Homeसाहित्यगीत रामायण

गीत रामायण

लहानपणी आजीबरोबर सुट्टीच्या दिवशी रामाच्या मंदिरात जायचं खुप वेड होत.
राम म्हणजे कोणीतरी मोठ्ठा देव आहे. सर्व राक्षसांना मारू शकतो इ. भावना मनात असत. आजीच्या कथा गोष्टीतुन ही भावना वयाबरोबर खुलत गेली.
श्रीराम म्हणजे आजीइतकाच आवडता होत गेला.
देवळात, घरी पूजेत, ऊत्सवात प्रभू राम बघत असे. धनुष्य घेतलेले छान निटनिटके श्रीराम अधिकच भावले. परंतु देव असल्याने आमच्यातलं‌ अंतर थोडं …’राखूनच’.. होतं.
पुढे मोठं होताना परीक्षेत पास कर असं‌ सांगताना राम आठवत व हळूहळू श्रीरामापासुन दूर गेलो. मात्र आजी संध्याकाळी नमस्कार केल्यावर .. “रामासारखा वर मिळू दे !” असा आशीर्वाद द्यायची ते मात्र आवडायचं. मनात श्रीराम कायम होते.
थोडं कळायला लागलं आणि थोर गायक मा. भीससेनजींनी गायलेल्या…. राजस सुकूमार मदनाचा….. या गाण्यात श्रीराम कसे आहेत याचाच साक्षात्कार झाला.

याच प्रभू रामाच्या रूपावर पराक्रमावर सीता भाळली व शिवधनुष्य मोडून श्रीराम जानकीवल्लभ झाले. ते ही खुप आवडलं होतं.
ऊंच, सशक्त, धनुर्धारी, तेजस्वी, देखणा शांत मृदूल चेहेरा ही सारी वैशिष्ठ्ये रामात सहज दिसुन येत.
मात्र तरूणाईत एक चमत्कार घडला. महाराष्ट्राला एक सोनेरी स्वप्न‌ पडलं.
ग. दी. माडगुळकर व सुधीर फडके यांना सुदैवाने एकत्र आणले.
या एकत्र भेटीतुन महाराष्ट्राच्या शिरपेचात एक अभिमानाचा शिरपेंच खोवला गेला. साक्षात देवी शारदेने … थोर कवी. मा. ग. दि माडगुळकर .. यांच्यावर वरदहस्त ठेवत …. ‘गीत रामायण’ हे स्वप्न साकार झाले.
एक नव्हे एकूण ५६ गाणी गरजेप्रमाणे त्या त्या रसात लिहुन गदिमांनी वाल्मिकी ऋषींच्या रामायणातील .. प्रभूरामाचे खरेखुरे दर्शनच घडवले.

तशी राम कथा वाल्मिकी ऋषीं प्रमाणे अनेकांनी रंगवलेली आहे. पण त्यात प्रभू राम हे देवच वाटत राहीले. खरंतर खरंच राम होते का ? का काल्पनिक आहे सगळं ? अशी चर्चाही आम्हा वात्रट मुलांच्यात होई. पण देव आहे यासाठी नेहमी आपल्यावर रागवेल या भीतीपोटी लांबूनच नमस्कार करून‌ कोरडे राहिलो.
या रामायणाला मा. थोर संगीतकार, गायक अशा सुधीर भाऊ फडक्यांनी ऊत्कृष्टच संगित स्वबद्ध करत गाऊन महाराष्ट्राला खरोखर वेडच लावले.
दोघे महानच. आणि घडवुन आणलेले गीत रामायण सुद्धा महानच.
मराठी भाषेवर एक सुवर्ण कोंदणाचा कौस्तुभमणीच गळ्यात बांधला गेला.
गदिमांच्या ऊत्तम धाटणी, त्या त्या जागी चपखल शब्द, रस, शब्दलालित्य, याच्या बरोबरच वर्णन करताच येत नाही अशा वेगवेगळ्या नव्या ऊमेदीच्या मधूर चाली देऊन व आपल्या भावपूर्ण जोशात गाऊन बाबूजींनी दूधात साखरच ओतली.
१९५५ साली पुणे आकाशवाणी वरून प्रक्षेपण झाले आणि महाराष्ट्र नादावला गेला.
महाराष्ट्राचे .. गदिमा व बाबूजी… ही लाडकी नावे प्रकाशात ओजस्वी झाली.

ऊत्कट भाव अविष्कार, सुंदर लोभस चाली, आणि सुस्वर कंठ याचा बाबूजींनी चढवलेला साज गीत रामायण अधिकच दैवी रूपात साकार झाले.
आम्हा तरूण मनांना तर या गीतांनी जिंकलेच पण जेष्ठही मोहात पडले.
मराठी मनात एक आदर्श असा श्रीराम रूजला गेला.
संपूर्ण रामकथा ५६ गीतात बांधून जिवंत साकार करणे म्हणजे शिवधनुष्यच ऊचलण्यासारखे होते. म्हणुनच साक्षात हे गीत व्हावे ही देवी सरस्वतीचीच इच्छा होती.
मनी मानसी राम आपल्यातलाच एक आदर्श, एकवचनी, प्रजादक्ष, चारित्र्यसंपन्न, आज्ञापालक, एक पत्नीव्रती, असा अयोद्ध्येचा राजा जवळचा वाटू लागला.
अगदी सुरवाती पासुन ही कथा समोरच आपण बघतोय इतकी जिवंत केली गेली.
श्री राम म्हणजेच मनाच्या भाव भावना झाल्या.
अगदी पूत्रकामेष्टी यज्ञ संपन्नता, कौसल्येचे डोहाळे, रामजन्म बारसं. पहिली अंघोळ बाळलेणी, अंगडी टोपडी तीटी काजळ पाळणा हे सारे आम्ही डोळ्यांनीच बघत होतो. चैतन्याने भारलेले अयोद्ध्यावासी, रांगोळ्या, कमानी तोरणे इ. सजवलेली नगरी, नटलेली प्रजा … ती लगबग.. आनंदोत्सव यात आपणही मिरवतोय असं भासलं.
यातला एकही बारकावा, कंगोरा, किंवा बिंदू ना गदिमांनी… ना बाबूजींनी दुर्लक्षित केला.

पुढे रामाचं गुरूगृही जाणं धनूर्धर‌होणं, शिष्योत्तम होणं, सीता स्वयंवरात मुनींबरोबर जाऊन शिवधनुष्य ऊचलून मोडणं, सीता स्वयंवर, दोघांचा सूंदर जोडा, किती वर्णन करू आणि किती नको अशीच स्थिती बहुदा झाली असणार.
आता गाण्यात वर्णन‌केलेला राजस सुकूमार, सिंहकटी, भरदार रूंद छाती, विशाल अजानुबाहू, चांफेकळी नाक, तेजस्वी कांती, मोठे कान, विशाल भाळ, कमलदलाची लोचने, अस्सा राम जो ऊभा राहिला तो आजपर्यंत नजरेसमोरून हटला नाही. मोडलेल्या धनुष्याचा काड्कन आवाज कानात घुमतोय. सीता रावण ऊताणा झाल्यावर हंसली आम्ही पण हंसलो.
रामायणातील रामकथा जगायला लागलो. श्रीरामाशी एकरूप झालो.

जटायूसारखा अवाढव्य पक्षी, इलूशी खारूताई पण रामाविषयी प्रेमभाव नितांत सुंदर आहे.
श्रीराम पारंगत होऊन परत आल्यावर राज्याभिषेकाची चर्चा होते. त्यात मंथरा वीष ओकते, कैकयी रामाला वनवास मागुन घेत भरताला राज्याभिषेक करायला सुचवते… महाली विलाप… दशरथाचा मृत्यू असे सुरवाती पासुन अहिल्या, शबरी, रामसेतू, लंका, सारे आम्ही बघुन आलो आणि मनात साठवून‌ ठेवलं.
आज साठ वर्षाहुनही अधिक वर्षे झाली. पण येणारी पिढी आमच्या इतकीच त्या रेकाॅर्डेड गाण्यासाठी वेडी होते आहे.
राम म्हणजेच सारी गुणसंपन्नता, आदर्श, चारित्र्य हे तरूण मनावर बिंबवलं जाणं हेच या गीत रामायणाचे विशेष आहे.
प्रभू राम मराठी तरूणाईत रूजले, मनी जिवंत राहिले, आपलेच कोणीतरी वाटले आणि श्रीराम व त्यांचे गुण आम्ही जगण्याचा प्रयत्न केला हेच या गीत रामायणाचे यश आहे.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments