Sunday, January 25, 2026
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“कांदे पोहे”

काही जोड्या देव स्वर्गात बनवतात. त्यातील एक जोडी म्हणजे कांदा आणि पोहे यांची जोडी. या जोडीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही जोडी ‘जोडी’ तयार करण्याच्या कामी उपयोगी पडते !. भारतात साधारणतः मराठी फॅमिलीत दोनाचे चार हात करण्याचा कार्यक्रम म्हणजे परंपरेने चालत आलेला कांदे पोह्यांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम करणं म्हणजे यंदा कर्तव्य आहे असे समजले जाते. दोन अनभिज्ञ व्यक्तींनी पाहिलेली भावी आयुष्याची स्वप्ने त्यांना एकत्रपणे मूर्तरूप देण्याचं श्रेय या कांदेपोहे यांच्या जोडीला जातं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

कांदा आणि पोहे हे कृष्णाचे आवडते पदार्थ असावेत. आपल्या वाट्याला आलेले काम ही हरीची सेवा आहे असे मानून सेवाभावी वृत्तीने आपला परमार्थ ते करतात. असं म्हणण्याचं कारण म्हणजे कृष्णाच्या हातातील शंख, चक्र, गदा, पद्म हे ज्याच्या ठायी सामावलेले आहे किंवा ज्याच्या अंगी आपल्याला त्या सर्व रूपांचे दर्शन होते ती भाजी म्हणजे कांदा. मुळात कांदयाचा वास उग्र, त्याचा स्वभाव गुणधर्म थोडा तिखट परंतु आपण ज्यावेळी कांद्याला परतवतो, शिजवतो त्यावेळी त्याचा अंगभूत असलेला गुणधर्म सोडून तो गोडसर होतो. त्याचप्रमाणे पोहे हे अख्खे तांदळाचे दाणे शिजवण्यापूर्वी कुटून, कांडून चपट केलेले, पचायला सोपे असे आजच्या भाषेतील प्रोसेस्ड ग्रेन. त्यातही ते कृष्ण देवाच्या जिवलग मित्राने त्यांना भेट म्हणून दिलेले मग एवढे संस्कार केल्यावर ते आपला गुणधर्म बदलणारच ना. अशीही कांदा आणि पोह्याची जोडी स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला ‘कांदे पोहे’ या नावाने रूढ झाली असावी. या ‘कांदे पोहे’ नावाच्या पाककृतीमध्ये स्वादातले जवळपास सगळे रस अंतर्भूत झालेले आपल्याला दिसतात जसे विवाहप्रसंगी आपले सगळे नातेवाईक एकत्र येतात ना अगदी तसेच.

आता या जोड्या जुळवण्यासाठी तयार झालेले कांदे पोहे कसे तयार होतात ते आपण बघू. प्रसिद्ध गीतकार, संगीतकार अवधूत गुप्ते ‘कांदे पोहे’ याविषयी जे म्हटतात ना ते अगदी खरं आहे. ते त्यांच्या गीतात म्हणतात…..

“भिजलेल्या क्षणांना आठवणींची फ़ोडणी,

हळदीसाठी आसुललेले हळवे मन आणि कांती,

आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे”…..

ज्यावेळी करकरीत शुभ्र जाड पोहे मायेच्या पाण्यात भिजतात ना त्यावेळी ते नरम होतात. जणू ते नवीन होऊ घातलेल्या जोडप्याला सांगत असतात … संसारात पडण्यापूर्वीच एकमेकांच्या मायेत पडून आपला इगो, आपला हट्टी स्वभाव याला मुरड घालून थोडं नमतं घ्यायला शिका. सगळ्याच ठिकाणी आपला ताठरपणा धरून चालत नाही तर काही ठिकाणी मायेचा ओलावा धरून एकमेकांशी थोडे नरमाईने वागा.

नंतर ते नरम झालेले पोहे गरम तेलाच्या कढईत टाकण्यापूर्वी तडतडणारी मोहरी, हितकर असलेलं जिरं, चुरचुरणारी मिरची यांची फोडणी करा. आपल्या अंगी असलेले वाईट दुर्गुण त्या फोडणी प्रमाणे तडतडून जाऊ द्यात. मग त्यात आपला बहुगुणी बारीक चिरलेला कांदा, खुसखुशीत भाजलेले शेंगदाणे टाकून ते थोडे परता. दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे भांड्याला भाडं हे कधी ना कधी तरी लागणारच. पण ज्यावेळी काही कारणांनुसार भांडण होतील त्यावेळी कांद्याचा गोडवा अनुभव. तो जसा परतल्यावर गोडसर, गुलाबी होतो ना तसेच वागा. मग बघा तडतडणारी मोहरी आणि चुचरणारी मिरची सुद्धा शांत होईल. फक्त हे करत असताना एवढी मात्र काळजी घ्यायची की कांदा फोडणी संगे जळून तर जात नाही ना. तो गुलाबी होई पर्यंतच त्याला शिजवा. नात्यातही असंच असतं एकमेकांविषयी असलेले गैरसमज योग्य वेळी दूर केले तर आयुष्य हे फोडणी सारखं जळून करपत नाही तर गोडसर, गुलाबी कांद्या सारखं परिपक्व होतं.

त्यानंतर माहेरची थोडी हळद आणि सासरची किंचित साखर घालून त्यात मैत्रीतील लिंबाप्रमाणे असलेला थोडा चावट आंबटपणा घाला आणि त्यात प्रेमाने भिजून नरम झालेले पोहे घाला म्हणजे एकमेकांच्या चुका, उणिवा विसरून ते एकमेकांच्या रंगात रंगून जातील; पण हो हे करत असताना कृष्णाला ज्याप्रमाणे रुक्मिणी आवडते ना त्याप्रमाणे म्हणजेच चवीनुसार थोडं मीठ घालायला मात्र विसरू नका नाही तर पोहे अळणी होतील. नंतर या सर्व आठवणी आपल्या आठवणींच्या कप्प्यात बंद करून ठेवा म्हणजेच कढईवर झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्या. आपल्या आयुष्यातील जे काही आनंदाचे क्षण आहेत त्यांना कसं आपण सजवून ठेवतो अगदी तसंच हिरव्यागार कोथिंबिरीने आणि खवलेल्या नारळाच्या किसाने त्या पोह्यांना सजवा. नंतर गॅस बंद करून त्या सर्व आठवणी आठवत, लाजत लाजत ती कांदे पोह्यांची डिश पुढे करा मग बघा या संसाररूपी कांदे पोह्यांची चव कशी जिभेवर बराच वेळ रेंगाळेल ते.

— लेखन : विनय पारखी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments