Thursday, March 5, 2026

कथा

“मैत्री”

छाया नावाच्या अतिश्रीमंत स्त्रीचे अमाप, अफाट पैसे असूनसुद्धा तिच्या बालमैत्रिणीशी पैशाकरता वागणे कोतेपणाचे असे. पण उदात्त विशाल हृदयाची कोमल; छायाच्या या अवगुणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असे. छाया कोमलला जो काही चांगुलपणा दाखवित असते तोच फक्त ती लक्षात घेत असे.

कोमलचे बिऱ्हाड छायाच्या वडिलांचे भाडेकरू होते. दोन्ही कुटुंबं शेजारीच राहत असत. छाया व कोमल यांच्या स्वभावात खूपच फरक होता. पण छाया व कोमल यांची मैत्री होती.

छायाचा संसार सुरू झाला. कोमलच्या आयुष्यात अनेक घटना, प्रसंग घडले. तिच्या पिताजींच्या मानसिक समाधानाकरता कोमलने छायाकडे हार्मोनियमची मागणी केली. छायाने कोमलला हार्मोनियम तिच्या घरातून घेऊन जाण्याची संमती दिली. कोमलला बरे वाटले.

पिताजींच्या निधनानंतर या हार्मोनियमवर कोमलने गाण्याचे वर्ग सुरू केले. परंतु त्याच वेळेला छायाला कोमलने हार्मोनियमवापरण्याविषयी विचारले, कारण मैत्री असली म्हणून काय झाले. पिताजींकरता हार्मोनियम आणून ठेवणे व स्वतः करता वापरणे यात कोमलला तफावत वाटली. कोमलने छायाला तिला हार्मोनियम वापरण्यास देण्याबद्दल धन्यवाद दिले व वेळ आहे, कोणालाही वस्तूचा उपयोग व्हावा या भावनेने कोमलने हार्मोनियम शिकविणे सुरु केले.

थोड्या महिन्यांनी कोमल एकदा थिऑसाफीकल सभेवरून नुकतीच परतली होती तोच छायाची “कोमलऽ कोमलऽऽ” अशी हाक ऐकू आली. छाया सहज भेटायला आली असेल, असे कोमलला वाटले पण छायाचा रागीट-क्रोधिष्ट चेहरा पाहून कोमल दचकली. “कोमल, माझी हार्मोनियमची पेटी मी घेऊन जाण्याकरता आले आहे. पेटीचा बॉक्स लवकर काढ. हे मोटारीत बसले आहे.” कोमल अवाक्…
तिने उत्तर दिले, “अगं छाया, माझ्या ट्युशन्स चालू आहेत. मला सात दिवसांची मुदत देणार काय ? मी तो पर्यंत माझ्या दुसरी सोय करेन. आणि तू मला फोन केला असता किंवा तात्यांजवळ निरोप दिला असता, तरी मी स्वतःहून तुझ्याकडे पेटी आणून दिली असती…” कोमलच्या या बोलण्यावर छाया थोडी शांत झाली. तिने यजमानांना कोमल एका आठवड्याने केलेली पेटी आणून देईल असे सांगितले. पण छायाच्या यजमानांना खूपच राग आला. त्यांनी ताबडतोब पेटी पाहिजे असे निक्षून सांगितले. तेव्हा कोमलकडे राहणाऱ्या निवासी विद्यार्थ्याने पेटी मोटारीत ठेवून दिली.

कोमलला या अनपेक्षित प्रकाराने रात्रभर झोपच येऊ शकली नाही. नंतर तीन दिवसांनी छायाचा फोन आला, “कोमल आम्ही पेटी मेहंदळेंकडे नेली होती. तिचा दुरुस्ती खर्च पंधराशे रूपये आहे. तू पेटीचा बॉक्स मोडला आहेस. तुझ्याकडून आम्ही फक्त तीनशे रूपयेच घेणार आहोत. तू तात्यांबरोबर तीनशे रूपये पाठवून दे.”कोमलला अजून एक धक्का बसला ! कोमलने दुसऱ्याच दिवशी तात्यांबरोबर छायाकडे तीनशे रूपये पाठवून दिले व पेटी वापरण्याचे पैसे दिले आहेत असे समजून कोमल शांत राहिली.

यानंतर खूपच महिन्यांनी छाया कोमलच्या घरी आली. कोमलने तोपर्यंत हा पेटीचा प्रसंग मनातून काढून टाकला होता. कोमल छायाशी बोलताना बोलून गेली, “अगं छाया, माझा एक डायनिंग टेबल घेण्याचा विचार आहे. थोरली बहीण कनकलक्ष्मी गावाहून आली म्हणजे दोघांना जेवायला सोयीचे पडेल पाहू या…”.

कोमलला तीन दिवसांनी छायाचा फोन आला, “कोमल अगं तू डायनिंग टेबलबद्दल म्हणत होतीस तर माझ्याकडे एक सनमायकाचे आवरण असलेले टीपॉय आहे, मजबूत आहे. माळ्यावरून मी ते काढले आहे. तुम्हाला दोघींना वापरायला ठीक आहे. त्याच्याबरोबर एक जुनी लोखंडी खुर्ची आहे. तू मला पाचशे रूपये दे. मी थोड्या वेळाने या वस्तू घेऊन येते.”
“काऽऽय” कोमलला छायाचे बोलणे समजण्यात विलंबच लागला. “अगं, मी तुझे टेबल पाहिजे असे कुठे म्हटले होते.?” कोमलने छायाजवळ टेबलाकरता नकार देण्याचा प्रयत्न केला. पण कसले काय. छाया कोमलचे काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती. छायाने तिचे जुने टेबल कोमलला विकण्याचा पक्का निर्धार केला होता.

सहसा हताश न होणाऱ्या कोमलला उदासपणे या टेबलाचा स्वीकार करावा लागला आणि कोमलकडे काम करणाऱ्या लक्ष्मीचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेलच, “अहो कोमलताई या जुन्या टेबलाची काही घाई होती काय ? सावकाशपणे जमेल त्यावेळेला पैसे साचवून नवीन टेबले घेतले असते तर बरे होते. कशाला वापरलेल्या वस्तू पैसे देऊन मैत्रिणीकडून घ्यायच्या व मैत्रिणीने तरी अशी जबरदस्ती करायची. जळल्ल मेलं ते दळभद्री लक्षण.”

कोमलला आठवण झाली. पिताजींच्या देहावसनानंतर कोमलने छायाच्या अशाच वापरलेल्या तीन साड्या विकत घेतल्या होत्या. प्रत्येकी शंभर रुपये व त्यातली एक साडी फक्त तीन वेळाच नेसली गेली होती. कोमलने विचार केला आपल्या अनेक अडचणींच्या वेळेला ती आलेली आहे व सगळ्या गोष्टींचा पैशाच्या बाबतच विचार करायचा नसतो. जाऊ देत.

दिलदार कोमलने छायाबद्दल अढी धरली नाही. अबोला केला नाही. पण अधिक अपेक्षा काय, अपेक्षाच ठेवल्या नाहीत व छायासंबंधीचे कोमलचे वर्तन अगदी जेवढ्यात तेवढे राहिले.

— लेखन : जयश्री शंकरन. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत
विनित वैद्य on जिचे तिचे आकाश…: ९