Thursday, February 12, 2026
Homeबातम्या"शुभंकरोती" साहित्य संमेलन संपन्न !

“शुभंकरोती” साहित्य संमेलन संपन्न !

“साहित्य यज्ञ हेच आमचे ध्येय” असे म्हणत वाटचाल करणारा शुभंकरोति साहित्य परिवार हा खरोखरच एक अनोखा साहित्यिक परिवार आहे. सुमारे तीनशे सदस्यांचा हा परिवार असून त्यामध्ये अनेक लिहिते हात सक्रिय आहेत. नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, अनुभवी लेखकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम साहित्यनिर्मिती घडवून आणण्याचे कार्य या परिवारातून सातत्याने केले जाते.

या साहित्यिक गोतावळ्याची निर्मिती मा. सोनाली जगताप यांनी केली आहे.त्यांच्यासोबत प्रा. सुमती पवार व डॉ. माया यावलकर यांचा त्रिवेणी संगम या परिवाराला बळ देणारा ठरतो. हा जणू साहित्य शक्तीचा जागरच आहे.

परिवाराच्या कार्यासाठी सहा सुज्ञ व कष्टाळू प्रशासकांचे प्रशासन सतत कार्यरत असते. काही उत्साही हौशी लेखकही आपले मोलाचे योगदान देत असतात. दर आठवड्याला प्रशासकांकडून लेखकांना चार लेखन विषय दिले जातात. त्यापैकी एक-दोन विषयांवर लेखक कविता, कथा व लेख लिहितात. आठवड्यातील दोन दिवस विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात. असे हे साहित्य लेखन कार्य गेली चार वर्षे अविरत सुरू आहे. या प्रवासातून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

यावर्षी झालेल्या “गोष्ट तुमची आमची” या उपक्रमात शुभंकरोति साहित्य परिवाराचा मोठा सहभाग होता. तब्बल ६० ते ७० सदस्यांनी देश-विदेशातून वाचन करून सहभाग नोंदवला.

शुभंकरोती साहित्य परिवाराचा वार्षिक व चौथा वर्धापनदिन, कुसुमाग्रजांना स्मरून “शब्द विहंग” या नामकरणामध्ये नामाधीश झाले. हे संमेलन दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक ओझर मार्गावर असलेल्या आजीचे पुस्तकांचे हॉटेल येथे आयोजित केले होते.

प्रथम सत्रात ग्रंथदिंडीने रामनामाच्या आणि विठ्ठलाच्या गजरात आणि अभंगात ग्रंथांचे पूजन करताना शंख नादाने याची सुरुवात झाली. यात सर्व साहित्यिकांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला.

शुभंकरोती म्हणजे साहित्य यज्ञ आहेच, परंतु वाचनदिंडीचे द्योतकही आहे. वाचनसंस्कृती वाढवणे, हे या समूहाचे केवळ ध्येय नाही तर ध्यासदेखील आहे आणि म्हणूनच नाशिक येथील “आजींच्या पुस्तकांचे हॉटेल” येथे अत्यंत दिमाखात हे संमेलन घेण्यात  येऊन उत्कृष्ट लेखकांच्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यात आला.

मागील पिढीतील थोर गायिका मा. उषा कीर्तने उर्फ राजश्री शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कोमसाप अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न झाले.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात उषाताई कीर्तने यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली.
१) योगाचार्य प्रज्ञा पाटील
२) सुप्रसिद्ध निवेदिका क्षिप्रा मानकर
३)  श्री सुरेशदादा पवार, (गिरणा गौरव प्रतिष्ठान)
४) श्री वसंतदादा खैरनार (लेखक तुमच्या भेटीला)
५) श्री हरिभाऊ कुलकर्णी (रेडिओ विश्वास)
६) श्रीमती आरती गुप्ते, (अभिनेत्री-साहित्यिक)

तसेच खालील पाच संस्थांना ‘मराठी प्रकाशवाट पुरस्कार’ जाहीर करण्यात आले.
१) साहित्यसंपदा
२) शब्दशिल्प कला आविष्कार संघ
३) मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान
४) शब्द कवडसा
५) सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ.

एक प्रकाश वाट पुरस्कार नाट्यशास्त्र, दिग्दर्शन, लेखक नाशिक येथील श्री रोहित चौधरी यांना देण्यात आला. प्रा. सुमती पवार यांना “जीवनगौरव” पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलच्या मालक आजींना गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

दुसऱ्या सत्रात अभिवाचन झाले. नंतर कविसंमेलन झाले.

दरवर्षी शुभंकरोती साहित्य परिवाराची संमेलने विविध शहरात दिमाखात होतात. अशा या दिमाखदार व प्रेरणादायी संमेलनाच्या आठवणी मनात चांगल्याच रुजल्या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शुभंकरोति साहित्य परिवाराच्या संस्थापिका मान.सोनालीताई जगताप यांच्या तळमळीला मनापासून सलाम.
    मायमराठीच्या समृद्धीचा
    घेतलाय ताईंनी ध्यास
    साहित्य क्षेत्रात दरवळतोय
    सोनालीताईंचा कीर्तीसुवास
    प्रेम सेवा त्याग भक्ती
    गुण त्यांचे आहेत खास
    भव्य दिव्य साहित्य संमेलने भरवून
    वाहून घेतले मराठी साहित्याच्या कार्यास
    सोनालीताईंसह मान.माया ताई, मान.प्रा.सुमती ताई,
    मान.पांडुरंग दादा व सर्व प्रशासक मंडळींचे तसेच सर्व
    पुरस्कार प्राप्त सारस्वत व सर्व पुरस्कार प्राप्त संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11