फेसबुकवरील पुस्तक प्रेमी समूहातर्फे पुस्तक परिचय अभियान राबविण्यात येत असून एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय करून दिला जात असून हे या समूहाचे मोठेच यश आहे.
सप्ताह क्र. २९४, पुस्तक क्र. २०५५ दि : २२ जानेवारी २०२६ रोजीच्या पुस्तक परिचय सत्र दुसरे, पुष्प चौथे मध्ये मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या “माध्यमभूषण” या पुस्तकाचा सुंदर परिचय जेष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर सरांनी करून दिला आहे. या बद्दल सरांचे, पुस्तकप्रेमी समूहाचे आणि या परीक्षणाला भरभरून प्रतिसाद देणार्या वाचकांचे मनःपूर्वक आभार.
हे परीक्षण आणि त्यापुढे इवाचकांच्या प्रतिक्रिया देखील देत आहे. पुस्तक मिळण्यासाठी कृपया +91 9869484800 या माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, ही विनंती.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ.

आता वाचू या परीक्षण
“माध्यम भूषण : रसिकांचे आभूषण !”
एखादी व्यक्ती स्वकष्टाने उच्च पदावर पोहोचते तेव्हा साहजिकच त्या व्यक्तिचा अधिकारी, कर्मचारी, सहकारी,पत्रकार, संपादक इत्यादी अनेक जणांशी तिचा संबंध येतो. यामागे त्या व्यक्तिचा सहकार्याचा, आपलेपणाचा, परोपकारी स्वभाव कारणीभूत ठरतो. ‘माध्यमभूषण’ या पुस्तकाचे लेखक श्री देवेंद्र भुजबळ सर यांचा सेवानिवृत्तीनंतरही सर्वांसोबत मधुर संबंध कायम ठेवण्याचा नि निवृत्तीनंतरही अनेकांशी मैत्र जोडण्याचा स्वभाव सर्वश्रुत आहे. लहानपणापासून अत्यंत खडतर प्रवास करीत देवेंद्रजी माहिती संचालक या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती म्हणजे आता आराम करायचा असा समज असताना देवेंद्रजींनी तो मार्ग न स्वीकारता सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पत्नी; सौ. अलकाताईंच्या सहकार्याने ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब हे पोर्टल सुरू करून देश-विदेशातील शेकडो लेखकांना लिहिते केले. तसेच ‘न्यूज स्टोरी टुडे’ प्रकाशन संस्थेची मुहूर्तमेढ रोवून देश-विदेशातील अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित केली.
देवेंद्रजींनी त्यांच्या संपर्कात आलेल्या नि काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास असलेल्या, ज्यांचं कार्य समाजासाठी विशेषतः तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरेल अशा छत्तीस ‘माध्यमभूषणां’चा संपूर्ण जीवनपट शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकातील पहिले माध्यमभूषण म्हणजे थोर साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक! माध्यमभूषण या पुस्तकाला कर्णिक यांची प्रस्तावना आहे. ४१ कथासंग्रह- काव्यसंग्रह, १० ललितगद्य पुस्तके, नाटके, बालसाहित्य, कादंबरी अशा साहित्य क्षेत्रात आश्वासक वाटचाल करणाऱ्या कर्णिक यांच्या कथेवर चित्रपटही प्रदर्शित झाले. ‘पद्मश्री’ ह्या पुरस्काराने भारत सरकारने त्यांना गौरवान्वित केले आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाला कर्णिक यांची प्रस्तावना लाभली आहे.
ताणतणावाच्या परिस्थितीत शांत राहून कामावरील निष्ठा ढळू न देणारे दूरदर्शनचे माजी संचालक श्री याकूब सईद ! याकूबजींनी चाळीस हिंदी- मराठी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका पार पाडल्या. नटरंग, जॉली एल.एल.बी. इत्यादी हिंदी -मराठी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. याकूब यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा उल्लेख लेखकाने केला आहे.
कठीण परिस्थितीत शिष्यवृत्ती घेऊन एम.ए. (हिंदी) झालेल्या सुरेश पुरी यांनी शिक्षण पूर्ण होताच वसंतराव नाईक महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापकाची नोकरी पत्करली. बॅचलर ऑफ जर्नालिझम ही परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांची विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापकपदी निवड झाली. या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. पत्रकार महारुद्र मंगनाळे या विद्यार्थ्याने पुरी यांच्याबद्दल ‘आई मनाचा माणूस’ हे पुस्तक लिहिले आहे.
दूरदर्शनवरील संहितालेखक ही नोकरी सोडून लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय घेऊन प्रदीप दीक्षित यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये कथा, पटकथा, संवाद लिहिले असून ती संख्या अडीचशेहून अधिक आहे. लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती असा सहभाग असलेले लघुपट, माहितीपट, चित्रपटांची संख्या पन्नासहून अधिक आहे.
दूरदर्शनवील बातम्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली व्यक्ती म्हणजे वासंती वर्तक ! अनेक घरगुती संकटांचा लवलेश चेहऱ्यावर येऊ न देता निष्ठेने “बातम्या” वाचणार्या वासंतीताईंचा जीवनपट वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी येते.
प्रकाश बाळ जोशी ! इंग्रजी वृत्तपत्रांचे पत्रकार म्हणून चाळीस वर्षे सेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी चित्रकलेचा छंद जोपासला. त्यांच्या कलेला देश- विदेशात सन्मान मिळाला. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भारतासह अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी यासह अनेक देशांमध्ये झाले. जोशींचा ब्रिटिश पार्लमेंटच्या कमिटी रुममध्ये सत्कार करण्यात आला. जोशी यांनी लेखनकला जोपासली असल्याची नोंद लेखक भुजबळ यांनी घेतली आहे.
डॉ. किरण चित्रे ! मुंबई दूरदर्शन केंद्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सांस्कृतिक आणि संगीतक्षेत्रात कार्य सुरू ठेवले असून त्या म्हणतात, “आजच्या मुलींना शिकण्यासाठी शासनाने अनेक सवलती दिल्या आहेत. नोकऱ्यांमध्येही आरक्षण दिले आहे. या सर्व परिस्थितीचा मुलींनी अधिकाधिक लाभ घेऊन सक्षम बनले पाहिजे.”
चोवीस वर्षे वयाचा एक हसमुख युवक दूरदर्शनच्या सेवेत येतो. भरपूर कष्ट घेऊन स्वतःचे स्थान निर्माण करतो. ‘आमची माती ,आमची माणसं’ या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतो. स्वकष्टाने दूरदर्शनच्या उपमहासंचालक या पदावर पोहोचतो ती व्यक्ती म्हणजे शिवाजी फुलसुंदर ! त्यांचा जीवनपट या पुस्तकात वाचायला मिळतो.
जेष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्याबद्दल लिहिताना देवेंद्र भुजबळ म्हणतात, “चांगल्या पत्रकाराचे व्यावसायिक आयुष्य हे जितके मान सन्मानाचे असते, तितकेच व्यक्तिगत जीवन सुखदुःखाचे क्षण हिरावून घेणारे असते. दिवस असो, रात्र असो, शनिवार, रविवार असो, दसरा, दिवाळी असो की अन्य बरे-वाईट प्रसंग असो, प्रत्येक वेळी त्यांना घरच्यांसोबत,
नातेवाईकांसोबत, स्नेही, मित्रमंडळी यांच्यासोबत सहभागी होता येईलच असे नसते.”
थोर कवी मंगेश पाडगावकर यांनी पाठ थोपटून शाबासकी दिलेला कवी नंतर आकाशवाणीचा कल्पक, लोकप्रिय निर्माता, प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक म्हणून ख्यातकीर्त झालेला कोकणचे सुपुत्र म्हणजे डॉ. महेश केळुसकर ! केळुसकर यांचा जीवनप्रवास वाचनीय असाच आहे. तो लेखकांनी मोठ्या तन्मयतेने उलगडला आहे.
अजित नाईक हे दूरदर्शनच्या चमूतील छायाचित्रकार! त्याकाळी दूरदर्शनच्या छायाचित्रकाराला मिळालेल्या एकाच कॅमेऱ्याच्या साहाय्याने छायाचित्रण करावे लागे. देवेंद्रजींनी नाईक यांची धावपळ आणि विविध कोनातून केलेले छायाचित्रण याबद्दल कौतुकाने लिहिले आहे, “अजित स्वतःची कल्पकता वापरून एकच नृत्य, अन्य कलाप्रकार त्या-त्या कलाकारांना तीनदा करायला लावीत असे. नृत्यांगनांच्या पावलांचे क्लोजअप घेण्यासाठी तो जमिनीवर आडवा पडून, कपडे खराब होतील ही चिंता न करता चित्रीकरण करीत असे.” स्वतःच्या कामाबद्दल असलेली निष्ठा, तळमळ त्या क्षेत्रात यश नि आदर मिळवून देते हे या लेखातून समोर येते.
वास्तविक पाहता वृत्तपत्र प्रकाशित करणे आणि ते सातत्याने पंचवीस वर्षे चालविणे हे अत्यंत अवघड असे कार्य आहे परंतु ते यशस्वीपणे चालविणाऱ्या संपादिका आहेत, नागपूरच्या शोभा जयपूरकर! अत्यंत कष्टाने जीवन व्यतीत करताना त्यांनी १६ जुलै २००० रोजी ‘कलम का गौरव’ हे साप्ताहिक सुरू केले असून आज पंचवीस वर्षांनंतरही ते सुस्थितीत सुरू आहे ते शोभाताईंच्या धाडस, आत्मविश्वास नि नवीन काही करण्याची ऊर्मी यामुळे !
नाव आणि स्वभाव यात साधर्म्य असलेले विनयशील व्यक्ती विनय वैराळे! ‘महाभारत’ सारख्या महत्त्वाच्या नि अत्यंत लोकप्रिय झालेल्या मालिकेच्या सहायक संकलनाची जबाबदारी सांभाळणारे विनय म्हणतात, “मला वेळ मिळे, तसा मी दूरदर्शनमध्ये जात असे. एके दिवशी मला देवेंद्र भुजबळ म्हणाले, विनय, फिल्म डिव्हिजनमध्ये एडिटरची जागा निघाली आहे, तू अर्ज कर. मी अर्ज केला. यूपीएससीच्या मुलाखतीसाठी दिल्लीला गेलो. मुलाखत झाली आणि मी निवडला गेलो. माझी नेमणूक झाली.” चांगल्या संधीची माहिती देणारे भुजबळ तसेच त्यांनी केलेली मदत लक्षात ठेवणारे विनय दोघेही आदरयुक्त आहेत.
ध्वनिमुद्रक, संकलन, लेखन, साहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, पीआरओ, मॉडेल/आर्टिस्ट समन्वयक, इव्हेंट मॅनेजर, प्रसिद्धी प्रमुख, ‘रापा’ या महत्त्वाच्या सोहळ्यात महत्त्वाचा सहभाग, २५० चित्रपटांचे ट्रेलर लिहिणे याचबरोबर, ज्यांनी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती, इंग्रजी चित्रपटांची प्रसिद्धी करण्याचे काम केले असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे सिद्धार्थ कुलकर्णी! चित्रपट क्षेत्रातील सहा पिढ्यांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ९० च्या दशकात जे जे हिंदी चित्रपट गाजले त्या सर्व चित्रपटांशी ते जोडलेले होते.
संगमनेर येथील किसन हासे यांनी विद्यालयातील ग्रंथपालाची नोकरी सोडून रद्दी खरेदी-विक्रीसोबत रबरी शिक्के बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. कुणाचाही आर्थिक हातभार नसताना आनंद प्रिंटर्स हा छापखाना सुरू केला.पाठोपाठ ‘संगम संस्कृती’ हे साप्ताहिक सुरू केले. काही वर्षांनंतर त्यांनी दैनिक युवावार्ता सुरू केले. हासे यांचा प्रवास वाचताना वाटतो तितका सोपा नाही. त्यांनी घेतलेले कष्ट भुजबळ यांनी उत्कटतेने मांडले आहेत.
शिकागो येथील माधव गोगावले न्यूज स्टोरी टुडे पोर्टल साठी लेखन करीत असल्याबद्दल लेखक देवेंद्रजी भुजबळ यांचा आणि त्यांचा परिचय झाला. मुळचे भारतीय असूनही शिकागोत स्थायिक झालेले माधवराव तिथल्या वातावरणात जुळले. तिथे भारतीय परंपरा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी जिथे काही उपक्रम – कार्यक्रम असत तिथे उपस्थित राहू लागले.
लेखक भुजबळ सर प्रत्येक माध्यमभूषण व्यक्तिची माहिती फार बारकाईने, सखोलपणे मांडतात. माध्यभूषण प्रा. डॉ. सुचिता पाटील! १४५ कथा, ६५० कविता तसेच २००हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.त्यांनी २२२ माहितीपटांसह जाहिरातींना आवाज दिला आहे. एका यूट्यूब वाहिनीवर त्यांनी ८०० बातमीपत्रे वाचली असून एक हजारापेक्षा अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
घराघरांमध्ये पोहोचलेला शो म्हणजे ‘बिग बॉस’! या शोमध्ये अत्यंत जरबयुक्त आवाजात आदेश देणारा आवाज रत्नाकर तारदाळकर यांचा ! शोमध्ये आवाज कुणाचा आहे हे कुणालाही कळू न देण्याचा केलेला करार तारदाळकर यांनी शेवटपर्यंत पाळला. तारदाळकर यांचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे. तारदाळकर यांचे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे.
कलेतून, लेखनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यप्रवण असलेल्या माध्यमभूषण म्हणजे ठाणे येथील मेघना साने ! न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या त्या महत्त्वाच्या लेखिका आहेत. ‘तो मी नव्हेच’ या नाटकात त्यांनी प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत काम करताना पूर्ण महाराष्ट्र आपलासा केला. जयंत ओक यांच्यासोबत साने यांचा ‘गप्पागोष्टी’ हा कार्यक्रम महाराष्ट्रात गावोगावी गाजला. सिडनी, मेलबर्न येथील रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटवून गेला. ‘कोवळी उन्हे’ ह्या त्यांच्या स्वलिखित एकपात्री कार्यक्रमात कथाकथन, नकला, संवाद, लावणी, नाट्यछटा असे साहित्य प्रकार रसिकांची दाद मिळवून गेले.
एखाद्याच्या वाट्याला केवळ फुलेच आली, असे नाही. काही काटेही विनाकारण टोचले जात असूनही आपल्या कर्तव्यापासून यत्किंचितही न ढळणारी व्यक्ती असतात म्हणजे रणजित चंदेल! महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात माहिती साहाय्यक म्हणून रुजू झालेले चंदेल २००८ रोजी निवृत्त झाले. चंदेल यांचा कष्टमय प्रवास तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मालिकांतील, कार्यक्रमातील व्यक्तिंची रंगभूषा मन लावून करणाऱ्या शिवानी गोंडाळ यांनी नौशाद अली, आशा भोसले,अशोक सराफ, अनुपम खेर, जॉनी लिव्हर, पद्मिनी कोल्हापूरे, यामी गौतम, मनोज वाजपेयी, आशिब विद्यार्थी, सुबोध भावे, तेजश्री प्रधान, अदिती सारंगधर, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांची रंगभूषा केली आहे. सोबतच शिवानी यांनी अभिनय, व्हॉइस ओव्हर, वेगवेगळ्या मासिकांमध्ये हिंदी व मराठी लेख, कविता लेखन केले आहे. ‘सामना’ वर्तमानपत्रात त्यांचे मेकअप या एकाच विषयावर दोन वर्षे लेखन प्रकाशित झाले आहे.
दूरदर्शनवर मुंबई केंद्रावर सांगली येथून आलेली लहान चणीची, अवखळ असणारी, चेहऱ्यावर सदैव स्मित असणारी, हसण्याची थोडी जरी संधी मिळाली, तरी खळखळून हसणारी निवेदिका… स्मिता गवाणकर! दूरदर्शनवर साप्ताहिकी, नाट्यावलोकन, हॅलो सखी, सप्रेम नमस्कार, मधुरा इत्यादी कार्यक्रमांमुळे रसिक प्रिय असणाऱ्या गवाणकर यांच्या ‘मधुरा’ कार्यक्रमाचे ११०० भाग प्रकाशित झाले ही सोपी नाही.
या पुस्तकातील एका लेखात लेखक महत्त्वाचा संदेश देतात, ‘सर्व पालकांनी आपापल्या मुलामुलींची आवड ओळखून त्याच विषयात त्यांना शिकू दिले, करिअर करू दिले, तर अक्षरशः हजारो मुलंमुली आत्महत्या करण्यापासून, मानसिकदृष्ट्या आजारी होण्यापासून, व्यसनाधीन होण्यापासून नक्कीच वाचू शकतील आणि सक्षम, आनंदी जीवन जगू शकतील असे मला वाटते.’ मर्मबंधा गव्हाणे यांना त्यांच्या आईवडिलांनी तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिची आवड ओळखून प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या फिल्मसिटीतील व्हीस्लिंग वूड्स या संस्थेत प्रवेश दिला. या संस्थेच्या पहिल्या तुकडीची ती विद्यार्थीनी आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये मर्मबंधा यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.
सिंगापूर येथे वास्तव्यास असलेल्या आणि तिथे अनेक संस्थांमध्ये सेवाव्रती म्हणून काम करणाऱ्या नीला बर्वे म्हणतात, ‘जर दुसऱ्या देशात कायमचे रहायला जायचे असेल तर तरुण वयात जावे. नोकरी, वाढता संसार, नव्या जागी सेटल होणे अवघड जाते. पण १०-१५ वर्षांत तिथलेच होऊन जातो. सारे आयुष्य एका देशात गेल्यावर, अनेक वर्षांचे स्नेहबंध सोडून दुसरीकडे जुळवून घेणे काहीसे कठीण. सारा वेळ मोकळा पण बाकी कोणी नाहीत मोकळे आपल्याबरोबर येण्यास, संवाद साधण्यास. काही मित्रपरिवाराच्या कथा ऐकल्या होत्या. थोडे दिवस ठीक आहे, जातो वेळ इकडेतिकडे फिरण्यात पण नंतर बोअर होते. त्यांची आपली संस्कृती, खाणे-पिणे, सारेच वेगळे.’
‘ग्रंथाली’ प्रकाशनाला २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रंथालीच्या या दीर्घ प्रवासात १९७७ पासून जोडली गेलेली व्यक्ती म्हणजे सुदेश हिंगलासपूरकर! त्यांच्या रोमहर्षक प्रवासाला लेखकाने जणू शब्दांच्या गोंदणाने कृतज्ञतापूर्वक सजवले आहे.
परिचारिका म्हणून काम केलेल्या मीना घोडविंदे यांच्या वाटचालीचा सखोल पट वाचनीय आहे. माणूस कितीही मोठ्या पदावर गेला, कुठेही गेला तरी तो आपल्या जन्मदात्यांना कधी विसरत नाहीत. आईचे ऋण म्हणून घोडविंदे यांनी ‘जन्मदात्री’ ही कविता लिहिली असून अत्यंत तरल भावना त्यांनी या काव्यात व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेत गेली चाळीस वर्षे कॅन्सर संशोधन करणार्या डॉ सुलोचना गवांदे या संशोधनाबरोबरच वृत्तपत्रातून लेखमाला लिहून, मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके लिहून, आकाशवाणी, दूरचित्रवाणी माध्यमातुन, समाज माध्यमांद्वारे कॅन्सरबद्दल जनजागृती करीत आहेत, हे खरोखर कौतुकास्पद आहे.

‘माध्यमभूषण’ या पुस्तकात वेगवेगळ्या एकूण छत्तीस व्यक्तिंचा आयुष्यपट लेखक श्री देवेंद्र भुजबळ सरांनी अत्यंत तळमळीन साकारला आहे. तो आजच्या तरुणाईसाठी वाचनीय, मार्गदर्शक, उद्बोधक नि अनुकरणीय आहे. हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अस्मादिकाचा हा परिचय लेख म्हणजे क्रिकेट सामन्याची क्षणचित्रे पाहिल्याप्रमाणे…! माध्यमभूषण या व्यक्तिंच्या कार्याचा खराखुरा परिचय श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या ‘माध्यमभूषण’ हे पुस्तक वाचल्या नंतरच होईल…

— परीक्षण : नागेश शेवाळकर.
उपरोक्त परीक्षणावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…..
1
“माध्यम भूषण” हे देवेंद्र भुजबळ ह्यांचे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील एका साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कालखंडाचा जागता इतिहास आहे. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करणाऱ्या, प्रसिद्ध मागे न जाता फक्त कामाचा अनुभव घेऊन सर्वोत्तम सेवा देणाऱ्या निवडक लोकांचा हा गौरव आहे. सुंदर पुस्तक निवड आणि त्याचा मनापासून लिहिलेला रसाळ आकर्षक परिचय वाचनोत्सुकता वाढवत आहे.
— मेधा निजसुरे.
2
वेगळंच आणि छान पुस्तक आणि सविस्तर परिचय. बरीचशी नावे ऐकली आहेत पण अर्थात सगळ्यांबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे पुस्तक वाचायला आवडेल.
— प्रज्ञा पावगी.
3
अप्रतिम पुस्तक परिचय.
— कृष्णा दिवटे.
4
एका सुरेख पुस्तकाचा देखणा परिचय.दूरदर्शनच्या सुरवातीच्या काळातील “ याकूब सईद”,डॅा.किरण चित्रे,शिवाजी फुलसुंदर , वासंती वर्तक यांच्याविषयी वाचून आनंद वाटला.खूप सुंदर पुस्तक निवड .लेखक देवेंद्र भुजबळ यांनी फार महत्वपूर्ण लेखन केले आहे.
— मीनल ओगले.
5
खूप छान पुस्तक परिचय..पडद्यामागे कितीजण कार्यरत असतात ते आपल्या परिचयातून समजले..वेगळ्या पुस्तकाची निवड केल्याबद्दल धन्यवाद.
— नीला नातू.
6
पुस्तकं वाचायला हवे. खुप सुंदर परिचय.
— डॉ. विजया पोतदार.
7
खूप सुंदर परिक्षण सर.
— सुनील पांडे.
8
सुप्रभात नागेश सर.
आज मला अगदी कृष्णधवल काळात गेल्यासारखं वाटलं. ह्या पुस्तकात ज्या व्यक्तींचा उल्लेख आला आहे ती मंडळी ज्याला आदर्शवाद असलेला काळ म्हणावं त्या काळातली आहेत. याकूब सईद हे नाव कित्येकदा दूरदरर्शनवर पाहिलं आहे पण त्यांनी इतक्या भूमिका केल्या आहेत हे बिलकुल माहीत नव्हतं. किरण चित्रे, वासंती वर्तक, शिवाजी फुलसुंदर ही नावं वाचूनच कुठेतरी समाधान वाटलं. कदाचित ही सगळी नावं भावविश्वाशी आणि बालपणाशी जोडली गेली आहेत म्हणून असावं. हे पुस्तक वाचायला आवडेल.
— श्रेया राजवाडे.
9
खूपच वेगळ्या पुस्तकाचा छान परिचय करून दिलात.
— मीना जोशी.
10
अरे व्वा मस्तच पुस्तक आहे हे. अगदी वेगळ्या विषयावरील, वेगळ्या विश्वातील लोकांबद्दल माहिती देणारे पुस्तक निवडले आहेत. त्यातील बहुतेक जण आपल्याला नावाने माहिती आहेत पण त्यांच्या पलिकडे काहिच माहिती नव्हते त्यामुळे परिचय वाचताना ही खूप मजा आली. नक्कीच वाचायला आवडेल. तुम्ही ह्या आठवड्यात खूप वेगळी पुस्तके निवडली आहेत. त्यामुळे खूप विवीध विषय समोर आले. मनापासून धन्यवाद त्याबद्दल.
11
वा…. मस्त लिहिलंत….
नागेश सर पुस्तक नक्की वाचणार
— प्रकाश पिटकर.
12
वेगळंच आणि छान पुस्तक आणि सविस्तर परिचय. बरीचशी नावे ऐकली आहेत पण अर्थात सगळ्यांबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळे पुस्तक वाचायला आवडेल.
13
वाह सर जी……… आपण या आठवड्यात विषयांचे वैविध्य जोपासत उत्तम पुस्तकं आमच्या भेटीला आणताय, खूप छान आजचे पुस्तक आणि परिचय देखील. सहज …सोपा तरीही अगदी नेमका. उद्याच्या पुस्तकाची उत्सुकता लागते.
— रूपा दड्डी. गडहिंग्लज
14
नागेश सर, अतिशय वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाचा अत्यंत समर्पक परिचय !
पुस्तक वाचलेले नाहीच. नावाजलेल्या लोकांच् “कार्य” विषद करणारे पुस्तक ! आपण खुपदा नावाशी परिचित असतो परंतु ते नाव ज्या कार्यामूळे प्रस्थापित झाले त्या विषयी अजाण असतो. वर्तमानपत्रामधून जे वाचायला मिळते तेवढीच माहिती ….. “वाचायला नक्कीच आवडेल” हे पुस्तक.
— अभियंता अनिरुद्ध वैद्य.
15
नमस्कार, आजचे पुस्तक लई भारी हाय… वाचायला खूप आवडेल. तुम्ही पुस्तकाचा परिचय इतका सुंदर करून दिला आहे. नक्कीच वाचले पाहिजे. पुढील परिचया साठी हार्दिक शुभेच्छा.
16
एका सुरेख पुस्तकाचा देखणा परिचय.दूरदर्शनच्या सुरवातीच्या काळातील “याकूब सईद”, डॅा.किरण चित्रे, शिवाजी फुलसुंदर , वासंती वर्तक यांच्याविषयी वाचून आनंद वाटला.खूप सुंदर पुस्तक निवड. लेखक देवेन्द्र भुजबळ यांनी फार महत्वपूर्ण लेखन केले आहे.
17
हा तर माध्यम इतिहासाचा तिरपा छेद. माध्यम विश्वातील नजिकचा भूतकाळ… त्यातील संदर्भ-कवडसे पकडून ठेवणारा दस्तऐवज.
तुम्ही उत्तम मांडणी केली आहे. वैविध्यपूर्ण पुस्तके वाचून, मुरवून, त्याचे सार इथे ठेवत आहात तुम्ही.
— आश्लेषा महाजन.
18
शेवाळकर सर,
वेगळे पुस्तक. ह्यातली अनेक माणसं आपल्या दैनंदिन आयुष्याचा एकेकाळी हिस्सा होती. आजच्या गतीमान माध्यमांच्या काळात विसरली गेली होती. आपल्या पुस्तक परिचयामुळे आठवणींना उजाळा मिळाला.
तर काही जणांविषयी प्रथमच कळले. छान परिचय.
— हेमंत खेर
19
माध्यमातल्या लोकांविषयी सामान्य लोकांना खूपच कुतूहल असतें..! त्यांची दुसरी बाजू पाहायची ही उत्सुकता असते..! माध्यमातल्या थोरांची ओळख (खरी) करून देणाऱ्या पुस्तकाचा परिचय खूप आवडला..! पुस्तक संग्रही असावे असेच..!!
— दिपाली चरेगावकर.
20
एकदम वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाचा परिचय. आधीच दूरदर्शन तसं आपल्या मनाजवळचं.त्यावर सादर होणारे कार्यक्रमही
आपलेसे वाटणारे. त्यामुळे आपण परिचय करुन दिलेल्या या पुस्तकातील अनेक नावही सतत समोर येणारी. पण त्यांच्या विषयीची अधिकची माहिती या पुस्तकातून होईल. डाॅ.किरण चित्रे, वासंती वर्तक, स्मिता गवाणकर, याकुब सईद ही नावं सतत कानावर पडणारी. चॅनल कितीही येवोत पण दूरदर्शन आपलसं वाटतं.आज या पुस्तकामुळे ते जुने दिवस परत समोर आले. मस्त वाटला आजचा परिचय. हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.
— सुलेखा
21
एक अतिशय सुंदर उपक्रम! वेगवेगळ्या वेळी दिसलेली व्यक्ती किंवा ज्यांच्या बद्दल फक्त ऐकलं होतं अश्या व्यक्तींबद्दल छान वाचायला मिळेल अशी खात्री पटली. आता फक्त ते पुस्तक हाती कधी पडेल त्याची उत्सुकता.
Eksdsm zakkkkkkkkkas. आनंद देवधर. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ +91 9869484800
