Sunday, January 25, 2026
Homeबातम्यानवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा - देवेंद्र भुजबळ.

नवी मुंबई परिसरातील सर्व औद्योगिक वसाहती हटवा – देवेंद्र भुजबळ.

नवी मुंबई महानगर आणि परिसर अस्तित्वात येण्यापूर्वी या भागात विविध औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या. पण दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या विचारात घेता, लोकांच्या सुरक्षेच्या, आरोग्याच्या दृष्टीने या वसाहतींचे दूर कुठे तरी स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी एक नागरिक म्हणून बोलताना केली.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार दिनी आयोजित करण्यात आलेल्या “लोकशाहीचा जागर” हा विचारमंथन कार्यक्रम नुकताच वाशीत पार पडला. या कार्यक्रमात भुजबळ यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

या बरोबरच वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगर पालिकेने दुसरे धरण बांधले पाहिजे आणि शहराचा विकास, विशेषतः वाट्टेल तिथे उभे रहात असलेल्या टोलेजंग इमारती या मूळ विकास आराखडय़ाप्रमाणे आहेत का ? इकडे ही त्यांनी लक्ष वेधले.

श्री मनोज जालनावाला यांना पुस्तक भेट देताना श्री देवेंद्र भुजबळ

यावेळी भुजबळ यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून ही चर्चा आयोजित करणार्‍या नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री मनोज जालनावाला आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र पाटील यांना स्वलिखित “माध्यमभूषण” हे पुस्तक भेट दिले.

श्री मच्छिंद्र पाटील यांना पुस्तक भेट देताना श्री देवेंद्र भुजबळ

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोशल ऑडिट आणि ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी करण्याची गरज असून नागरिकांनी स्वतः सजग राहून क्षेत्र समित्यांच्या माध्यमातून नागरी कामांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन यावेळी महापालिकेचे निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांनी केले. सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी आरोग्याची सुरुवात रुग्णालयातून नव्हे तर शहर नियोजनातून होते, असे स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको या दोन शासकीय यंत्रणांमधील वादांचा फटका सामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना बसत असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष देवांग त्रिवेदी यावेळी म्हणाले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनेक चांगले प्रकल्प रखडत असल्याची उदाहरणेही त्यांनी दिली.

महिला सुरक्षेबाबत नवी मुंबईतील स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा बाब स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम यांनी निदर्शनास आणून दिली. कष्टकरी महिलांना लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत समस्या निर्माण झाल्याने नवी मुंबईची निर्मिती झाली. पण आज त्याच समस्या नवी मुंबईत निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

शहरातील होल्डिंग पाँड्समधील गाळ न काढल्यास भविष्यात खाडीचे पाणी शहरात शिरण्याची भिती नवी मुंबई महापालिकाकेचे निवृत्त शहर अभियंता डॉ. मोहन डगांवकर यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईसमोरील प्रश्न हे केवळ विकासाचे नसून नियोजन, समन्वय, सामाजिक न्याय, आरोग्य, पर्यावरण आणि संस्कृतीशी संबंधित आहेत. केवळ इमारती उभारून शहर स्मार्ट होत नाही, तर नागरिकांचे जीवनमान सुधारले तरच शहर खऱया अर्थाने स्मार्ट ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इमारतींच्या पुनर्विकासापूर्वी रस्त्यांची रुंदी, सार्वजनिक वाहन तळ आणि सांडपाणी व्यवस्थेचा समावेश असलेला मास्टर फ्लॅन तयार होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या रस्ते आणि नागरी सुविधांवर प्रचंड ताण येईल, असा इशारा यावेळी जेष्ठ पत्रकार श्री संजय सुर्वे यांनी दिला.

शहर केवळ सिमेंट आणि काँक्रीटचे न बनता वाचन संस्कृती, कला, नाट्य, साहित्य आणि स्थानिक उत्सवांमधून एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे, असे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी यावेळी म्हणाले.

या विचार मंथन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री मनोज जालनावाला यांनी नेटकेपणाने केले.

प्रारंभी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.

या कार्यक्रमास पत्रकार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️+91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments