“थरारक पर्यटन”
मला नेहमी असं वाटतं की एखादा प्रवासी किंवा एखादा खेळाडू यांच्या मानसिकतेत साम्य आहे. दोघेही खिलाडू वृत्तीचे असतात, परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात, कठीण परिस्थितीचं दोघांनाही भान असतं, अडचणींवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आपोआपच बळावते, माघार घेण्याची वृत्ती त्यांच्यात अभावाने जाणवते.
ग्रुप बरोबर केलेल्या अनेक टूर्समधून मी हा अनुभव घेतला आहे. सत्तरी उलटून गेलेली, ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेली माणसे अगदी हौसेने उंच चढणी चढतात, कितीतरी किलोमीटर चालण्याची त्यांची तयारी असते. नव्या प्रदेशातील अनोळखी खाद्य संस्कृतीही अगदी आनंदी वृत्तीने, खिलाडू वृत्तीने स्वीकारतात, उगीच ”खाण्याचे हाल होत आहेत” वगैरे कुरकुर करत बसत नाहीत. या संदर्भात मला एका हास्यास्पद प्रसंगाची आठवण येते.तेव्हा आम्ही इटलीत फिरत होतो. इटालियन पिझ्झा हा जगप्रसिद्ध. मूळात “पिझ्झा” हे इटालियन लोकांचेच खाणं. तेव्हा इटलीत आलोय तर इटालियन क्यूझीनची चव का घेऊ नये ? आमच्या ग्रुप कंडक्टरने आम्हाला इटालियन रेस्टॉरंट मध्ये नेलं आणि सगळ्यांसाठी “पिझ्झा” ची ऑर्डर दिली. आमच्याबरोबर एक वृद्ध गुजराती महिला होती. मुख्य म्हणजे ती एकटीच या टूर बरोबर आली होती. तिच्याबरोबर घरचे, अथवा स्नेही कुणीच नव्हते आणि तिच्याशी गप्पा करतानाच समजले की, ”ती नेहमीच एकटीच प्रवास करते.” सिंगल ट्रॅव्हलर. तिचं म्हणणं, “टूर मध्ये सोबत मिळतेच आता नाही का तू भेटलीस मला.” त्या संवादानंतर मी हळूच स्वतःलाही जरा तपासून पाहिलं, “आपल्याला जमेल का असे एकटीनेच फिरायला. मूळात आवडेल का?” उत्तर अर्थातच “कोण जाणे!” असंच आलं. तर सांगत होते सगळ्यांच्या टेबलवर छान रंगीबेरंगी टोमॅटो, बेल पेपर्स,आॉलीव्ह्ज, भरपूर चीज वगैरेंनी सजवलेले पिझ्झा आले. “वा! वा! साक्षात8 इटालियन पिझ्झा !”
त्या वृद्ध महिलेनेही तो खाण्यासाठी कापायला सुरुवात केली. तो इतका चिवट होता की तिने थोडासा सुरीवर जोर लावल्याबरोबर एखाद्या विटी सारखा टणकन् उडून दुसऱ्या टेबलवर जाऊन पडला. मला हे आठववून लिहिताना आताही खूपच हसू येत आहे.
“जो मारो पिझ्झा क्याथी गयो !”
ती मजेत बोलत होती. थोड्याफार प्रकाराने सगळ्यांच्याच बाबतीत हा चिवट पिझ्झा खायचा कसा हा प्रश्नच होता. काहीजण ग्रुप कंडक्टरकडे तक्रारही करू लागले पण ही वृद्ध गुजराती महिला मात्र अगदी शांत होती.
“एटलो सु थयो. बद्धानी सामळो. मारे पास खाकरो छेना !” आणि खरोखरच तिने तिच्या हॅन्डबॅगमधून खाकरे काढले आणि सर्वांना वाटले. इटलीत इटालियन पिझ्झा रेस्टॉरंट मध्ये आम्ही सर्वांनी ते भारतीय गुजराती कुरकुरीत खाकरे मस्त एन्जॉय केले.
प्रवासात असे अनेक अनुभव येतात. मजेचे, अडचणीचे, त्रासाचे अनेक प्रकारचे.
ओहायो स्टेटमध्ये कोलंबस या गावात राहत असताना तिथून दोनतीन तासावर असलेल्या एरी लेकवरच्या बेटावर जायचा ज्योतिका- साकेतने बेत केला. त्या दिवसाचं हवामान, वादळ वाऱ्यांविषयीचे सावध इशारे वगैरे दोघांनी काटेकोरपणे चेक केल्यानंतरच आम्ही चौघं ‘पुटीन बे’ला जायला निघालो. तिथे एक दिवस आम्ही मुक्कामही करणार होतो. तसं बुकिंगही साकेतने केलेलं होतं. समुद्रच वाटावा इतका विस्तीर्ण आणि अथांग असा तो तलाव होता. दूरवर अनेक उंच इमारती होत्या. तलावात प्रवासी, व्यापारी जहाजंही होती. प्रत्यक्ष बेटावर जाण्यासाठी आम्हाला एक क्रूज करावी लागली. गाडी किनार्यावरच्या कार पार्कमध्ये ठेवली आणि रात्री बेटावरच मुक्काम करणार असल्यामुळे लागणारे सामान तेवढं बरोबर घेतलं. बेटावर पोहोचलो. चारी बाजूला असलेलं निळंशार पाणी बघून तर आमचा जीव अपार सुखावला. बेटावर फिरण्यासाठी आम्ही एक गोल्फ कार्टही घेतली. त्या उघड्या कार्ट मधून बेटावर फिरण्याची मजा वर्णनातीत होती. आम्ही मस्त गप्पा करत, गाणी गात, आजूबाजूची झाडं, घरं पाहत होतो आणि काय आश्चर्य! निसर्ग किती लहरी असतो! मानवी अंदाजावर छुपेपणाने तो कधी हल्ला करेल हे कोणी सांगायचं ? एकाएकी जोरदार वादळ वारे सुरू झाले. आकाश काळोखलं आणि अक्षरश: चेंडू एवढ्या गारा आम्हाला झोडपू लागल्या. आमच्या अंगावर ‘हुडी’ होत्या तरीही गारांचा मारा आणि पावसामुळे निर्माण झालेली थंडी असह्यच होती. त्यातच आमची कार्टही बंद पडली. साकेतची अत्यंत लाडकी स्पोर्ट कॅप वाऱ्याबरोबर उडून गेली म्हणून तो अधिकच वैतागला होता. त्यातून आम्हा ज्येष्ठांची जबाबदारी ! प्रसंग बाका होता.

पुटीन बेवर सगळ्याच प्रवाशांची प्रचंड धावपळ चाललेली होती पण आम्हा चौघांचे हाल दारुण होते. आम्ही या वादळी पावसात भिजत रस्त्यावर होतो. तिथे जवळच एक टुमदार बंगला होता पण बंगल्याची दारं खिडक्या बंद होत्या. मनुष्य वावर तिथे जाणवतच नव्हता. क्षणभर माझ्या मनात आलं या क्षणी आपण भारतात असतो तर अशाच बंगल्याचे दार नक्की आपल्यासाठी उघडलं गेलं असतं. भिजणाऱ्या आम्हाला आत घेतलं असतं. पुसायला त्यांनी पंचे दिले असते. गरम चहाही मिळाला असता. उगीच नाही भारताला “अतिथ्यशील देश” म्हणतात. मी कोणत्या विचारात गुंग झाले हे ज्योतिकाने ओळखले असावे. ती लगेच म्हणाली, ”मम्मी त्या घराकडे अशी एकटक नजर लावून बघू नकोस. अमेरिकेत कुठल्याही कारणाने कुणालाही अरेस्ट करतात बरं का ?” मी “भारतीय” असल्याचा अभिमान मात्र मला त्या क्षणी नक्कीच जाणवला.
पण तेवढ्यात एक अमेरिकन यंग कपल आमच्या जवळ येऊन थांबलं आणि ते त्यांच्या कार्ट मधून उतरले आणि त्यांनी त्यांची कार्ट आम्हाला देऊ केली आणि “आम्ही तुमची बंद पडलेली कार्ट रेंटल शॉप मध्ये घेऊन येऊ, डोन्ट वरी फोक्स, बी रिलॅक्स्ड” असं म्हणत आम्हाला अगदी गोड हसत त्यांनी ‘बाय’ केलं. आमच्या ‘थँक्स’ ला अगदी शालीनतेने “यु आर वेलकम मेन” असंही म्हटलं. बेधुंद पावसात, गारांच्या तडाख्यात भिजण्यातला त्यांचा रोमान्स बघून कुठेतरी मनाला खरोखरच गुदगुल्या झाल्या.
एक क्षण तक्रारीचा तर दुसरा क्षण असा आपुलकीचा. त्या दुसऱ्या क्षणांनी अमेरिकन, भारतीय वगैरे लेबलं तोडून टाकली. उगीच दुभाजक असलेल्या भिंती मनातल्या मनातच कोसळल्या. शेवटी निसर्गाच्या या महान पटांगणात माणूस हा फक्त माणूसच असतो. कुठल्याही राष्ट्रीयत्त्वाचा, धर्माचा शिक्का नसलेला. हा थरारक, नाट्यमय आणि नंतरचा मनुष्यपणाचा अविस्मरणीय अनुभव प्रवासात नेहमीच घेतला.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
