, निसर्ग कवी, सरधर्म प्रेमी, माणुसकीवर निरतिशय विश्वास असलेल्या त्याच बरोबर इतकी अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवून ही आपले पाय जमिनीवर ठेवलेला हा खूप महान मानव होता.
डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचा जन्म १७ जुलै १९५७ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा येथे झाला. या गावातच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे शिक्षण एसएससी, डी एच एम एस इतके झाले होते. जन्मापासूनच वऱ्हाडी बोली कानावर पडत राहिल्याने ते साहजिकच या बोलीत नुसतेच पारंगत झाले नाही तर या बोलीचा अभिमान बाळगून लहानाचे मोठे झाले. शेतकरी आत्महत्या, इंग्रजीमुळे मराठीची झालेली दुरावस्था, माणसातील हरवत चाललेले माणूसपण यावर ते विनोदाच्या माध्यमातून मार्मिकपणे बोट ठेवत असत.
वाढते प्रदूषण, फळे, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादन वाढण्यासाठी खतांचा, औषधांचा जो बेसुमार वापर वाढला आहे, त्यावर उपरोधिकपणे मिर्झा बेग कसे लिहित आणि बोलत, हे जेव्हा ते दोन वाघांचा संवाद सादर करीत त्यावेळी अतिशय चपखलपणे आपल्याला कळत असे.
“आजकाल माणसायले
राहिली नाही चव
रसायनच खाऊ खाऊ
झाले बेचव
सल्फेट खाते,
केमिकल खाते,
रक्ताले त्याच्या
कसा घुर्रट वास येते
परवा एका वाघानं
माणूस फस्त केला
तंगड्या घासु घासु
लेकाचा कुत्र्यासारखा मेला
अशा जहरी माणसाची
शिकार कोण करते
वाघ असलो तरी
गवत खाले पुरते !!”
आपल्या आयुष्याची जडणघडण सांगताना बेग सरांनी यवतमाळच्या ओम सोसायटीत शारदा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनात सहभागी झाल्याबद्दल तेथील पदाधिकारी महिलेने ५१ रुपये मानधन आणि प्रवास खर्च देऊन बोलाविले होते, याची आवर्जून आठवण सांगितली होती.त्यापूर्वी त्यांना कोणत्याही कवी संमेलनासाठी कधीच असे मानधन मिळाले नव्हते. ते कवी संमेलन त्यांच्या भावी जीवनासाठी पायाचा दगड ठरले. कार्यक्रमाचे पैसे मिळू शकतात हे या कार्यक्रमाने त्यांना कळाले आणि त्यांची मिर्झा एक्सप्रेस सुसाट सुटली. त्यामुळे यवतमाळकर आणि यवतमाळच्या त्या महिलेचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे ते नम्रपणे म्हणत.
जगात धर्मावरून जितकी युद्धे झाली आणि होत आहेत, त्यामुळे माणूस कसा अडचणीत येतो हे सांगण्यासाठी ते कवी निरज यांची पुढील कविता सादर करीत असत.
“जितना कम सामान रहेगा
सफर उतना आसान होगा
जितनी भारी गठडी होगी
उतना तू हैरान रहेगा
हात मिले और दिल ना मिले
ऐसे में नुकसान रहेगा
जब तक मंदिर, मस्जीद है
मुश्किल में इन्सान रहेगा !!”
डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांचे प्रमाण मराठी भाषेवर जसे प्रभुत्व तसेच त्यांचे व-हाडी बोलीवर विशेष प्रेम आहे. “साधी राहणी, उच्च विचारसरणी”चे ते पाईक होते. कवितेचे त्यांचे सादरीकरण हे इतके सहज सुंदर, नैसर्गिक आणि विनोदी असे की सभागृह सतत हास्याच्या हिंदोळ्यावर राहत असे. त्यांचे ३ हजार च्या वर कार्यक्रम झाले होते. तर त्यांना ७० हजारच्या वर चाहत्यांची पत्रे आली होती, यावरूनच त्यांची तुफान लोकप्रियता कळते.
डॉ. मिर्झा बेग हे झी टी.व्ही. च्या मराठी हास्यसम्राट कार्यक्रमात उपविजेते ठरले होते. राजधानी दिल्ली, ई टी.व्ही. मराठी आणि अन्य काही वाहिन्यांवर सुध्दा त्यांचे कार्यक्रम झाले होते. यू ट्यूब वर त्यांचे शेकडो कार्यक्रम उपलब्ध आहेत.

स्वतंत्र एकपात्री प्रयोग करीत असतानाच नागपूरच्या दैनिक लोकमतने “मिर्झाजी कहीन” हा त्यांचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू केला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने वाचकांची पत्र यायची. त्या सर्व पत्रांना ते मार्मिक उत्तरे देत त्यामुळे ते सदर खूपच लोकप्रिय ठरले होते. दैनिक देशोन्नती मधीलही त्यांचे सदर अफाट लोकप्रिय ठरले होते.
मिर्झा बेग यांची घुयमाती, उठ आता गणपत; जांगळबुत्ता; मिर्झायन; धोतर गुलल बोरीले (६००० ओळींचे खंड काव्य); घरावर गोटे; अशी एकूण १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
पहिले बहुजन साहित्य संमेलन, नेरपरसोपंत १९९६, दहावे वर्हाडी साहित्य संमेलन, धनज माणिकवाडा १९८६, दुसरे विदर्भ मुस्लिम बहुजन साहित्य संमेलन, वणी १९९७, दलित बहुजन साहित्य संमेलन, पांढरकवडा २००४, पाथर्डी साहित्य संमेलन २०१३ अशा विविध साहित्य संमेलनात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.
आकाशवाणी नागपूर च्या कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य, मराठी रंगभूमी नाठ्य परिनिक्षण मंडळाचे सदस्य राहिलेल्या मिर्झा बेग यांचा, याशिवाय अनेक साहित्यिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असे.
स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ मिर्झा बेग यांना डॉ. गिरीश गांधी ट्रस्ट, नागपुर यांचा उत्कृष्ट काव्य पुरस्कार २०१९, अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटचा इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर पुरस्कार, मा.बा. गांधी ट्रस्ट, नागपुर यांचा १९९९ चा उत्कृष्ट ग्रामिण साहित्य निर्मिती पुरस्कार असे असंख्य पुरस्कार मिळाले होते.
असा हा मानवतेचा मसिहा तुम्हा आम्हाला हसवत हसवत कायमचा सोडून गेला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
