“आरसे महाल”
नमस्कार मंडळी.
आजपासून आपण पंधरवाड्याला एकदा, गुरुवारी; “संगती रंग” ही लेख माला प्रसिद्ध करणार आहोत. ही लेख माला वसुंधरा घाणेकर या लिहिणार आहेत. या पूर्वी त्यांच्या सुंदर, सचित्र, स्वनिर्मित बाल कविता आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाल्या आहेत.
वसुंधरा घाणेकर यांनी गणित विषयात बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर एका राष्ट्रीयीकृत बँकेत सेवा केली. ही सेवा करीत असतानाच त्या कविता, कथा लेखन करू लागल्या. त्यांच्या सामाजिक जाणीव असलेल्या कथा, नियमितपणे नामवंत दिवाळी अंकात प्रसिद्ध होतात.
“ज्याचा त्याचा परीघ” हा त्यांचा कथा संग्रह डिंपल पब्लिकेशनने 2007 मध्ये,
तर “पुनः नव्याने…” हा कथा संग्रह मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस ने 2016 साली प्रकाशित केला. या कथा संग्रहाला 2017 साली वामनराव रेगे पुरस्काराने सन्मानित केले गेले.
त्यांचा तिसरा कथासंग्रह “पांढरा गुलमोहर” संधिकाल प्रकाशन ने 2024 प्रकाशित केला. तर “पुनः नव्याने…” ह्या कथा संग्रहाची दुसरी आवृत्ती 2025 साली प्रकाशित झाली आहे.
आपल्या पोर्टल साठी वसुंधरा घाणेकर लिहिणार असलेल्या “संगती रंग” ह्या लेखमालेची संकल्पना अशी आहे की, आपल्याला जीवनात तऱ्हेतऱ्हेच्या संगतीमुळे अनुभव मिळतात किंवा संगतीला जे लाभतात त्यांच्याकडून अनुभव ऐकायला मिळतात ! कार्यालयातील सहकारी असोत, सहप्रवासी असोत किंवा आपल्या इमारतीत राहणारे रहिवासी ! तर कधी आपल्या जवळच्या नात्याचे. तर कधी चुकून भेटणारे. अनेक पदरी, अनेक धाग्यांनी ही रंग संगती रोज नव्याने खुलत असते! या “संगती रंग” मध्ये विविध अंतरंग मनोज्ञपणे साकारलेले असतील.
या लेखमालेच्या शीर्ष चित्राची संकल्पना वसुंधरा घाणेकर यांचे आयआयटीयन सुपुत्र, डॉ.आलोक घाणेकर, जे सध्या अमेरिकेत मेरीलँड येथे रिसर्च सायंटिस्ट आहेत, त्यांची आहे. सुयोग्य शीर्ष चित्र तयार करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या “संगती रंग” मध्ये आपण नक्की रंगून जाल, अशी आशा आहे……
— संपादक
साधनाताई मला भेटली एका लग्न समारंभात. तिनं म्हटलेलं वेगळ्या चालीच मंगलाष्टक मला खूप आवडलं. त्याबद्दल कौतुक करायला मी तिच्याजवळ गेले. त्या दिवशी आमची ओळख झाली. तिनं जोपासलेली तिची गाण्याची आवड यावर ती खूप बोलू लागली. संसार सांभाळून छंद जोपासणाऱ्या साधनाताई बद्दल मला खूप आदर वाटला. मोबाईल नंबर घेऊन आम्ही एकमेकींना घरी येण्याचं आमंत्रण देखील केलं.
रविवारी मला सुट्टी असते, एक दिवस ठरवून तिच्या घरी गेले. निवांत गप्पा मारल्या आम्ही…
सांगू लागली, “जवळच्या नात्यामध्ये लग्न असेल ना, तर माझं मंगलाष्टक हवं हे ठरलेलं असतं. ते सुद्धा मी रचलेलं. मला दुसऱ्या कुणाचं मंगलाष्टक पटतच नाही मुळी.”
मग तिनं एक फाईल दाखवली, त्यात तिने स्वतः केलेल्या रचना होत्या.
“पाहिलंस माझं अक्षर ? शाळेमध्ये मला हस्ताक्षरासाठी कायम बक्षीस मिळत असे.”
मी भारावून उद्गारले, ”किती कला गुण आहेत तुझ्यामध्ये साधनाताई ! ”
“माझा संसार सांभाळून मी हे सगळं करत असते. एकही दिवस मी माझ्या मुलांचा आणि मिस्टरांचा टिफिन दिला नाही असं झालं नाही. एवढेच नाही सणासुदीचे पारंपरिक पदार्थ मी कधीही चुकवत
नाही. होळीला पुरणपोळी संक्रांतीला गुळाची पोळी अगदी नागपंचमीला कडबू ! ”
ऐकताना मला अपराधी वाटू लागले. सणासुदीला कित्येक वेळा मला सुट्टी काढता येत नाही. कडबू हा पदार्थ तर मी कधी खाल्लेलासुद्धा नाही !
मग तिने एक गाणे म्हटले. फक्त लताबाईंचीच गाणी गाते म्हणाली.
“कराओकेमुळे हल्ली फार छान झालंय गं…. ”
ही सुगृहिणी जेव्हा माझ्या घरी येणार असे ठरले, तेव्हा काहीसे दडपण आले मला.
साजूक तुपातला केशर घालून शिरा बनवला मी. पापड, कुरडया तळून ठेवले. मी मन लावून शिरा केला होता. हौसेने शिऱ्याची मोठी मूद पाडून, त्यावर बदामाचे काप, चारोळी आणि बेदाणे यांची नक्षीदार रचना करून ठेवली होती. चारोळी, बदाम काजू भिजवून ठेवायचे आणि तुपावर परतून घ्यायचे रंग मोहक येतो. शिवाय ते कच्चे रहात नाहीत. बेदाणे मात्र शिऱ्यात घातलेले वेचून काढायचे. असं सगळं सांगायची घाई झाली होती मला. पण तिने नक्षी पाहिलीच नाही
सुबक नक्षीत चमचा खुपसून ती सांगू लागली की, ”शिरा हा अगदी सोपा पदार्थ आहे करायला. ढवळला की झालं. कुरडई, पापड. तर तू आयते आणत असणार. मी घरीच करते. सोसायटीची गच्ची कशाला आहे मग ? ”
शिऱ्याची नक्षी तिला आवडेल आणि मग माझ्या रांगोळीचे फोटो तिला दाखवेन असे ठरवले होते मी.
ऑफिसमध्ये रांगोळीसाठी नेहमीं पहिले पारितोषिक असते मला. दिवाळीला आम्ही गावी जातो. सासूबाई अंगणात गेरूने सारवून घेतात. चांगले चार थर दिले, की सुंदर दिसतो विटकरी रंगाचा रांगोळी साठी चौकोन !
मुलं असतात,’आई हा रंग भर, तो रंग भर करत.’ त्यांचे बाबा रांगोळी साठी कायमचा फोटोग्राफर !
“मी माझ्या रांगोळीचे फोटो दाखवू का ? वेगळा अल्बम बनवला आहे मी.”
नक्षी तिनं पाहिली नव्हतीच. तिला हे ऐकू देखील आले नाही की काय ?
“तुला एक मी गाणं म्हणून दाखवते. कालच बसवलं आहे ….”
मग तिने गायला सुरुवात केली.
“माझं कसं आहे, जे गायचं ते उत्तमच.”
“कोणाकडे शिकलीस तू ?”
“छे ग ! उपजतच घेऊन आले मी ही कला … मी एके ठिकाणी क्लासची चौकशी करायला गेले होते शाळकरी वयात. तिथल्या शिक्षिका म्हणाल्या, इतक्या तयारीचा आहे तुझा गळा ! गाणं शिकण्याची गरजच नाही मुळी.”
“काय सांगतेस काय !”
“आमच्या सोसायटीत गेल्या वर्षी काय झालं सांगू ? आमच्या सोसायटीत त्रिपाठींकडे पाहुणे आले होते. गॅदरिंगमध्ये नेहमीप्रमाणे मी गायले. तेव्हा ते पाहुणे नवरा-बायको माझ्या पाया पडायला आले.. म्हणाले, ‘लतादीदी अभी तो नही रही. लेकिन आप तो है ना ..’ म्हणजे बघ.”
तिची नॉनस्टॉप गाडी सुरू झाली. मी, मी आणि मी ! भ्रमात होती ती, की फक्त स्वतःच्या प्रेमात ?
मुगल ए आजम मध्ये मधुबाला बेभान नाचत असते आरसेमहालात जिकडे पाहावं तिकडे स्वतःचीच छबी ! हो की, ते गाणे लतादीदींचेच आहे ! ..
आपल्यापैकी कोणाला दिसली आहे का अशी आरसे महालातली नर्तकी ?

— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️9869484800
