कला-साहित्य भूषण पुस्तक : गुणी स्नेहीजनांचा कौतुक सोहळा …!
मित्रवर्य देवेंद्र भुजबळ यांचं “कला-साहित्य भूषण” हे पुस्तक म्हणजे त्यांच्या, या आधी प्रसिद्ध झालेल्या गगनभरारी, समाजभूषण, आम्ही अधिकारी झालो, माध्यमभूषण आदी पुस्तकांच्या विषय अन विचार प्रवाहाशी नातं सांगणारी, विविध क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात गुणी-कर्तृत्ववान मंडळी च्या कारकीर्दीचा सुंदर, भावपूर्ण लेखाजोखा मांडणारी, एक यशोगाथा आहे. दूरदर्शनच्या नोकरीमुळे व कार्यक्रम निर्मितीच्या निमित्ताने, या पुस्तकातील ज्या नामवंत कलाकार, गायक, साहित्यिक-कवी, चित्रकार, समाजसेवक, लोककलावंत मंडळीच्या कलागुणावर, त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमावर, संघर्षमय कारकीर्दीवर भुजबळ यांनी विविध संस्मरणे विविध लेखाद्वारे लिहिली आहेत, त्यातील गझल गायक भीमराव पांचाळे, कवी विसुभाऊ बापट, गायिका मृदुला दाढे जोशी, लेखिका प्रतिभा सराफ, सिने पत्रकार- लेखक अशोक राणे, लोककलावंत डॉ गणेश चंदनशिवे आदी बहुसंख्य मंडळींच्या कलागुणाशी मी परिचित असून त्यातील कलाकार जयंत ओक, निर्माती मीना गोखले पानसरे, कॅमेरामन अजित नाईक आदी मंडळी तर दूरदर्शन मध्ये माझे सहकारी म्हणून कार्यरत होते. या सर्वांच पुस्तक रूपाने कौतुक होत आहे याचा विशेष आनंद आहे.
सर्वसाधारणपणे नामवंत- प्रसिद्ध व्यक्तीवर सर्व लेखकांना लिहायला अन वाचकांना ते वाचायला आवडते. परंतु ह्या व्यक्तीबरोबरच भुजबळ यांनी, फारशा परिचित किवा लोकप्रिय नसलेल्या असंख्य गुणी कलावंत, शिक्षणतज्ञ, समाजसेवक, अधिकारी आदी विविध क्षेत्रात सचोटीने कार्य करून यश संपादन केलेल्या व्यक्तीवर गौरवपर लेख लिहिताना, त्यांच्या सहवासातील आठवणी देखील लिहिल्या आहेत. त्यातून या मंडळी मधील सुजाण माणसाच दर्शन होते.
सर्वसाधारपणे पुण्या- मुंबईतील कलावंत मंडळी हि माध्यमस्नेही असतात त्यामुळे त्यांच्या कलागुणांना सर्व माध्यमात चांगली प्रसिद्धी मिळते परंतु छोट्या गावात- शहरात निष्ठेने काम करणाऱ्या- आपले छन्द जोपासीत कार्यरत असणाऱ्या लोकांची फारशी दखल घेतली जात नाही. त्यांच्या वाट्याला काहीशी उपेक्षा येते. या पुस्तकाच्या रूपाने अशा मंडळींचं कार्य अन गुणविशेष वाचकांसमोर आणण्याचं मोलाचं काम भुजबळ यांनी केले आहे ते दखलपात्र आहे.

लोक कलावंत आणि सुरेश भटांचे निकटचे स्नेही शाहीर वैराळकर, कवयित्री विजयलक्ष्मी मणेरीकर,विविध वेशभूषा करून मनोरंजनातून उद्बोधनाचे कार्यक्रम करणारा वरप्रभ शिरगावकर उर्फ चार्ली,चित्रकार-लेखिका शिल्पा गम्पावार,अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रिय भारुडकार हमीद सय्यद, निवेदक-हास्यकलाकार बंडा जोशी, आधी शासनाचे आणि आता शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून लौकिक मिळवणारे डॉ आलोक जत्रातटकर, लेखिका-पत्रकार डॉ उषा रामवाणी गायकवाड, अहिल्यानगर मधील नाट्य कलावंत डॉ शाम शिंदे आदी समाजाच्या विविध थरातील अनेक यशस्वी गुणी मंडळीनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या अंगभूत गुणांचा विकास करून विबिध कला अन क्षेत्रात यश संपादन केल. या सर्वांची जीवनगाथा, संघर्ष अन जीवनानुभव ह्र्दयस्पर्शी शब्दात भुजबळ यांनी शब्दबद्ध केले आहे. ज्या मंडळींवर भुजबळ यांनी लेख लिहिले त्यांच्या कार्याची, पुरस्काराची, विविध पदांची मोठी जंत्री आपल्या लेखात दिली आहे. ती काहीशी कंटाळवाणी वाटते. ती यादी आटोपशीर करता आली असती. त्या त्या व्यक्तीच्या कार्य कुशलतेचे वर्णन करताना त्या मंडळींचे आपपल्या क्षेत्राबद्दल चे विचार अन अनुभव मांडले असते तर लेख अधिक माहितीपूर्ण अन उद्बोधक झाले असते. काही लेख पुरेशा माहिती अभावी त्रोटक झाले तर काही वाजवीपेक्षा जास्त तपशील दिल्याने पसरट झाले. असो. या लोकांच्या कार्याची अन गुणवत्तेची वाचकांना या पुस्तकाद्वारे ओळख होते आहे हे महत्वाचे !
शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर भुजबळ आणि त्यांच्या पत्नी अलका यांनी न्यूज स्टोरी टुडे हे पोर्टल सुरु केले. याद्वारे देश विदेशातील विविध क्षेत्रातील लोकांना लिहित केले. त्यांच्या साहित्यावर पुस्तके छापून प्रकाशित केली. त्यांनी स्वतःचा असा वाचक अन लेखकवर्ग तयार केला हि बाब अभिनंदनीय आहे. मुळात या सर्व मंडळी विषयी आपुलकीची अन प्रेमाची भावना बाळगून त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा अन मैत्र जपण्याची असोशी भुजबळ यांच्या लेखन शैलीत जाणवते आणि हेच त्यांच्या लेखनाचे बलस्थान आहे. त्यांना पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा…!

— परीक्षण : रविराज गंधे. माध्यम तज्ञ, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

अंधारातील काजव्यांच्या प्रकाशाचे चित्रण भुजबळ सर आवर्जून करतात. न्यूज स्टोरी पोर्टलद्वारे या कार्याचा प्रसार भुजबळ दांपत्याकडून अविरत चालू आहे हे अभिनंदनीय कार्य.
व्वा! खूप छान लिहिले आहे!