जंगल मंगल विद्यापीठात अचानक वातावरण तापलं. बिबटे, सिंह, भटके कुत्रे, म्हशी अशा प्राण्यांबरोबर कबुतरे देखील दाटीवाटीने जमा व्हायला लागली. या अनपेक्षित मोर्चाची कुणकुण लागतच कुलसचिव गायीने कुलगुरू कार्यालयाकडे अधिष्ठाता म्हशीसह धाव घेतली.
“काय विशेष अचानक तातडीचे ? काही खास घडलंय का ?” कुलगुरू वाघांनी विचारलं. तो पर्यंत प्र कुलगुरू सिंहीण बाई देखील तिथं पोहोचल्या होत्या.
“अचानक मोर्चा आलाय. त्यांना आपल्याला निवेदन द्यायचे आहे. चर्चा करायची आहे.”गायीने मान डूलवत कल्पना दिली.
“प्रत्येक ग्रुप मधले दोन चार निवडक प्राणी च पाठवा आत. उगाच गर्दी, गोंधळ नको.” कुलगुरू वाघांनी सूचना केली. बाहेर मोर्चाला तशी कल्पना होतीच. त्यामुळे निवडक प्राणी, पक्षी आत आले.
“हमारी माँगे पुरी करो. धरती माता सर्वांची. नाही माणसाच्या बापाची ! गाव शहरातील माणसाचा धिक्कार असो..” अशा घोषणा देत निवडक प्राणी पक्षी वाघाच्या गुहेत, अंतस्थ कार्यालयात आले.
कुलगुरूंनी त्यांना हलकेच गुर्रावून शांत केलं.
“बोला काय समस्या आहे ?” प्र कुलगुरू सिंहीण मॅडम नी विचारलं.
बिबट्याचा नेता पुढे झाला. तावातावाने गुर्रावून बोलता झाला.
“आमच्यावर अन्याय होतो आहे. जंगलात शिकार मिळत नाही आजकाल. त्यामुळे काही बिबटे गावात, शहरात जातात. मुलावर, माणसावर हल्ले करतात. त्या विरोधात आता गावची, शहरातली माणसे एकत्र आली आहेत. त्यांनी सरकारकडे आमच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. मोठी मोहीम उघडली आहे सर. या माणसांनी आमची जंगलं तोडली. आमचं पाणी चोरलं. आम्ही कुठे जायचं शिकारीला ? आम्ही कसं पोट भरायचं ? आम्हालाही हक्क आहे जगायचा.. जंगलात आमची सोय झाली तर आम्ही कशाला जाऊ यांच्या काँक्रिट च्या जंगलात ?”
बिबट्या ची तक्रार संपताच एक कबूतर पंख फडफडवित पुढे आलं.

“सर या शहरात काही दयाळू माणसे आम्हाला दाना घालीत. तिथे आम्ही मिळून ग्रुप ने जात होतो. एकाला दुसऱ्याची सोबत होते, ज्याला ठिकाण माहिती नाही त्यांना मदत होते.आता आमच्या वर होणारी दया माया न सोसणारी माणसे एकत्र आली. त्यांना आमचा अचानक त्रास व्हायला लागला. आम्ही घाण करतो, आमच्या विष्ठेचा यांना म्हणे त्रास होतो. म्हणून आमचा दानापाणी बंद करायला मोर्चाने आलीत ही बाया माणसे ? मला सांगा सर, हीच बाया माणसे रस्त्यात घाण करतात. कचरा फेकतात. रस्त्या शेजारी पुरुष सर्रास लघवी करतात. रस्त्यावर पण तंबाखू खाऊन थुंकतात ! यांचे पाळीव कुत्रे रस्त्यावर हागलेले यांना चालतात. यांनी आमची झाडे तोडली.. आता हे कुंभ मेळ्यासाठी तपोवन नष्ट करायला निघालेत. म्हणजे जिथे आम्हा प्राण्या पक्षासाठी थोडा निवारा होता, खाण्या पिण्याचा आसरा होता त्यावर सर्रास कुऱ्हाड चालवायला लागले ! मग आम्ही प्राण्यांनी, पक्षांनी कुठे जायचं तुम्हीच सांगा सर ? सगळ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. अवैध वाळू उपसा करून यांनी नद्यांचे सौंदर्य नष्ट केले.
अमाप लाकूड हवे म्हणून छान छान जंगलं तोडलीत.आमच्यावर यांनी अतिक्रमण केलं. हा या मानव जातीचा इतिहास आहे. स्वार्थासाठी ही माणसे, मानव जात कुठल्याही स्तराला जाऊ शकते. यांनी दोन महायुद्धे केलीत. आता तिसऱ्या महायुद्धाची तयारी सुरु आहे. नव्हे ते सुरू झाले आहे. ही माणसे माणसांचाच जीव घेऊन स्वस्थ बसणारी नाहीत. ती आता आपल्या जीवावर उठली आहेत. बिबटे, हत्ती, भटकी कुत्री, वानर, कबूतर, साप अशा प्राण्याच्या जीवावर उठली आहेत. ते कोंबड्या, बकऱ्या फस्ट करताहेत. नद्या समुद्रातील मासे खाऊन ढेकर देताहेत.. त्यांच्यातील पाशवी वृत्ती बळावत चालली आहे. या माणसांनी आतापर्यंत ही प्रगतीची मजल मारली, झेप घेतली ती एकमेकाशी सहकार्य करून,एकमेकांच्या हातात हात घालून. तुम्ही बघा, ही रेल्वे, विमाने, रुंद रस्ते, या इंडस्ट्री, उद्योग, हे संगणक, ही माहिती जाळा ची क्रांती.. सगळी प्रगती यांनी एकमेकांना मदत करूनच केली आहे. पण आता यांच्या बुद्धीला काय झाले कळत नाही. तिथे कुठला किडा वळवळतो कळत नाही. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने यांचीच बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांची भाषा, त्यांचा जाती धर्माचा द्वेष, त्यांची वृत्ती, आचार विचार सगळेच आरपार बदलले आहे गेल्या काही दशकात.”
हे ऐकून सगळेच सुन्न झाले. वाघ डोके खाजवायला लागले, सिंहीण आपली आयाळ कुरवाळू लागली. गाय होकारार्थ मान डोलवू लागली. ताडपत्रावरील लेखी निवेदन एका वानराने कुलगुरू वाघाच्या हातात दिले.
“समस्या खरेच गंभीर आहे. आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत. कारण ही समस्या कुण्या एकट्या प्राण्याची नाही. विशिष्ट पक्षाची नाही. ती आपल्या सर्वांची समस्या आहे. जंगल मंगल विद्यापीठाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण एकत्र मिळून काम केले पाहिजे. आपली महायुती झाली पाहिजे. पण ती यांच्या राजकीय पक्षासारखी नको. हे फक्त स्वार्थासाठी एकत्र येतात. काम झाले की हात झटकून दूर होतात. आपण यांच्यापासून सावध व्हायला पाहिजे. मुख्य म्हणजे यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. त्यासाठी प्र कुलगुरू सिंहीण मॅडम यांच्या अध्यक्षते खाली एक हाय पॉवर समिती स्थापन करण्यात येत आहे ताबडतोब. त्यात तुमच्या पैकी प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी असतील. या समितीने महिनाभरात तातडीने अभ्यास करून अहवाल सादर करावा. हवे तर शहरातील सरकारशी चर्चा करा. त्यासाठी त्यांना जंगलात बोलवा. एक गोलमेज परिषद आयोजित करा. हे जंगल, हा निसर्ग आपणा सर्वांचा आहे. देवाने येथील प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक प्रत्येकांसाठी बनवली आहे. जगण्यासाठी आवश्यक ते माणसाला, प्राण्यांना पक्ष्यांना भरपूर प्रमाणात आहे. पण गरजेपेक्षा जास्त हाव धरली की सगळी गडबड होते. need and greed यातला मूलभूत फरक समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही कुणी काळजी करू नका.आपल्याकडे महाशक्ती आहे. पण संहारा साठी त्याचा उपयोग करायचा नाही.मग माणसात अन् आपल्यात काही फरक राहणार नाही. त्यांना असेल विशिष्ट बुद्धी. पण आपण ही काही कमी नाही,आमच्याही अस्तित्वाला तेवढेच महत्व आहे हे त्या दोन पायांच्या जनावरांना आपण आता धडा शिकवण्याची वेळ आलीय. नाहीतर आपली बुद्धिमत्ता, त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता या जोरावर ते आपला समूळ नाश करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचा दिमाग वेळेवरच ठिकाणावर आणला पाहिजे.ते आता आपल्या विद्यापीठाचे नवे मिशन असले पाहिजे. धन्यवाद तुम्हा सर्वांचे”
सभा संपली. मोर्चाचे समाधान झाले. लढाई जिंकल्याच्या आविर्भावात सगळे मोर्चातले प्राणी पक्षी गडगडाट, किलबिलाट करीत पांगायला लागले. त्याच वेळी वेगवेगळ्या झाडावर लावलेल्या सी सी टी वी कॅमेऱ्यांनी ब्रेकिंग न्यूज प्रसारित करायला सुरुवात केली.. “जंगल मंगल विद्यापीठातील लाखोच्या मोर्चाने सरकारचे धाबे दणाणले..!!

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
