पंडित डॉ श्री राजा काळे
कोणे एके काळी या सनातन देशात ‘सोन्याचा धूर’ निघत असे, म्हणत असत. ते एका अर्थाने खरंही असेल पण आज सांप्रत काळात मात्र नक्की आहे.. म्हणजे ‘सोन्याचा धूर’;या अर्थाने न घेता लाक्षणिक अर्थाने घेतल्सास आजही हा देश सर्वार्थाने समृद्ध आहे..भले तो खऱ्या सोन्याच्या संदर्भात नसेलही कदाचित पण.. नैसर्गिक, शैक्षणिक, साहित्यिक,सांस्कृतिक, क्रीडा, संगीत, शास्त्रीय संगीत (गायक गायिका) नाटक, सिनेमादी क्षेत्रात नक्कीच आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर अशा सोन्यासारख्या व्यक्ती नव्हे तर अनेक नव रत्ने होऊन गेले आहेत आणि आजही मोठ्या उमेदीने कार्यरत आहेत.
‘महाराष्ट्र देशा, कणखर देशा..’ असं जरी असलं तरी या राज्यातीलच नव्हे तर समस्त गाणं रसिकांचे “ कान ’’तृप्त करणाऱ्या महान व्यक्तीत बाल गंधर्व, मा.कृष्णराव, मा. दीनानाथ मंगेशकर, शोभा कर्टू, पं. वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, मा. गिंडे, कमलाकर कुलकर्णी, अमरेंद्र धनेश्वर, मंगेशकर परिवार,शौनक अभिषेकी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पं. डॉ श्रीकांत ढोकरीकर (पुणे) या शिवाय पं. डॉ राजा काळे यांचं नाव शास्त्रीय संगीत प्रेमी रसिक कानासेनांना घ्यावं लागेल.

अशा या आपल्या महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात अनेक दिग्गजांनी आपली नाममुद्रा रसिकांच्या हृदयात कोरून ठेवली आहे. विशेषतः शास्त्रीय गायन क्षेत्रात. लोकप्रिय गायक पं.डॉ.राजा काळे यांना नुकताच मध्यप्रदेश शासनाने साधना परमार्थिक संस्था समिती, खरगोन एवं रागायन, ग्वाल्हेर आयोजित ‘राष्ट्रीय राजा मानसिंह तोमर’ पुरस्कार पं.डॉ.राजा काळे आणि पं.तरुण भट्टाचार्य यांना जाहीर झाला आहे. हा सत्कार गुणगौरव समारंभ १५ ते १९ डिसेंबर,२०२५ या कालावधीत होणार आहे. गुणींजनांचा सत्कार गेली १०१ वर्षे होत असून या पुरस्काराचे स्वरूप ₹.५ लाख आहे असं मा. संस्कृती संचालक मा.श्री एन. पी.नामदेव यांनी जाहीर केले आहे.
या सत्कार सोहळा निमित्ताने पं डॉ राजा काळे यांच्या समग्र जीवनावर टाकलेला हा सांगीतिक प्रकाश झोत.
एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात ६ मार्च,१९५२ रोजी राजाभाऊ यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आल्यावर हैदराबाद निवासी मराठी परिवार स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे स्थलांतरित झाले. राजाभाऊचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले. जन्मतः राजाभाऊना गाण्याची आवड / गोडी होती. या आवडीला प्रोत्साहन दिले ते त्यांच्या प्रभाकरराव (वडिलांनी) प्रभाकरराव यांच्याकडे शास्त्रीय संगीताच्या तालिमी होत असतं. त्याचे कळत नकळत संस्कार बाल राजाभाऊवर झाले. नंतर ते सुध्दा वडिलांसोबत मैफिलीत सहभागी होत असत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी तसंच राजाभाऊचे झाले. साहजिकच लहानग्या राजाला प्रोत्साहन न मिळते तर नवलच. एकीकडे गाण्याची शिकवण अन् दुसरीकडे आपले पारंपरिक पदवीचे शिक्षण घेतले. हे सर्व संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाले.
पं.उत्तमराव अग्निहोत्री, गुरु गोविंदराव दंताळे आणि वडील प्रभाकर, जितेंद्र अभिषेकी यांच्या तालमीत राजाभाऊ आपल्या गाण्याचा रियाज करु लागले.हळूहळू मैफिलीत साथीदार म्हणून तर नंतर मग गुरु आज्ञेनुसार स्वतंत्र मैफिल राजाभाऊ गाऊ लागले. कलेच्या प्रांतातील कलाकारांना मुंबई खुणावत असते.अशा अनेक कलाकाराप्रमाणे राजाभाऊ मुंबईत दाखल झाले. तेही गोरेगाव येथे. येथे आल्यावर त्यांच्या शास्त्रीय संगीताला खूप मोठा आधार तर मिळाला शिवाय एकूणच मुंबईच वातावरण काही औरच आहे. येथे प्रामाणिक प्रयत्नाला यशाची गुरुकिल्ली सापडते.
गोरेगाव येथे लेखक चित्रे, सदानंद नाईक, दया पवार, पं सुरेश तळवलकर, सुदेश भोसले, सुहास कब्रे आणि पं.डॉ.राजा काळे आदी मान्यवर राहतात.साहजिकच मला राजाभाऊचा सहवास लाभला. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे पं डॉ राजाभाऊंची कृतज्ञता, अन् नम्र वृती. ज्ञान दान करण्याची वृत्ती यामुळे ते एक गायक म्हणून सुप्रसिद्ध आहेत तरी ते एक माणूस म्हणून जास्त ओळखले जात आहेत त्याच कारण म्हणजे त्यांचा मनमोकळा स्वभाव, दिलदार वृत्ती हे होय.
राजाभाऊ आग्रा, ग्वाल्हेर जयपूर घरांण्याचे आहेत. ते नेहेमीच पं.अरुण कशाळकर, उत्साद असद अली खान, मास्टर कृष्णराव, गजानन जोशी, पं.के.जी. गिंडे, उस्ताद फैय्याज खान, पं दिनकर कैकणी, अमरेंद्र धनेश्वर, जयमाला शिलेदार,पं.सी.आर व्यास, अजित कडकडे, भास्करराव बखले, मोगुबाई कुर्डूकर, वामनराव सडोलीकर, श्रृती सडोलीकर, देवधर, वि. द. पलुस्कर आदी दिग्गज कलाकारांचा सहवास, मार्गदर्शनात्मक प्रोत्साहन यांचा कृतज्ञतेने आवर्जून उल्लेख करतात. हे विशेष होय.मया ख्यातनाम गायकाचे पाय जमिनीवर आहेत हे विशेष होय. त्यांच्याशी गप्पा मारत असताना अथवा वाटेत कधी भेटले की मग गप्पांना काळ वेळ नसतो.हल्ली आमच्या भेटी गाठी जरा कमी झाल्या आहेत. आनंदाची बातमी (पुरस्कार मिळाला त्याची बातमी) समजताच मी राजाभाऊना दूरध्वनीवरून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

अशा या दिग्गज गायकाच्या मैफिली मुंबईसह संपूर्ण देश परदेशातही झाल्या आहेत. प्रबोधन गोरेगाव, मुंबई येथे सुध्दा त्यांची मैफिल झाली होती. प्रेक्षागृह तुडुंब भरले होते. आजही या वयात ( ७२/७३)ते तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने ते आपल्या या क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘स्वराभिषेक गुरुकुल’ या संस्थेच्या माध्यमातून राजाभाऊ आपल्या संगीत गाण्याची पोतडी खुलेआम करून आपल्या शिष्यांना मनापासून दिक्षा देत आहेत.
’कलेसाठी कला का जीवनासाठी कला’, का “कलेसाठी जीवन”, ’जीवन आहे म्हणून कला आहे:” याचा मी काथ्याकूट करीत न बसता आपल्याला जे जीवन अन् तेही संगीत आराधना करण्यासाठी मिळाले आहे त्याचा मनसोक्त आनंद,आस्वाद घ्यायचा. ‘संगीत साधना’ म्हणजे ‘ईश साधना’ हे मनी ठासुन भरलेले आहे. संगीत हा माझा स्वास आहे.मी नेहमी देवाचे आभार मानतो की मला आपली संगीत स्वरूपात पुजा, आराधना करता आली हे माझं भाग्य थोर. या संगीत सेवेसाठी मी अविरतपणे सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहे त्यासाठी मला नटेश्वरांनी निरोगी निरामय आयुष्य द्यावे हीच मनोमन प्रार्थना. त्यांचा हा अनमोल वारसा त्यांची लेक अमृता राजा काळे ही नेटाने पुढे नेत आहे.
|| उल्लेखनीय असे जाहीर कार्यक्रम ||
§ तानसेन समारोह-ग्वाल्हेर
§ सवाई गंधर्व पुण्यतिथी-महोत्सव – पुणे
$ पं. पुलूसकर स्मृती समारोह – नवी दिल्ली
$ गुणीदास संगीत संमेलन – मुंबई
$ गुरु-शिष्य परंपरासंबंधी गुरु पं. जितेंद्र अभिषेकी- आय.सी.सी.आर – नवी दिल्ली.
$ ‘राग माला’ आणि ‘मत्स्यगंधा ते महानंदा’संपूर्ण महाराष्ट्रात
$ ‘स्वराभिषेक’ आणि ‘ गाणे चैतन्याचे’ मैफिलीत भक्ती, नाट्य आणि भावगीत.
$ अभंग वर्षा मराठी आणि हिंदी संतवाणी.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध चॅनल वर तसेच संपुर्ण देशात अनेक कार्यक्रम.
$ परदेशात (अमेरिकेत) २००० साली २१ ठिकाणी जाहीर कार्यक्रम सादर केले.
$ पुरस्कार $
$ वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्राप्त-पुरस्कृत पं.भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सव २००७ $ जेष्ठ नागरिक फेलोशिप पुरस्कार-सांस्कृतिक खाते-भारत सरकार
$ ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार म्हणून आकाशवाणीच्या सांस्कृतिक विभाग गौरविण्यात आले.
$ गाण्याचे अल्बम प्रकाशित $
$ राग सरिता – एचएमव्ही $ सीजन्स (Seasons)- पॅन म्युझिक $ बंदिश-प्रथमेश आर्ट $ अपूर्व गीते-माला इंटरटेनमेंट $ क्लासिकल म्युझिक अल्बम-अलूरकर कॅसेट कं.$ कृष्ण निनाद म्युझिक कं. $ या शिवाय यु ट्यूबला जोडून इंटेन्स एक्स्प्रेस चॅनेल वर अनेक कार्यक्रम पाहता येतील.
मध्यप्रदेश शासन पुरस्कृत संस्कृती विभाग “राष्ट्रीय तानसेन सन्मान एवं राष्ट्रीय राजा मानसिंह तोमार” या पुरस्काराची नुकतीच झाली. हा पुरस्कार वितरण सन्मान पुरस्कार सोहळा (२०२४ व २९२५ या वर्षीचा पुरस्कार सोहळा) दि १५ डिसेंबर, २०२५ ते १९ डिसेंबर,२०२५ या कालावधीत ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप ₹५ लाख आहे असे निवेदन या शासकीय संस्थेचे सांस्कृतिक संचालक श्री एन. पी. नामदेव यांनी केले आहे. गेली १०१ वर्षे हा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हे विशेष होय.
या महत्त्वाच्या सोहळ्यात आमचे स्नेही पं डॉ राजा काळे यांची निवड झाली असून त्यांना आयोजित संस्थेचे अधिकृत पत्राद्वारे कळविले आहे.
या निमित्ताने पं.डॉ. राजा काळे यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह आपल्या संगीत सेवेसाठी निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच नटराजाकडे मनापासून प्रार्थना.

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
