“संतत्व देईल शांती”
आपण अतिसामान्य माणसे; जगण्यासाठी आपल्याला एक उद्दिष्ट लागते आणि ते काही फार मोठे नसते. मी, माझा परिवार, माझी माणसं… एवढंच छोटेसे विश्व असतं आपलं. याच सगळ्यात आपण कमी-अधिक गुंतलेलो असतो. हेच आपल्या जगण्याचं कारण असतं. त्या बदल्यात आपल्याही काही अपेक्षा असतात. आपण ज्याच्यासाठी झिजतो आहोत, त्या व्यक्तीला अगदी कृतज्ञता वाटत नसेल, तरी किमान जाणीव असावी, एवढी अपेक्षा असतेच; पण असे खरेच घडते का ?
कोणासाठी कितीही करा, हवं तर आपलं अस्तित्वच ओवाळून टाका; पण त्यांची गरज संपली की ते पलटणारच! तुमच्या हजार चांगल्या गोष्टींवर पाणी फेरायला, एखादं खुसपट ते शोधून काढणारच. आपण समोरच्याच्या मनाप्रमाणे वागतो तोवर ठीक; पण त्यांच्या कामना-वासना पुरवायला आपण जरा कमी पडलो की दूषणं ठरलेलीच !
कालपर्यंत तुम्ही जिच्या गळ्यातलं ताईत होता, तीच व्यक्ती आज तुमच्या नावाने बोंब ठोकू लागते. तुमच्यासमोर साखरपेरणी आणि माघारी विष कालवते; तेव्हा मनाचा गोंधळ उडतो. काय, कशासाठी आणि कोणासाठी ? हे प्रश्न भोवती फेर धरून नाचू लागतात. जगण्याचे प्रयोजनच जणू नष्ट होते. उभा सह्यकडा आतल्याआत कोसळू लागतो; तेव्हा, पाठीवर हात ठेवून मुक्ताई म्हणतात — ‘संत जेणें व्हावें। जग बोलणें साहावें॥’
“सहन करा ?” मन आक्रंदून उठतं, “का ? कसं ? कसं सहन करू ? इतरांचं ठीक आहे हो! पण जी मंडळी आपल्याला ओळखतात, जाणतात; त्यांनाही कळू नये आपली व्यथा? असतील त्यांच्या चौकटी, इच्छा-आकांक्षा; पण माणूस म्हणून त्या आपल्यालाही आहेतच ना? एवढा साधा व्यवहार त्यांना कळू नये ? आणि तरीही आपणच सहन करायचे?” तेव्हा, मुक्ताई म्हणतात — ‘तरीच अंगीं थोरपण। जया नाही अभिमान॥’
आपण या जगात जन्माला आलो, तेच मुळी एक निश्चित प्रयोजन घेऊन! मग आपले विहित कर्म पार पाडून आत्मोद्धार साधणे, हेच आपले प्राथमिक लक्ष्य असायला नको का ? लोक तर हजार तोंडांनी बोलतच राहतील; आपण नाही त्यांचे बोलणे थांबवू शकत. त्यांचे कर्म त्यांच्यापाशी; पण आपणच आपला मार्ग बदलला तर ? आपला अभिमानच त्यागला तर? माझ्यात ‘मी’च उरला नाही, तर तुम्ही बोलणार कुणाला? दुखावणार कोणाला ? आपण कोण आहोत? कधी कोणासाठी काय केलं होतं ? कोणाला जीव लावला होता ? हेच विसरून जायचं! मग बदल्यात काही चांगलं वाट्याला यावं, अशी अपेक्षाही राहणार नाही. अपेक्षा नाही, तर अपेक्षाभंगाचं दुःखही … इतकं सोपं आहे सगळं! नाही का ?
पण तरीही एक प्रश्न उरतोच; चांगल्याची अपेक्षा ठेवायची नाही हे ठीक, पण कुणी मुद्दाम वाकड्यात शिरत असेल तर काय? आपला दोष नसताना विनाकारण का सहन करायचे? आपल्याभोवती बदनामीचे कृष्णजाल विणले जात असताना नुसतेच बघत बसायचे ? साधा प्रतिकारही करायचा नाही ? येथेही मुक्ताबाईंचा उपदेश आहेच — ‘थोरपण जेथें वसें। तेथें भूतदया असें॥’
आपणच आपले मन मोठे करायचे, समोरच्याला समजून घ्यायचे. तो तसा वागतोय, कारण त्याच्या मनात स्वयंप्रतिमाभंजनाचे भय आहे. काम-वासनेने तो पीडित आहे. कदाचित गैरसमज असेल, कदाचित राग, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, अज्ञान… जे असेल ते असो! स्थळ, काळ, प्रदेश आणि व्यक्तीपरत्वे कारणे बदलत जातील. आपण कशाकशाशी भांडत बसायचे ? आपली ऊर्जा का खर्ची घालायची? त्यापेक्षा स्वतःच्याच अंतःकरणाची शुद्धी करणे जास्त सोपे नाही का ?
जो स्वतःच्या विकारांनीच पीडित आहे, त्याच्यावर कसला राग धरायचा? विश्वाच्या या मायेला आपण अंतिम सत्य समजलो, हा आपलाच दोष म्हणायचा. स्वतःला व समोरच्यालाही माफ करून पुढे जायचे. यातच सर्वांचे हित नाही का ?”
‘रागें भरावें कवणासी। आपण ब्रह्म सर्वदेशी॥
ऐसी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥’
तुमच्यात आणि माझ्यात एकच जर ब्रह्मतत्त्व असेल, आणि जर ते मला दिसत असेल; तर मग मी तरी रागवायचे कुणावर ?
एकदा ही अडचण समजून घेतली की कसला आलाय राग-लोभ ? त्यापेक्षा विसरून जायचे. जुन्या अनुभवांतून शिकवण तेवढी घ्यायची आणि पुढे सरकायचे! अंतःप्रेरणेला जागवायचे; मग कोणतं आणि कसलं कृष्णजाल ? कशातच आपला पाय अडकणार नाही. मन आणि बुद्धी पुढच्या प्रवासासाठी मुक्त होईल. तो प्रवास आपला… आपल्या आतील… अंतरात्म्याची ताटी उघडणारा असेल.
क्रमशः

— लेखन : सृष्टी गुजराथी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
