दसरा ते दीपावली दरम्यान सहलीस कोठे जावे याची चर्चा मित्र डॉ.वसंत पाटील सोबत मी करत होतो. शेवटी भूतान टुर करावी असे आमचे एकमत झाले. या सहलीसाठी सुभाष उकरंडे सोबत येण्यास तयार झाला. अशा प्रकारे दौरा नक्की करुन सात ऑक्टोबरला आम्ही मार्गस्थ झालो. योगायोगाने सहलीसाठी इतर सारे जेष्ठ नागरिक असल्याने धमाल मजा आली.
भूतानसाठी मुंबईहून बागडोगरा प.बंगालपर्यंत विमानाने साडेतीन तासात पोहोचलो. तेथे दुपारचे जेवण आटोपून मिनीबसने जायगावकडे मार्गस्थ झालो. रस्त्याच्या दुतर्फा चहामळे अन् वाढीच्या अवस्थेतील भातशेतीचा लोभस नजारा दृष्टीस पडला. वाटेत फुलबारी येथून उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने केवळ दोन किमी अंतरावर बांगलादेश असा फलक दिसला. पुढील प्रवासात काही अंतरावर तोरसा नदीचे विस्तीर्ण पात्र लागले. ही नदी तिबेटमधून वाहत बांगलादेश मार्गे ब्रह्मपुत्रेद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते.
जायगाव हे भारताचे भूतान सीमेलगतचे शेवटचे गाव. येथे आम्ही पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र दाखवून भूतान देशातील फुंटशोलिंगल शहरात प्रवेश केला. प्रतिदिन प्रत्येकी रु १२००/- पर्यटन कर आकारला जातो. तेथील तुरळक गर्दीचा स्वच्छ रस्ता अन् सर्वत्र टापटीप मनाला भावली. पारंपरिक पेहराव (घो व खीरा) व भूतानच्या वास्तुकलेत एकसारख्या दिसणाऱ्या इमारती नजरेस पडल्या. येथील मुक्कामासाठीचे हॉटेल मस्तच होते.स्थानिक गाईड राजकुमारने आमचे पारंपरिक खादर (पांढरा लकी शेला) देऊन स्वागत केले.
प्रथम आम्ही मील्ला रेपा (सांगे मीग्युर्लिंग) मंदिरास भेट दिली. तेथे बुद्धाच्या तीन मूर्ती होत्या. ज्यांचा चेहरा भूतकाळ भविष्यकाळ अन् वर्तमान काळ दर्शवीत होत्या. या मूर्तीसमोर नेहमी सातच्या पटीत बाऊल मध्ये दररोज सकाळी पाणी भरून ठेवले जाते तसेच तुपाचे दिवेही लावले जातात. येथेच तिबेटी योगीसाठी विजयी स्तूप म्हणून आकर्षक टॉवर बांधलेला आहे.
भूतान देश उंचावर असल्याने ‘उंचावरील जमीन’ म्हणून ‘भूतान’ असे संबोधले जाते. भूतानचे भौगोलिक क्षेत्र ३८,३९४ चौ.किमी असून येथील एकूण वीस जिल्ह्याची लोकसंख्या केवळ साडेसात लाख आहे. सायंकाळी आम्ही राजधानी थिंपू येथे पोहोचलो. सर्वत्र घाटमाथ्याचा प्रवास अन् कार्बन विरहित प्रसन्न व शांत वातावरणात गाढ झोप लागली.
थिंपू किल्ला :
सकाळी आम्ही एका महाकाय पाषाणावर वसलेला किल्ला बघण्यास निघालो. हा किल्ला १६२९ मध्ये बांधण्यात आला होता. आता येथे बौद्ध धर्म शिक्षणाचे महाविद्यालय भरते. येथे तीन बोधिसत्वाच्या मूर्ती आहेत. ज्या प्रत्येकास अनुक्रमे बळ, शिक्षण व निर्वाणासाठी सहनशक्ती देत असल्याचे व्यक्त करतात.किल्ल्याच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ साली भूतान भेटीत मित्रत्वाचे प्रतीक म्हणून लागवड केलेले सायप्रस वृक्ष डेरेदार वाढलेले आहे.

बुद्ध दोरदिनम्हा पुतळा :
टेकडीवर बसलेल्या बुद्धाची ही जगात सर्वात मोठी मूर्ती आहे. भूतान शासन अन् हाँगकाँग व सिंगापूर येथील पर्यटकांच्या १०० मिलियन अमेरिकन डॉलर अर्थ सहाय्यातून या मूर्तीची स्थापना केलेली आहे.भूतानचे चौथे राजे यांच्या ६८ व्या वाढदिवशी सन २०१५ मध्ये याचे लोकार्पण केले आहे. चौथऱ्यांसह याची उंची ६१.५ मीटर आहे. पितळ व ब्राँझ धातूत बनवलेल्या मूर्तीचे हात अन् चेहऱ्यास सोन्याचा मुलामा दिलेला आहे.

मूर्तीच्या कपाळात एक मिलियन किमतीचा हिरा बसवलेला आहे. बुद्ध मूर्तीच्या सभोवताल प्रांगणात दूध, दही, तूप, फळे इत्यादी दान करावयाच्या अवस्थेतील आकर्षक सोनेरी ३५ मूर्ती उभारल्या आहेत. या परिसरातून स्वच्छ वातावरणात थिंपू शहराचे विहंगम दर्शन होते. या ठिकाणाहून परतताना हिंदू मंदिराचे दर्शन घेतले. वाटेत एका ठिकाणावरून स्वच्छ खळाळत्या पाण्याची वांगछू नदी पाहिली. या नदीच्या किनारी थिंपू किल्ला आहे. ज्यामध्ये सद्या संसद व शासकीय कार्यालये कार्यरत असून तेथे पर्यटकांना मुक्त प्रवेश नाही. दुपारच्या जेवणात आम्ही पूमा (भेंडी फ्राय) व डोलम (दोडका) भाजीचा आस्वाद घेतला. तदनंतरचा वेळ थिंपू मार्केटिंग साठी दिलेला होता. तथापि कडक उन्हामुळे आम्ही तडक विश्रांतीसाठी हॉटेल गाठले.
क्रमशः
— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800
