साधारण १९७२-१९७४ चा काळ होता. ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाईंडर’ नाटक आलं व नाट्यसृष्टीत एकच हलकल्लोळ माजला.

कारण बऱ्याच जणांना नाटक ‘अश्लील’ वाटलं. ह्यात पुढे होत्या प्राध्यापिका पुष्पा भावे. ह्या नाटकामुळे पुढे बरीच कोर्टबाजी झाली.

ह्या कोर्टबाजीत माझे ज्येष्ठ बंधू, ॲडव्हॉकेट मार्तंड आत्माराम शृंगारपुरे जे सीव्हील (original) साइडला गव्हरर्मेंट ऑफ महाराष्ट्र व गव्हरर्मेंट ऑफ इंडियाचे काऊंसेल (री) होते. त्यांच्या बरोबर प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्हॉकेट श्री अनिल देसाई ही होते. त्यांनी ही केस लढवली.

ह्या नाटका निमित्त, ‘सखाराम बाईंडर’ मध्ये काम करणारे श्री कमलाकर सारंग व त्यांच्या पत्नी श्रीमती लालन सारंग व आणखी एक गृहस्थ मला आता त्यांचं नाव आठवत नाही ,सल्ला मसलत करण्यासाठी आमच्या घरी यायचे व रात्रीच्या १|| -२ वाजेपर्यंत त्यांची बोलणी चालत रहायची. अखेर एक दिवस मला त्यांना सांगायला लागल की, आता कुठेतरी दुसरी कडे जागा बघा. कारण माझी पत्नी राजा शिवाजी विद्यालयात (हिंदू कॉलनी) शिक्षिका होती व मुलांनाही शाळेत जायच असायच व मला ऑफिस मध्ये जायच असायच. त्यामुळे तिला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून, मुलांचे डबे, माझा डब्बा, घरची इतर कामं करून शाळा गाठायची असायची. त्यामुळे पुढे त्यांनी दादरच्या ‘दादोबा ठाकूर हाॅल’ मध्ये भाड्याने जागा घेऊन तिथेच ते एका बाजूला नाटकाच्या तालमी करत तर दुसरीकडे भावाबरोबर बसून नोट्स काढत असत.
श्रीमती लालन सारंग ह्या नुसत्याच कलाकार नव्हत्या तर त्या एक शाॅर्टहण्ड निपुण होत्या. त्यामुळे त्या भराभर नोट्स उतरवून वेळ मिळेल तेव्हा टायपिंग करत, तर त्यांच्या नाटकाच्या भागातील त्या ‘रीहर्सलही‘ करत ही केस अश्लीलता व ‘Freedom of expression’ वर लढली गेली व अखेरीस भावाने ती केस जिंकली.
ही केस नुसती भारतातच गाजली नाही तर जग भरातल्या अनेक देशांत गाजली व त्या नाटकाचे प्रयोग अन्य देशांतहि त्यांच्या त्यांच्या भाषेत झाले. त्यासाठी नाटक कर्त्यांनी भावाचा घरी येऊन सत्कार करून त्याला ‘नटराज’ सप्रेम भेट म्हणून दिला. जो आजही माझ्याकडे आहे.

आता परत ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक नवीन संचात आलं आहे. त्याची जाहिरात वाचली आणि बाईंडर चे ‘ते’ दिवस आठवले !

— लेखन : सुभाष शृंगारपुरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
