“तो” नसता तर !
“युद्धस्य कथा रम्या!” असे म्हणताना मला खूप वेळा वाटते की प्रवासातही जेव्हा काही थरारक अनुभव येतात, ते आठवून मात्र पुन्हा पुन्हा गंमत आणि नवल वाटतच रहाते. तो प्रसंग, त्या भोवतालचं वातावरण, कारण, त्या वेळची गोंधळलेली मनस्थिती आठवली की वाटतं सारंच किती विचित्र आणि अनपेक्षित होतं! त्या दिवशी खरं म्हणजे काहीही होऊ शकत होतं पण दैवदयेने तसं झालं नाही म्हणूनच आज आपण इतक्या वर्षानंतर हे लिहू शकतो याची जाणीव झाल्यावर तर अधिकच मजा वाटते.
त्यावेळी मी आठवी नववीतच असेन. त्यावर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत भाईंनी (माझे आजोबा, आईचे वडील) काश्मीर सफरीचा दणदणीत बेत आखला. भाई, भाईंची बहीण, (जिला आम्ही आत्या म्हणत असू), आमचा परिवार आणि मावशीचा परिवार मिळून एकूण १४ जणांच्या ग्रुपची कस्टमाईज्ड टूर एका ट्रॅव्हल एजन्सी कडून भाईंनी नियोजित केली. जवळजवळ एक महिन्याची अत्यंत आरामदायी आणि मनोवेधक अशी ती दूर होती.
“भारताचं नंदनवन” डोळे भरून पाहणार, तिथल्या सुंदर नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेणार, तिथली उंच दाट झाडी, नाना प्रकारची, विविध रंगांची टवटवीत फुले, तिथली गोरी गुलाबी हसरी माणसं, नद्या, तलाव, हिमालयाची शिखरे, थंडी जे सगळं फक्त भूगोलात वाचलेलं होतं ते “याची डोळा याची देही” भोगणार हा विचारच किती उत्तेजक होता !
साठच्या दशकातलं ते काश्मीर अत्यंत सुंदर होतं. निसर्गाच्या कुशीत, हिमालयाच्या शिखरांनी वेढलेलं, उंचावर वसलेल्या महादेवाच्या मंदिरात होणाऱ्या घंटानादानं पवित्र भासणारं काश्मीर खरोखरच स्वस्थ आणि मंगलमय होतं. झुळझुळणाऱ्या नद्या मानवी जीवनातलं पावित्र्य किनाऱ्यावर ठेवून वाहत होत्या. तेव्हा त्या शुभ्र फेसाळलेल्या होत्या. रक्तरंजित नव्हत्या. त्यावेळेचं काश्मीर आनंदी, मुक्त आणि तिथल्याच गेंदेदार गुलाबांच्या फुलासारखं सतत चैतन्यमयी, हसरं होतं. कसलीही दहशत नव्हती, तणाव नव्हता , भयमुक्त होतं, धर्मभेद आणि हिंसक राजकारणापासून, सत्ता कारणापासून दूर होतं.
तिथल्या एक महिन्याच्या वास्तव्यात आम्ही तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासह, तिथल्या भौगोलिक, सामाजिक कला संस्कृतीचाही आनंद भरपूर लुटला.तिथली मुघल उद्याने, तिथली खाद्य संस्कृती मनापासून पाहिली, आस्वादली, अनुभवली पण तरीही हे सगळं आठवत असताना त्या एका प्रसंगाचे मात्र विस्मरण कधीच होऊ शकत नाही.प्रत्येक वेळी तो प्रसंग आठवताना वेगवेगळा थरारआणि विचार घेऊनच येतो.
साठच्या दशकात काश्मीरमध्ये प्रवाशांसाठी तांत्रिक सुधारणा फारशा झालेल्या नव्हत्या. बर्फाच्छादित डोंगराडोंगरात वसलेल्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यावरूनच जावे लागायचे. डोंगरातले कच्चे, दगड मातीचे अरुंद रस्ते, एका बाजूला उंच गिरीमाथे आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मधल्या अरुंद भागातून घोड्यावर बसून रिकीबीत पाय घट्ट अडकवून आणि खोगीर दोन्ही हातानी पक्कं पकडून त्या मूक प्राण्यावर आपल्या जीवनाचा भार आणि विश्वास टाकून त्या अनोळखी वाटेवर जीव मुठीत घेऊन केलेला प्रवास तसा सोपा नव्हताच पण सुरुवातीला वेगळेपणात उत्तेजकता असतेच. साहस, थ्रील याचाही आनंद वेगळाच असतो. एकदा तुमची मानसिकता पक्की झाली की मनातली भीती आपोआपच दडपली जाते. शिवाय त्या त्या घोड्याचा मालक आपल्याबरोबर येणारच असतो हाही एक मोठा दिलासा त्यावेळी होताच.
श्रीनगर पासून काही अंतरावर असलेल्या एका गावी बसने आल्यानंतर गुलमर्ग पर्यंतचा आमचा घोड्यावरचा प्रवास अत्यंत मजेत, हसत खेळत आणि निर्भयतेने सुरूही झाला. त्यावेळी आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून आम्ही राहत असलेल्या नगीन लेक मधल्या हाऊस बोटीच्या मालकाचा मुलगा गुलाममहम्मद बरोबर होता. २५/२६वर्षांचा असेल तो. खूप आनंदी वृत्तीचा,, बोलका, मनमोकळा आणि प्रवाशांचं मन रिझवणारा, काहीसा मिस्कील पण काळजी घेणारा असाच तो होता.
घोड्यावरची सफर सुरू झाल्यानंतर आमच्या समूहाची काही वेळानंतर बरीच पांगापांग झाली. काही भराभर पुढे गेले. सोबत असलेले घोडेवाले सोबत सोडून गेले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ”वो (अश्व) जानता है कहाँ जानेका, कोई तकलीफ नही, डरने का नही.” अशी त्यांची एक गाईड लाईन होती.
माझा घोडेवाला मात्र माझ्याबरोबरच होता पण माझा घोडा फारच हट्टी, आळशी आणि काहीसा मनमानी असावा किंवा त्या दिवशी त्याचं काहीतरी चांगलंच बिनसलं असावं. तो चालतही नव्हता, पळतही नव्हता त्यामुळे मी सर्वांपासून खूपच मागे पडले होते. आमच्या परिवारातले जवळ जवळ सगळेच पोहोचत आले असतील मी मात्र अशीच अर्ध्या रस्त्यावर रेंगाळत होते. मी, घोडा आणि माझा घोडेवाला. माझा घोडेवाला घोड्याची खूप मनधरणी करत होता. शेवटी ‘बाबापुता’ करता करता त्याचाही पेशन्स, धीर, मनावरचा संयम सुटला आणि हातातल्या काठीने त्याने त्या घोड्याच्या पार्श्वभागावर जोरात मारले आणि काय सांगू तो घोडा असा काही उधळला आणि सैरावैरा कसाही धावू लागला की माझी तर ‘पाचावर धारण’ बसली. मी ओरडू लागले, किंचाळू लागले. डावीकडची खोल दरी, उधळलेला घोडा, आणि संपूर्ण ताबा हरवलेली,अननुभवी मी फक्त माझा मृत्यू बघत असताना रिकीबीमधून माझे पाय सटकले आणि आणि मी धाडकन घोड्यावरून कोसळले.काहीच कळले नाही. शुद्ध हरपली असावी माझी. काही क्षण, मिनिटे, तासही गेले असतील कदाचित. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा फक्त एकच सुखद धक्का बसला,” मी जिवंत होते. पूर्णपणे वनपीस होते. शरीराचा एकही अवयव मला सोडून गेलेला नव्हता. निर्जन, घनदाट जंगल, प्रचंड थंडी आणि दगड मातीत आपटलेला पण तरीही शाबूत फक्त खरचटलेला माझा देह! शून्य स्थिती म्हणजे काय ते त्या दिवशी मला कळलं. मृत्यूला भोज्या करून आल्यानंतरच्या जीवनात पुन्हा स्थिर होण्यासाठीचा तो एक शून्य क्षण होता. ना मी कुणाला हाक मारू शकत होते, ना कोणाची मदत मिळण्याची मला तिथे शक्यता वाटत होती पण तेवढ्यात कुठून तरी कसातरी पुढे गेलेला गुलाम मोहम्मद धडपडत त्याच्या घोड्यावरून दौडत कदाचित मलाच शोधण्यासाठी तिथे आला. त्याने मला अशा विव्हळ स्थितित पाहिलं आणि अक्षरश: मला उचललं आणि त्याच्या घोड्यावर नीट बसवलं. प्यायला पाणी दिलं आणि तो माझ्या पाठीमागे बसला आणि म्हणाला, ”डरो मत. मै हूँ ना! आल्ला की मेहरबानी तू बच गई. शुकरगुजार है हम उसके !”
मला काहीच समजत नव्हतं. मी बोलूही शकत नव्हते. निर्विचार निर्विकार होते मी. फक्त एवढंच जाणवलं हा गुलाम मोहम्मद मला माझ्या परिवाराची नक्की भेट घडवेल. मी त्याचे हात घट्ट पकडले.
पण एवढ्यावरच हा एपिसोड समाप्त होणार नव्हता. पुढे घडलं ते आणखीच अनपेक्षित आणि विचित्र होतं. काही वनाधिकाऱ्यांचं त्या भागात पेट्रोलिंग चालू होतं. त्यांनी मला आणि गुलाम मोहम्मदला असं घोड्यावर एकत्र पाहिल्यावर त्यांच्या डोक्यातला गुन्हेगारी कायदा सळसळला असावा. त्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुलाम मोहम्मदला वेड्यासारखे मारायला सुरुवात केली. मलाही घोड्यावरून उतरवले. मी बाजूला उभी राहून गुलाम महम्मदची चाललेली बेसुमार पिटाई बघत होते. माझा जीव कळवळत होता. काश्मिरी भाषेत ते बोलत होते. गुलाम मोहम्मद त्यांची गयावया करत होता. काय घडले ते सांगण्याचा प्रयत्न करत होता पण ते अधिकारी काही ऐकूनच घेत नव्हते. बेभानपणे त्याला नुसते मारतच होते. हळूहळू मला घडत असलेल्या प्रसंगाचा, कारणाचा अंदाज येऊ लागला. या वनाधिकाऱ्यांची अशी समजूत झाली होती की “हा तरुण गुलाम मोहम्मद माझ्याशी काहीतरी अतिप्रसंग करत होता” आणि अशा गुन्ह्याला कायद्याने फार मोठी शिक्षा होती वास्तविक त्यावेळच्या माझ्या वयाचा आणि आधीच घाबरलेल्या मनस्थितीचा विचार करता मी प्रसंगावधान कसे राखू शकले याचे मला आजही नवल वाटतं. पण त्या क्षणी मी, न घाबरता त्या मारणार्या अधिकाऱ्याचा दणकट हात जोरात पकडला आणि जितक्या जोरात मला बोलता येईल तितक्या उच्च स्वरात मी त्याला म्हटलं “छोड दो उसे. मारो मत.आप क्या कर रहे है ? ये कोई गुंडा नही है. ये मेरे लिए भाई जैसा है. उसने मेरी सहाय्यता की है,जान बचायी है.”
तरीही हे त्यांना लगेचच पटलं नाही त्यांना पटवण्यासाठी सगळी हकीकत.. आम्ही टुरिस्ट असल्यापासून ते गुलाम महम्मद आमच्या हाऊसबोटीचा मालक असल्यापर्यंतचा आणि त्यावेळी घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत मी जेव्हा माझ्या अत्यंत भेसळ, मोडक्या तोडक्या हिंदीत सांगितला तेव्हा त्यांनी काहीसे नाईलाजानेच पण गुलाम मोहम्मदला अखेर सोडले.
गुलाम महम्मदची मी कशी माफी मागू, कसे आभार मानू मला काहीही समजत नव्हतं पण त्याने मात्र मला व्यवस्थित सांभाळून “गुलमर्गला” आणले. माझे सारे तेरा जिवलग अत्यंत चिंतेत होते. मला पाहून सर्वांना एकदम “हुश्श” वाटले, ताईने, छुंदाने लहानग्या उषा निशाने (माझ्या बहिणी) मला धावत येऊन घट्ट मिठी मारली. रंजनने (माझा मावस भाऊ) मात्र त्याही क्षणी नेहमीप्रमाणे मला “मूर्ख, बावळट, अतिशहाणी” असेही बोलून घेतले. प्रत्येकाची प्रतिक्रिया काहीही असेल पण या सगळ्यांचा आपल्यावर किती जीव आहे हेच त्या क्षणी जाणवलं आणि माझा रक्षक एक मुस्लिम युवक गुलाम मोहम्मद हे सगळं अगदी मनापासून एन्जॉय करत होता. बाकी घडलेली सगळी कहाणी सर्वांना हळूहळू सांगितली तेव्हा भाईनी गुलाम मोहम्मदला प्रेमाने जवळ घेतले. त्याला बक्षीसीही दिली.
त्यानंतरची आमची संपूर्ण सफर अगदी सुखात, निर्विघ्नपणे पार पडली हे सांगणे नकोच. आज जेव्हा मागे वळून या प्रसंगाकडे मी पाहते तेव्हा वाटते कोण हिंदू कोण मुस्लिम ?
कोणता धर्म कोणती जात ?
त्यादिवशी काहीही घडू शकलं असतं. मी दरीत कोसळले असते तर ? गुलाम मोहम्मद आलाच नसता तर किंवा खरोखरच त्याची बुद्धी फिरली असती तर ? पण माथ्यावरचं विस्तीर्ण आकाश, उंच उंच वाढलेली ती दाट पर्णभार असलेली सुरुची झाडे, सभोवतालची हिमशिखरे आणि या साऱ्यांमध्ये कुठेतरी ईश्वरी लहरींचे, ईश्वरी शक्तीचे अस्तित्व ज्यांनी माझे सर्वतोपरी रक्षण केले! आजही याच शक्तीला मी विनम्रपणे वंदन करते. नकळतपणे पिसाळलेल्या, दहशतवादी समूहात हरवलेला गुलाम महम्मदचा चेहराही शोधत राहते.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
