जयंती : ११ एप्रिल १८२७.
पुण्यतिथी : २८ नोव्हेंबर १८९०.
थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचा हा जीवनपट .महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. ‘हा विचार मांडणारे ज्योतिराव एक कृतिशील तत्वचिंतक होते.
१९ व्या शतकात भारतात सामाजिक प्रबोधनाद्वारे अस्पृश्यता निर्मुलन आंदोलनाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केली. तसेच त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी संपूर्ण समाज व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे हा विचार सर्वप्रथम मांडला.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होत. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्र्चय केला. त्यासाठी त्यांनी *सत्यशोधक समाजाची* स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. जातीय व चातुवर्णीय भेदभावास त्यांनी विरोध केला.
एक प्रसंग –
ज्योतीरावांनी उत्तम इंग्रजी शिक्षण घेतले होते. ड्यूक ऑफ कॅनाॅटच्या भेटी निमित्त पुण्यामध्ये एक समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला जोतीबा कमरेला लंगोटी, खाद्यावर घोंगडे आणि डोक्याला मुंडासे अशा शेतकर्याच्या वेशात आले.व्यासपीठाजवळ ते खाली बसले. आजूबाजूला सगळी प्रतिष्ठित मंडळी बसली होती. त्यांना वाटले हा मनुष्य काय बोलणार ? फुल्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. महात्मा फुल्यांचे अस्खलित इंग्रजी ऐकून ड्यूकसाहेब आच्छर्यचकित झाले.
फुले आपल्या भाषणात म्हणाले – ‘… ड्यूकसाहेब या ठिकाणी उत्तम पोषाख करून आलेले हे लोक हिंदुस्थानचे खरे प्रतिनिधी नाहीत.या देशातील बहुसंख्य जनता शेतकरी आहे, त्यामुळे शेतकर्याच्या पोषाखात मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. हिंदुस्थानच्या या बहुसंख्य जनतेचे हित तुम्हाला करायचे असेल,cतर त्यांचे अज्ञान घालवा. त्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळण्याची व्यवस्था करा. गरिबी आणि अज्ञान या देशाला मिळालेला शाप आहे.
शिक्षण आणि फक्त शिक्षणाने तो दूर होईल. माझी आपणास नम्र विनंती, जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझा हा निरोप तुमच्या दयाशील मातेला अर्थात महाराणी व्हिक्टोरिया ऑफ इंग्लंड यांस सांगा.’

|| जीवनपट ||
— ११ एप्रिल १८२७ जन्म.
— १८३४-३८ पंतोजींच्या शाळेत शिक्षण.
— १८४० सावित्री बाईंशी विवाह.
— १८४१-१८४७ स्काॅटिश मिशन हायस्कूलमध्दे इंग्रजी शिक्षण घेतले.
— १८४७ लहुजी वस्ताद साळवे यांजकडे दांडपट्टा व शारीरिक शिक्षण.
— १८४७ थाॅमस पेन यांच्या ‘राईट आॅफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास. विचारांचा प्रभाव.
— १८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरु केली.यामुळे वडीलांशी मतभेद झाले.पत्नी सावित्रीबाईंसह गृहत्याग करावा लागला.
— ७ सप्टेंबर १८५१ भिडे वाडा व रस्तापेठेत मुलींची शाळा सुरु केली.
— १८५२ पूजा लायब्ररीची स्थापना.
— १५ मार्च १८५२ वेताळ पेठेत अस्पृशांसाठी शाळा सुरु केली.
— १८५५ रात्रशाळा काढली.
— १८६० विधवा पुनर्विवाहास पाठिंबा दिला.
— १८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
— १८६५ विधवांच्या केशवपना विरुध्द न्हाव्यांचा संप घडवून आणला.
— १८६४ गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
— १८६८ राहत्या घरातील हौद अस्पृशांसाठी खुला केला.
— १८७३ सत्यशोधक समाजीची स्थापना केली.
— १८७६-१८८२ पुणे नगरपालिकेचे सदस्य.
— १८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना देशातील पहिली कामगार संघटना काढण्यास सहाय्य केले.
— १८८२ ‘विल्यम हंटर’ शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले.त्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
— १८८३ सत्यशोधक समाजातर्फे नव्या पध्दतीने पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणले.
— १८८८ मुंबईत कोळीवाडा येथे जनतेने समाजसुधारक रावबहाद्दुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते सत्कार करुन ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.
— गुलामगिरी, शेतकर्याचा आसूड, सत्यधर्म इत्यादी पुस्तके लिहिली.
— २८ नोव्हेंबर १८९० पुणे येथे निधन.
— लेखन : श्या.गो.पाटील डोंबिवली.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
