कार्यकर्ता रडला, बोंबलला, गाडीसमोर आडवा झोपला, नेत्यांवर धावून गेला, पक्षाध्यक्षांचा पाठलाग केला, मीडियाला बाइट दिली, काही काळ सगळ्यांचीच हवा टाइट केली. समाजसेवेची गरम वाफ निघून गेली आणि कार्यकर्त्याची किटली गार झाली.
कार्यकर्ता कोणी खाल्ला ?
कार्यकर्ता चमच्यांनी खाल्ला . कार्यकर्ता नेत्याच्या नातेवाईकांनी खाल्ला. तुझ्या निष्ठांबद्दल शंकाच नाही, तू खूप प्रामाणिकहेस पण पैशांची व्यवस्था कशी करणार ? या प्रश्नानंही त्याचं अवसान गळालं. मांजरीनं स्वतःचंच पिल्लू खावं तसा तो स्वतःच्याच नेत्यानं आणि पार्टीनं मटकावला !
कार्यकर्त्याचं सध्या काय चाललंय ?
सध्या तो ज्याच्यामुळं आपलं तिकीट कटलं , त्याच्याच विजयाचा गुलाल उधळतोय ! सत्काराचा गुच्छ घेऊन त्याच्याच दारात पुच्छ हलवतोय ! रडल्यावर ‘स्वीकृत ‘ चा शब्द मिळाला होता. त्याच एकमेव आशेवर त्यानं सगळं टेन्शन पचवलं होतं ; पण आता कळतंय, हा शब्द तर साहेबांनी आधीच पन्नास जणांना देऊन ठेवलाय. आता या स्पर्धेत तरी आपण टिकलो पाहिजे… तर मग रोज पार्टीत गेलं पाहिजे, ऑफिस झाडलं पाहिजे, सतरंज्या झटकल्या पाहिजेत. पुन्हा प्रामाणिकपणे कामाला लागल्याशिवाय पर्याय दिसत नाही. उचला सतरंज्या! परवाच तो साहेबांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करून आलाय ,
” सायब ! वर्षभर तरी स्वीकृत करा , जन्माचं सार्थक व्हईल ! तुमचे उपकार धा जन्म इसारणार नही. ” सायब गालात हसल्यात व्हईलबी कळंना नि व्हणार नाहीबी कळंना ! जाम टेन्शन आलंय त्याला ! …. आत्ता रं बॉ!
कार्यकर्ता स्वतःशीच हसला !
पुलं म्हटले होते , कार्यापेक्षा कार्यकर्त्याला आणि संस्थेपेक्षा संस्थापकाला जास्त महत्त्व आलं की त्या संस्थेचं संस्थान व्हायला वेळ लागत नाही. लोकशाहीवर स्वार झालेल्या नेतेशाहीत कार्यकर्ता आणि जनता यांना स्वतःच्या मताइतकंही मोल राहत नाही. तर तिकिटबिकीट दूरच राहीलं. स्वतःची कुवत वाढवता वाढवता कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला. वार्डातली शंभर पोरं तो विचारानं सांभाळत बसला ; पण ती सारी फौज तिकिट वाटपाच्या टायमाला भलत्यांसोबत ढाब्यावर जाऊन बसली. माणसं सांभाळण्याचं हे ‘अनोखं ‘ गणित त्याला जमलंच नाही, फसलं! ॲमेझॉन नदीच्या काठावर माणसंच माणसांना खायची म्हणतात! किती क्रूर झालीत माणसं याचा प्रत्यय आला .निष्ठांच्या अशा ‘ विष्ठा ‘ झाल्या. ‘ नफा ‘ हेच एकमेव मूल्य झाल्यावर ‘ सेवा – समर्पण’ अशा लोकशाही मूल्यांचं दुसरं काय होणार ? अजून आपलं नाव मतदार यादीत येतंय हे काही कमी नाही. नखाला शाई एवढीच आपली लोकशाही !
बाकी सगळं ‘शाही ‘ लोकांसाठी असतं !
आरक्षण , स्पर्धापरीक्षा , कर्जमाफी , नोकरभरती , स्मार्टसिटी , सिंचन, राजकीय भुलावण ही सारी लोकांना झुलवायची साधनं झालीत. विकासाचे सरासरी आकडे अनेकदा वास्तवाला झाकून टाकतात आणि विकास नेमका कुठं , कुणाचा नि कसा झाला हेच कळत नाही. लोक आणि व्यवस्था यांत ‘व्यवस्था ‘ भारी भरतांना दिसते. होयबांनी भरलेला समाज लोकशाहीला घेरत आहे. भाषा, पैसा, धर्म, गरिबी, बेकारी , जाती यांचा राजकारणासाठी पद्धतशीरपणं वापर करणं यालाच आता ‘ राजकीय रणनीती ‘ समजलं जातं आहे. घरच्या सोप्यावर बसून कुरकुरे खात टीव्हीवर शक्तिमान मालिका पाहून कोणी ‘शक्तिमान ‘ बनत नाही. भांडवलशाहीनं मोठा पगार देऊन विचारवंतांना विकत घेऊन टाकलं आहे. चॅनेलवाल्यांना पण ‘ पोट ‘ असतं .. .. अशी काही आत्मचिंतनपर विचारांची खळबळ त्याच्या डोक्यात सारखी येते आहे. चला ,’ अपयश ‘ हीसुद्धा मोठी सुंदर गोष्ट असते. ती माणसाला अशी अलगद जमिनीवर आणून सोडते, म्हंटला स्वतःशीच अन् … कसनुसं हसला!
कार्यकर्त्यानं काय करावं ?
कार्य थांबवू नये पण फळाची अपेक्षा धरू नये. हा कृष्णाचा सल्ला कठीण वाटणारंच ! त्यामुळं हेही कठीण वाटलं तरी घरी लक्ष द्यावं. स्वतःच्या कुटुंबाची सेवा ही देखील एक मोठीच सेवा असते. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखावं. वस्तू , वास्तु , माणसं , नाती आज काहीच टिकाऊ राहिलेलं नाही हे खरंच ! तरी स्वतःला टिकवून ठेवता यायला हवं. स्वतःच स्वतःचा आब राखावा. निदान आपली किंमत राहिल एवढं तरी नेत्यांपासून सुरक्षित अंतर राखावं. जर आलाच नेत्याच्या ऑफिसचा फोन तर दुकानवर बसलोय, शेतात काम चाललंय ; सुटीच्या दिवशी भेटू म्हणावं. …
फोन कट झाल्याबरोबर लगेच हुदुडूक हुदुडूक पळत सुटू नये. जिथं नेटवर्क नाही तिथं जाऊन स्वतःशी कनेक्ट व्हावं. फार खाज असेल तर स्वतःची एखादी संस्था काढावी.
मंडळ काढावं , वाचनालयं- व्याख्यानमाला चालवाव्या. करणाऱ्याला भरपूर काही सुचत जातं. लोकांच्या हिताचं काही केलं की लोक मानही देतात. पडणं, झडणं चालूच राहतं, माणसाने वाढणं सोडू नये. जरा क्रूर व्हावं स्वतःतला खराब भाग कापून काढावा. हरणाचा हत्ती केला अन् त्या हत्तीनंच माझी मान सोंडेत पिरगाळून मला मारून टाकलं असा शोक करत बसू नये, स्वतःच हत्ती व्हायचा प्रयत्न करावा. मूळं खोल गेली की झाड सहसा पडत नाही. नेत्याच्या फूटपट्टयांनी स्वतःचं आयुष्य मापू नये. खांदे दुःखूदुःखू करतील एवढी इतरांची गाठोडी उचलू नयेत. सतत काहीतरी करत राहणं हाही एक मानसिक आजारच आहे, त्यामुळं थोडी विश्रांती घ्यावी. जमीनसुद्धा पडीक ठेवली की भरघोस पीक देते. म्हणूनच नेत्याच्या शेताला सारखं पाणी देऊ नये. आनंदाने मेहनत करावी पण अनावश्यक संघर्षात स्वतःची ऊर्जा वाया घालवू नये. संघर्ष स्वतःसाठी, इथल्या माणसांसाठी , विचारधारेसाठी असावा, मग तो योग्यवेळी बरोबर उगवतो .
रिकामं ताट , रिकामं पोट अन् रिकामं डोकं माणसाला लाचार बनवतं. शेर बनना है तो जंगल का बनो, सर्कस का नही। सर्कसमध्ये रिंगमास्टर असतो. बरगद का पेड बनो, कोई उखाडने की साजिश नही करेगा। कार्यकर्त्यांची गर्दी भोवती नसली की नेते वेडेपिसे होतात ; पण दुर्दैवं हे की कार्यकर्ते घरी थांबतच नाहीत. तेव्हा घरीच थांबावं. …थांबून असं काही करावं की नेता आपोआप आपल्या घरी येईल. गरीबाचं एखादं पोर शिक्षणासाठी दत्तक घेतलं , गल्लीतल्या पोरांना पाचशे रुपयांची गोष्टींची पुस्तकं वाटली , पन्नास – शंभर बाटल्या रक्त जमवून रक्तपेढीला दिलं तरी छान समाधान मिळतं. पूर्वी कार्यकर्ते अशा छोट्या छोट्या गोष्टींतूनच स्वतःची ओळख तयार करत. आता उठला की सुटला नेत्याच्या बंगल्यावर ! नि झाला स्वतःचा बोन्साय! अलबत स्वतःचा बोन्साय होऊ देऊ नये. अन्यथा आपल्या रोपाची कुंडी ऐनवेळी मागच्या दाराला नेऊन ठेवली जाते.
विचार , उच्चार, प्रचार, संघटन, आचार आणि संघर्ष हे परिवर्तनाचे सहा टप्पे आहेत , ते नीट समजून घ्यावेत. तरच परिवर्तन शक्य होईल. परिवर्तन आपोआप होत नाही, त्याची सुरवात स्वतःपासूनच करावी लागते. जग बदलण्याआधी स्वतःच बदलावं ,ते बरं पडतं.
कार्यकर्ता ही एक भावनिक जमात असते. त्यामुळं त्यांच्या भावनांशी सारेच खेळतात. त्यासाठी थोडा व्यवहारही पाहावा म्हणजे फार वाहवत जाणं होत नाही. स्वतःची किंमत आणि हिंमत टिकवावी. आपल्या आपल्या हिश्श्याचा भारत सुंदर करावा. मी कार्यकर्ता ! मी कार्यकर्ता ! सारखी बोंब ठोकू नये.
खरंतर लोकांनी ‘ते ‘आपल्यासाठी म्हणायला हवं .
तुम्हाला काय वाटतं?
— लेखन : डॉ संजय गोरडे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800
