“नंदकुमार पाटील”
कोणाचा जन्म कोठे, कधी, केव्हा अन् कोणाच्या पोटी व्हावा या संदर्भात कोणी काहीही सांगण्याची शक्यता दुर्मिळ म्हणावी लागेल. काही जण ‘सोन्या‘ चा चमचा घेऊन जरी जन्मले नसले तरी अशा काही व्यक्ती या जन्मतः कलासक्त, धेयासक्त अन् हरहुन्नरी अशा असतात. अशा या दिग्गजांच्या मांदियाळीत ‘नंदकुमार परशुराम पाटील‘ या धेयासक्त, हरहुन्नरी पत्रकाराचे, कलाकाराचे नाव आवर्जून घ्यावं लागेल.
स्वातंत्र्यसैनिक परशुराम पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. मीराबाई सुसंस्कृत अशा दांपत्याच्या पोटी नंदकुमार यांचा जन्म परळ, मुंबई येथे ०८ नोव्हेंबर, १९६१ रोजी झाला. अनिल, विनोद अन् प्रवीण या भावंडात नंदकुमार हे शेंडे फळ. शेंडे फळ म्हणून ‘लाड’ वगैरे असं काही कोणी केले नाहीत. पण या मोठ्या घरात वडीलधारी मंडळींचा आदरयुक्त धाक होता. त्यामुळे बालपणीच त्यांच्यावर सुसंस्कार झाले. या मनमोकळ्या वातावरणात स्वातंत्र्यसैनिक वडील परशुराम यांचे कळत-नकळत सेवा भावी वृत्तीला देशप्रेमाची जोड मिळाली मग आपसूकच निरलस निरपेक्ष या वृत्तीचे जतन संवर्धन होते. हे अनुवंशिक गुण ‘नंदकुमार‘ यांच्यात येणे स्वाभाविकच. ‘शेंडे‘ फळ असूनही कळत्या-जाणत्या वयात कमवा व शिका या अंतर्गत त्यांनी लेऑऊट कलाकार, पेपर कटिंग व पेस्टिंग या कामासोबत कधी फोटोग्राफर तर कधी वार्ताहर म्हणून विविधांगी जबाबदाऱ्या मोठ्या कौशल्याने आत्मसात केल्या. थोडक्यात वृत्तपत्रीय सर्वांगांचा अनुभव त्यांना मिळाला.

माझी आणि नंदकुमार पाटील ह्यांची ओळख ही दै. नवशक्ती ,मुंबई येथे चारेक दशकांपूर्वी झाली. नवशक्तीत सर्वश्री भाऊ जोशी,तुकाराम कोकजे, प्रकाश कुलकर्णी, ह.मो.मराठे असे दिग्गज संपादक होते तर पुरवणी संपादक सुश्री सुरेखा गांधी होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऐसी रसिके..’ या सदरात मी नियमितपणे बालकथा, प्रासंगिक सणवार,दिग्गजांच्या जयंती/पुण्यतिथी, मुलाखती यावर आधारीत लेख लिहित असे. त्याच सुमारास नंदकुमारजी हे दै. नवशक्ति मध्ये ‘काम करत होते. फक्त तोंडओळख होती. एकदा मला नंदकुमारजीनी विचारले नव्हे तर आदेश दिला की आपण दै. “शिवनेर” मध्ये दर रविवारी बालकथा लिहित जा त्याप्रमाणे मी दै. ‘शिवनेर’ चे संस्थापक संपादक मा. श्री. विश्वनाथ आणि कार्यकारी संपादक मा.श्री नरेंद्रजी वाबळे यांच्याशी बोललेलो आहे अस़ं ऐकल्यावर मी त्यांना तात्काळ होकार देऊन टाकला आणि लिहिण्यास तयार झालो. अशा रितीने मी नियमितपणे दर रविवार पुरवणी ‘दै. शिवनेर‘ मध्ये बालकथा लिहित गेलो. मला सातत्याने लिहितं ठेवलं त्याच सर्वस्वी श्रेय दै.‘शिवनेर‘ चे संस्थापक संपादक आदरणीय मा. श्री विश्वनाथजी वाबळे, कार्यकारी संपादक मा.श्री नरेंद्रजी बाबळे अन् अर्थात नंदकुमार पाटील यांचेच आहे. यांचा मी शतश: ऋणी आहे.
मुख्य मुद्दा म्हणजे नंदकुमार पाटील यांची बहुतांश सर्व दैनिक, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक व वार्षिकांकात हटकून त्यांचा कांकणभर जास्त हातभार हा ठरलेला असायचाच असायचा. यात ग्रंथाली, रुचिका, रोहन, मंगेश, अनिरुद्धादी नियतकालिकातून मांडणी, रचना, सजावट, मुखपृष्ठादीची सर्व कामं मोठ्या कल्पकतेने व कौशल्याने पार पाडत होते नव्हे आजही ते त्याच तडफदारपणे वृत्तपत्रीय कामकाज करीत आहेत. अशा त्यांच्या नानाविधकामांची यादी केली तर ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाणारी आहे.

आजही नंदकुमार पाटील ह्यांची त्याच उत्साहाने महाराष्ट्रातील बहुतांश नियतकालिकातून सक्षम कल्पकतेची झलक पाहायला मिळते हे विशेष होय. मुख्यतः लेऑऊट आर्टिस्ट, व्यंगचित्र, रेखाचित्रं, जाहिराती, नाटकं, व्यक्तीचित्रं, आर्ट वर्क आदी त्यांनी रेखाटलेली आहेत. याशिवाय त्यांनी स्तंभलेखक म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलंय.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार, पत्रकार, सा. मार्मिक व दै. सामनाचे संस्थापक संपादक व शिवसेना संघटनेचे संस्थापक आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. मीनाताई उपाख्य मॉं साहेब ठाकरे यांच्या जीवनाच्या समग्र दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले होते त्यात नंदकुमार पाटील यांनी आपल्या कॅमेरातून केलेले स्थिर चित्रण लक्षणीय ठरले होते.
नंदकुमारजी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते उत्कृष्ट नर्तकही आहेत. त्यांनी आपली कला वेळोवेळी, प्रसंगानुरूप राष्ट्रसेवा दलाच्या रंगमंचावर, युवक बिरादरी आदी संस्थांच्या वतीने लोकसेवा, लोककला महोत्सवाच्या उपक्रमात तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमात सूत्रसंचालक तर कधी निवेदक या नात्याने राज्याचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नेतृत्व केले आहे.

‘कल्पकला‘ या स्वनिर्मित संस्थेद्वारा विविध कलाकृतीची निर्मिती, लेखन, अभिनय, दिग्दर्शन यात उत्स्फूर्त पुढाकार घेऊन यशस्वीपणे अंमलात आणला. थोडक्यात आमचे हे हरहुन्नरी मार्गदर्शक मित्र हे मराठीतील हरफनमौलाच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. बहुपेडी व्यक्तीमत्व ल्यायलेले नंदकुमारजी यांचा सर्व स्तरातील क्षेत्रात चौफेर वावर असल्याने साहजिकच त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. उदा. मुंबई दूरदर्शन, आकाशवाणी, नेहरू सेंटर, राज्याचे सांस्कृतिक संचालनालय, पु.ल.देशपांडे, नाटक, सिनेमा, वाद्यवृंद आदी ठिकाणी स्वतःच्या कॅम्प द्वारा जनसंपर्काचे कार्य केले आहै. ‘चंदेरी – सोनेरी, टॉप शोज, हे सह्याद्री वाहिनीवरील रियालिटी शो, आकाशवाणी व दूरदर्शवर लघुपटाचे लेखन शिवाय लेख कथा, मालिका, काव्य, वात्रटिका, चारोळी या सारख्या लेखनातही ते माहिर आहेत. नर्तक म्हणून जसे ते प्रसिद्ध आहेत.
असे हे आमचे हरहुन्नरी कलाकार नंदकुमारजी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक आकाश संपलं, संस्कार, दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांतून (सोनी, स्टार प्लस, ई टी.व्ही, झी मराठी, कामगार विश्व यात निवेदक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यांचा ‘मामी‘ महोत्सवात सक्रिय सहभाग असतो.शिवाय एस.टी महामंडळ, पु.ल. देशपांडे अकादमी, डेव्हिड ससून वस्तीगृह या संस्थेतही ते सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.
‘कलाश्रम’ – :
‘सामाजिक बांधिलकी‘ ही नुसती बोलण्यापुरती व लिहिण्यापुरती नसून ती त्यांनी स्वतः ‘कलाश्रम’ हा उपक्रम सुरू करून दाखवून दिले आहे. या उपक्रमांद्वारे त्यांनी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक डॉ परशुराम पाटील स्मृती दिनानिमित्त ‘कला केंद्र‘च्या द्वारे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिकादी क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या गुणी जनांचा ‘ अभियान’ सन्मान देऊन त्यांच्या समग्र जीवनाची आवर्जून उल्लेख करीत अशा दिग्गज जनांचा सत्कार ‘दखलपात्र‘ सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येते. आज पर्यंत गौरविण्यात आलेल्या मान्यवरात नाटककार प्रेमानंद गज्वी, हरिश्चंद्र गणपत मोरे, ज्येष्ठ रंगकर्मी स्मिता विनोद हडप, कुमुद मयेकर, मीनाक्षी सावंत, मेघानंद घाडी, मनोहर पारायणे, सुरेश पांचाळ, माणिक मयेकर, विजय गटलेवार, सुहास कामत, लीला हडप, रश्मा विजयकर, शिवदास घोडके, उपेंद्र दाते, सीताराम कुंभार, दिलीप पवार, रोहिणी पटेल, रवी जाधव, रामनाथ थरवळ, मी स्वतः (नंदकुमार रोपळेकर ) आदी मान्यवरांचा समावेश आहे. यात मीना नेरुरकर, अशोक परब, सुनील देवळेकर यांचे सक्रिय सहकार, आशीर्वादात्मक मार्गदर्शनाचा लाभ नंदकुमार पाटील यांना वेळोवेळी मिळाला म्हणूनच “आज मी तुमच्या सारख्या सृजनासमोर उभा आहे“ अशी कृतज्ञता ते नम्रपणे व्यक्त करतात.

नंदकुमार पाटील यांनी रामोजी फिल्म हैदराबाद, शाहिर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार, अजित सावंत समर्पित पुरस्कार, रंगकर्मी पुरस्कार, सांस्कृतिक कला दर्पण, एस.टी. महामंडळ दक्षता समिती, आदी आस्थापनात सभासद, निवड समिती, सांस्कृतिक समितीत सदस्य म्हणुन लक्षणीय योगदान दिले आहे.
|| खास उल्लेखनीय ||
@ ऑगस्ट क्रांती आंदोलनाला ५० वर्षे झाली या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शासन प्रणित ‘लोकराज्य‘ या विशेषांकाचे प्रकाशन बहुभाषिक माजी पंतप्रधान मा. श्री. नरसिंह राव यांच्या हस्ते झाले होते. या अंकाच्या मुखपृष्ठ, मांडणी, रचना, सजावट, रेखाचित्रादीत संपादकीय सहभाग होता.
@ पंतप्रधान राजीव गांधींच्या प्रचार सभेत दादाजी कोंडदेव, स्टेडियमवर झालेल्या समुह गाण्यात नंदकुमारजी यांचा सहभाग होता.
@ युवक बिरादरीचा प्रतिनिधी म्हणून माजी पंतप्रधान मा. चंद्रशेखर यांच्याशी संवाद.
@ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उध्दव ठाकरे, विक्रम गोखले, सुषमा शिरोमणी आदी दिग्गजांच्या मानपत्रांचे लेखन.
@ दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
@ दै. नवाकाळ यात ‘घडलं बिघडलं‘ या सदरात सात वर्षांच्या कालावधीत
जवळजवळ दीडेक हजार व्यक्तींवर प्रकाश झोत टाकला आहे.
@ पत्रकारितेतील आलेल्या जीवनानुभव ‘गुज गोष्टी‘ हा एकपात्री प्रयोग केलाय.
@ ‘चंदेरी- सोनेरी‘ या अंताक्षरी कार्यक्रमाचे आठशेक प्रयोग केले आहेत.
सर्वश्री महेश मांजरेकर, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अशोक पत्की,श्रीरंग गोडबोले, केदार शिंदे, सचिन गोस्वामी,आदेश बांदेकर, सनील बर्वे,अप्पा वढावकर, मधुरा वेलणकर, अशोक मुळे, कौशल इनामदार, मंगेश देसाई, मिलिंद शिंदे, वर्षा उसगावकर, मीनल जोगळेकर आदीसह ज्ञात-अज्ञातांचे मला आशीर्वादात्मक मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले म्हणून मी या क्षेत्रात कार्यरत राहू शकलो अशी भावना नंदकुमार पाटील कृतज्ञतेने व्यक्त करतात.
अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यांना मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत :
@ अखिल भारतीय नाट्य परिषद,
@ महर्षी दयानंद महाविद्यालय.
@ एकता सांस्कृतिक अकादमी.
@ रिझवी एज्युकेशन.
@ विघ्नहर्ता सेवा संघ.
@ सृजन फॉऊंडेशन.
@ प्रगती कला मंडळ.
@ अष्टगंधा.
अशा या माझ्या मित्राचा अफाट लोकसंग्रह व जनसंपर्क पाहून लक्षात येते ती म्हणजे त्यांच्या बहुआयामी, बहुपेडी व्यक्तीमत्वाची ओळख होते. निर्गवी, निरलस स्वभावाचे नंदकुमार पाटील म्हणजे खऱ्या अर्थाने ‘जन्गमित्र’. आज आपल्या वयाच्या पासष्टीतही ते “अभी तो मैं जवान हूं“ अशा उत्साहाने कार्यरत आहेत. “मला पत्नी सौ नंदिनीचा सक्रिय पाठिंबा मिळाल्यामुळे मी ही अशी विविधांगी मुशाफिरी करु शकलो” याचा नंदकुमारजी कृतज्ञतेने आवर्जून उल्लेख करतात. त्यांचा मोठा मुलगा मिथिलेस हा जी.डी आर्ट्स झाला असून नोकरी करतो तर धाकटा संकल्प हा पत्रकार आहे.
सर्वार्थाने समृद्ध जीवन जगतांना ‘सामाजिक बांधिलकी‘ मानून कार्यरत राहणार्या नंदकुमार पाटील यांची अशीच ‘घोडदौड‘ पुढे सुरू राहो हीच साहित्य शारदादेवी जवळ तसेच नटराजाकडे मनापासून प्रार्थना.

— लेखन : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
