“तिळगुळाची चिक्की”
‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत संक्रांतीचे मोठ्ठया उत्साहात स्वागत करून भोगी पासून ते रथसप्तमी पर्यंत आपल्यात तिळगुळाचे विविध प्रकार बनवले जातात. आनंदाने एकमेकांना खायला घालतात. आमच्या लहानपणी तर आम्ही या गोड दिवसासाठी खुप आतुर असायचो. अगदी आई तिळगुळ बनवायला सुरु करायची तेंव्हापासून ते अगदी तिळगुळाच्या वड्या पासून ते पोळ्या, हलवा तर मनसोक्त ताव मारून फस्त तर करायचोच पण त्याहून जास्त आनंद, उत्साह म्हणजे याचा असायचा, संध्याकाळी नवीन कपडे घालून हातात एक छोटा डब्बा घेऊन सर्व मुले शेजारी, मैत्रिणींच्या घरोघरी जायचो. मोठ्यांना नमस्कार करून त्यांनी दिलेला तिळगुळ, हलवा त्या डब्यात भरून आणायचा आणि मग कोणाला जास्त मिळाला ते पहायचो. नंतर गोल बसून ताव मारायचो. मला तसे तर सर्वच प्रकार आवडतातच पण त्यातल्या त्यात जास्त आवडता पदार्थ म्हणजे चिक्की.
तशी चिक्कीही अनेक प्रकाराने बनवली जाते. रोज, विलायची यासारखे वेगवेगळे फ्लेव्हर्स सुद्धा यात घातले जातात.गुळ किंवा साखर घातली जाते.अगदी पारदर्शक, चकचकीत दिसावी म्हणून लिक्विड ग्लुकोज सुद्धा वापरला जातो. तशी आधी करायला मलाही थोडी किचकट वाटायची. कारण ज्यावर ती बनवायचे त्याला पोळपाट, लाटणे, सुरी .. सर्वांना ती चिकटू नये म्हणून लाटण्यापूर्वी भरपूर तूप लावावे लागायचे . कधी कधी हे करून पण थोडी चिकटते. नाहीतर जाड होते.पाक थोडासा कमी झाला की वातड होते .
पण आता एक वेगळी युक्ती सापडली आणि चिक्की बनवणे खुप सोप्पे झाले आणि तूप एकदम कमीतकमी तर लागतेच पण एकदम पातळ, पारदर्शक, खुसखुशीत होणारच आणि ते ही इतक्या झटपट बनतात या पद्धतीने केल्या तर की …बनवून तर पहा .. आणि मग सांगा ही ट्रिक कशी वाटली ?
साहित्य :
1 वाटी तीळ,1 वाटी बारीक कुटलेला कींवा चिरलेला गूळ, 1 चमचा वेलची पावडर किंवां 5..7 थेंब रोज इसेन्स, 1 चमचा तूप.
कृती :
प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात तीळ घालून मध्यम आचेवर एकसारखे सतत परतावे. म्हणजे छान गुलाबी, खमंग होतात आणि त्यामुळे चिक्की खुसखुशीत आणि खमंग होतेअसते भाजून झाले की खाली काढून घ्यावेत.
त्यानंतर मंद आचेवर कढई ठेवून त्यात तूप घालून ते पातळ झाले की गुळ घालावा. गुळाचा आधी पातळ पाक बनेल आणि त्यानंतर हळू हळू कडेकडेने बुडबुडे होऊ लागतील. आता त्यात वेलची पावडर किंवा रोज इसेन्स घालावा, चकचकीत पाहिजे असल्यास एक चमचा लिक्विड ग्लुकोज घालावा. त्यानंतर रंग बदलण्यास सुरुवात होईल. किंचीत लाल रंग झाला की एका बशीत किंवा कोणत्याही छोट्या वाटी किंवा डिश मध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब टाकावा. तो न पसरता बोटांनी त्याची गोळी बनवली गेली तर गोळीबंद पाक तयार झाला. आता त्यात तीळ घालून थोडेसे एकजीव करून घ्यावेत. कढई खाली काढून ठेवावी. तीळ आधी भाजलेलेच असल्यामुळे आता जास्त परतण्याची गरज नसते. आता पोळपाटावर बटरपेपर ठेवून त्यावर 1 चमचा कढईतील तीळगूळ घालून तो मोठा असेल तर दुमडून त्यावर घालावा. नाहीतर दुसरा बटरपेपर त्यावर ठेवून त्याची भराभर लाटत जास्तीतजास्त पातळ होईल अशा पद्धतीने छोट्या छोट्या पोळ्या बनवाव्यात व मोठ्या ताटात पसरून ठेवाव्यात. थंड झाल्या की या पोळ्या मस्त खुसखुशीत होतात.
वैशिष्टय :
गुळाच्या ऐवजी साखर घालून सुद्धा अशीच चिक्की बनवता येते. बटर पेपरवर लाटून केल्यामुळे हि चिक्की तूप खूपच कमी लागत असल्यामुळे तूपकट होत नाही आणि चिकटत नाही. त्यामुळे ही चिक्की बनवणे अगदीच सोपे जाते. हव्या तश्शा पातळ बनतात त्यामुळे त्या जास्तच खुटखुटीत बनतात. लिक्विड ग्लुकोज मुळे चकाकी येते, काचेसारख्या ट्रान्सफरंट बनतात. पाक मात्र एकदम कडक करावा, म्हणजे चिक्की छान बनते.
चला, संक्रांतीच्या तयारीला लागा व आनंद लुटा.

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800

Khup chan 👌👌👌👌