Thursday, March 5, 2026
Homeसाहित्य"आई", कशी होऊ गं मी उतराई…..!

“आई”, कशी होऊ गं मी उतराई…..!

आई, काय काय लिहू, तुझ्याबद्दल ? लिहिण्यासाठी शब्द अपूरे आहेत. तू दिव्याच्या वाती प्रमाणे स्वतः तेवून आम्हाला प्रकाश देत राहिलीस. आम्हां भावंडांचे पालनपोषण, आल्या गेलेल्यांचे आदरातिथ्य, सणसमारंभ, देणीघेणी इत्यादी सगळ्यांचा मेळ घालून जमाखर्चाची तू जी तोंडमिळवणी करायचीस ती खरोखरच स्तुत्य आहे. माझी घरकामाची सवय, पाककौशल्य, शिस्त, नीटनेटकेपणा, देवाधर्माची आवड हे सर्व काही तुझ्याच संस्कारांचे आणि तू ठेवलेल्या आदर्शांचे परिणाम आहेत. आज तुझ्या वाढदिवसाच्या प्रसंगी मी देवाकडे एवढेच मागणे मागेन की, हीच आई मला जन्मोजन्मी लाभू देत आणि तिच्या पदराची छाया माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला मिळू देत! तुला सुख, शांती, , समाधान आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य मिळू दे ह्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

माहेराच्या उंबरठ्यात;
ठसा आईचा दिसतो,
बोलक्या त्या डोळ्यातून;
झरा मायेचा ओसंडतो !

कित्येक त्या पदार्थांची;
चव रेंगाळते जिभेवर,
तिच्या हातच्या साध्या
वरण भातालाही;
तोड नाही खरोखर !

सुगरण ती आहे नक्कीच;
तिच्या हाताला चव न्यारी,
प्रेमाने रांधते सर्वांना म्हणून;
प्रत्येक पदार्थ,चविष्ट भारी !

जरी शिकली ती जेमतेम;
तरी हिशेब चोख लक्षात,
पाढे नि पावकी निमकी;
तिचे आजही आहे तोंडपाठ.

पदर खोचून कायम ती;
तत्पर कामाला नेहमी,
उरक कामांचा तिचा;
मुलासुनांना लाजवी !

आज वयोमानानुसार;
थकली असली ती जरी,
सणसमारंभाची लगबग;
तरुणाईला सुद्धा लाजवी !

झेपत नाही कामे आता;
हात थरथरती खूप तिचे,
तरीही उत्साह ओसंडून वाहे;
हीच तिची खरी ओळख असे !

झिजविले सारे आयुष्य तिने;
संसार आणि लेकरांसाठी,
नाही केली कधी हौसमौज;
काटकसरीने पै पै जोडली !

राहिली सदैव समाधानी;
सोस नाही केला कशाचा
इतरांसाठी काहीही करताना
हात सढळ सदैव तिचा !

कधी लुटुपुटूची भांडणे
तर कधी कडाक्याची,
दोन पिढ्यांतील अंतर
दरी तात्त्विक मतभेदांची !

आमच्या दोघींमधील अबोला;
फार काळ टिकत नाही,
मायलेकी नाही;मैत्रिणी आम्ही
एकमेकींशिवाय राहवत नाही

कष्ट केलेल्या हाताने;
आशीर्वाद ती भरभरून देते,
निरपेक्ष तिच्या प्रेमाच्या;
घट्ट मिठीत मी विसावते !

सरस्वती अन् अन्नपूर्णा;
विसावती तिच्या हाती,
तिच्या आश्वासक शब्दात;
समाधान ते किती किती !

— रचना : योगिनी चेतन पंडित
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vedvati Kulkarni on झेप : 14
Swati Naik on अभंग : ओढ
मृदुला राजे on ऋतुराज वसंत
विनित वैद्य on जिचे तिचे आकाश…: ९