आकाशवाणी, दूरदर्शन च्या वृत्त निवेदिका, सूत्र संचालक म्हणुन लोकप्रिय असलेल्या शिबानी जोशी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
मी असे समजत होतो की, मी शिबानी ला गेली तीस पस्तीस वर्षे ओळखतो म्हणुन. पण बर्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की, ज्या व्यक्तीला आपण ओळखतो, असे समजत असतो, त्यांना प्रत्यक्षात आपण किती कमी ओळखत असतो, हे अवचितपणे आपल्याला कळते आणि आपण एकदम स्तब्ध होतो !
शिबानीच्या बाबतीत मला असाच चकित करणारा अनुभव आला. हा अनुभव म्हणजे, मध्यंतरी एक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बोलत असताना तिने सहजपणे तिचे सासरे, “मी अत्रे बोलतोय” फेम सदानंद जोशी यांचा उल्लेख केला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण इतक्या वर्षात तिने कधीही ती सदानंद जोशी यांची सून असल्याची शेखी मिरवली नाही, की त्यांच्या नावाचा, वलयाचा कधीही फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. आज तिने माध्यम सृष्टीत स्व:ताची जी प्रतिमा निर्माण केली आहे, जे स्थान निर्माण केले आहे, ते निःसंशयपणे स्व:कर्तृत्वावर होय, याबद्दल तिचे करावे तितके कौतुक कमीच आहे.
शिबानीच्या कौतुकाचे दुसरे कारण म्हणजे प्रसार माध्यमातील तिची कारकीर्द ही तिने तिची बँकेची पूर्णवेळची नोकरी सांभाळून घडविली आहे. नोकरी, घरसंसार आणि वर्षातील 365 दिवस चालू असणारी प्रसार माध्यमे, असा हा अवघड त्रिवेणी संगम तिने कसा घडवून आणला असेल, तिचे तीच जाणत असेल.

मूळची पार्लेकर असणारी शिबानी लग्नाआधी आणि लग्नानंतरही जोशीच राहिली. पण लग्नाआधी ती शिबानी नाही तर रोहिणी होती. नोकरीच्या दृष्टीने तिने वाणिज्य शाखेतील पदवी जरी मिळविली तरी नंतर मात्र आपली आवड ओळखून तिने मराठी मध्ये एम ए केले. पुढे पत्रकारिता आणि नाट्यशास्त्रात तिने पदविका प्राप्त केली.
अभिनयाची आवड असल्याने शिबानी बालपणापासून नाटकांमध्ये काम करायची. तिने काही स्पर्धांमध्ये भाग देखील घेतला होता. पण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला नोकरी मिळाली आणि अनिच्छेने तिला अभिनय संन्यास घ्यावा लागला.

पुढे शिबानीने रंग मंचावर च्या अभिनयाची उणीव आकाशवाणीच्या नभोनाट्य, युववाणी, वनिता मंडळ, वृत्त निवेदन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन भरून काढली. या बरोबरच तिने काही कंपन्यांचे प्रायोजक कार्यक्रम देखील केले आणि करीत असते. तिने अनेक शैक्षणिक आणि इतर कँसेट साठी आणि शासनाच्या अनेक कार्यक्रमांसाठी निवेदने केली आहेत.

आकाशवाणीबरोबरच शिबानी गेली २५ वर्ष दूरदर्शनवर वृत्त निवेदन करीत आहे. १९९२ चे बॉम्बस्फोट, १९९३ च्या दंगली, कसाब, २६ जुलैचा पाऊस अशा प्रचंड भितीदायक परिस्थितीत तिने आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वृत्त निवेदन करण्याचं मोठं धाडस दाखविले आहे.

साहित्यात रुची असलेल्या शिबानीने बालकथा आणि कथांची काही पुस्तकं लिहिली आहेत. तसेच कै.सदानंद जोशी यांच्या पुस्तकाचे आणि भोंडल्याच्या गाण्यांचे पुस्तक संपादित केले आहे. विविध वृत्तपत्रे नियतकालिके, दिवाळी अंकासाठी तिने लेखन केले आहे आणि अजूनही करीत असते. या सोबतच तिने “भ्रमन्ती” या दिवाळी अंकाचे सहायक संपादक म्हणून २-३ वर्षे काम केले आहे.

नोकरीत असताना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त शिबानीने बॅंकेच्या नाटकांमधून देखील कामे केली आहेत. ती आता नोकरीतून निवृत्त झालीय, पण अर्थात तिच्याकडे बघून हे खरे वाटत नाही, हा भाग वेगळा ! पण ती या मोकळ्या वेळेचा सदुपयोग आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी करीत आहे. यासाठी तिने सई नावाचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातुन ती भोंडला, हादगा हे आपले पारंपरिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करीत आहे. राजधानी दिल्लीसह सई ग्रुपने मॉरिशस मध्ये देखील भोंडल्याचा कार्यक्रम सादर केला आहे. या बरोबरच ती सेन्सॉर बोर्डावर पण आहे.
शिबानीस पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
